– चैतन्य दाबके, सिडको, औरंगाबाद.
उत्तर : प्रत्येकाची जेवायची एक खास पद्धत, लकब किंवा खासियत असते. कुणी इतकं भरभर जेवतात की अक्षरश: जेवण एकदाचं ‘आटोपतात’, तर कुणी रवंथ केल्यासारखं निवांत जेवतात. कुणाचा प्रत्येक घास लहान असतो, तर काहीजण तोंड भरेल इतके मोठे घास घेतात म्हणजे बोकाणे भरतात. पोट गच्च भरेल इतकं जेवण घेणं तर नक्कीच चुकीचं आहे. आपण जे अन्न खातो, ते पोटात जाण्यापूर्वी आणि त्याचं सुलभतेनं पचन होण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया होणं गरजेचं असतं. खाल्लेलं अन्न पोटात जाताना कशा अवस्थेत आहे, त्यावर त्याची पचनाची गती, स्थिती आणि परिणाम ठरतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेवण जेवण्याची पद्धत योग्य असेल तर जाडी कमी व्हायलाही मदत होते.
आहार घेणं ही गाडीमध्ये पेट्रोल भरण्याइतकी तांत्रिक बाब असू शकत नाही. कारण अन्नाचा संबंध फक्त पोटापुरता मर्यादित नसतो. आहारातून मिळणारं समाधान किंवा तृप्ती ही त्यातल्या जीवनसत्त्वांइतकीच किंबहुना थोडी जास्तच महत्त्वाची ठरते. म्हणून अन्न पोटात जाण्यापूर्वी त्याचा रंग, गंध आणि चव आपल्या मेंदूमध्ये जाण्याची व्यवस्था केली गेली आहे. मांसाहारींना कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, मालवणी फिश राइस प्लेट किंवा शाकाहारींना पुण्यातली बेडेकरांची मिसळ फक्त आठवली तरी तोंडाला पाणी सुटतं, कारण अन्नाचा मनाशी फार जवळचा संबंध आहे. अतिरेकी डाएट्स करणारे या अलौकिक समाधानाला मुकतात आणि म्हणून त्यातून अपेक्षित परिणाम साधत नाही.
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म। या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अन्न म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी कसेही ढकलायचे पदार्थ नाहीत. पोटातल्या वैश्वानररूपी अग्नीला दिलेली ती पवित्र समिधा आहे. थोडक्यात, जेवणे ही एक कला आहे, एक शास्त्र आहे. काही सोप्या सूचना पाळल्या तर आहारातून पोटही भरेल, मनही तृप्त होईल आणि ते योग्य प्रकारे अंगीसुद्घा लागेल.
कितीही घाई असली तरी जेवण्यासाठी किमान १५-२० मिनिटं वेगळी ठेवावी. त्या वेळेत जेवणाव्यतिरिक्त इतर कोणतेही काम करणं, व्यावसायिक फोन करणं इत्यादी टाळावं. जेवायला बसताना मन आनंदी आणि शांत असावं. जेवताना वादविवाद, भांडणं करू नयेत किंवा मानसिक ताण वाढेल असे विषय टाळावेत. दिवसाकाठचं किमान एक जेवण कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र घ्यावं आणि त्या वेळी हास्यविनोद, एकमेकांशी प्रेमाचे, आपुलकीचे संवाद करावेत. जेवताना मुलांच्या अभ्यासाची प्रगती, बायकांचा खर्चिकपणा, नवऱ्यांच्या पाटर्य़ा असे वादग्रस्त विषय टाळावेत! तसंच टीव्हीवरच्या सीरियल्सही पाहू नयेत, कारण त्यातल्या बहुतेक मानसिक ताण वाढवणाऱ्याच असतात!
जेवताना प्रत्येक घास लहान असावा. ‘प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा’ असे पूर्वी आपल्याकडे म्हणायचे, ते अत्यंत शास्त्रीय आहे. तो जास्तीतजास्त वेळा चावल्यामुळे त्यामध्ये भरपूर लाळ मिसळते आणि त्याची पेस्ट तयार होते. लाळेमध्ये काही पाचक रस असतात, जे अन्नाच्या विघटनाला मदत करतात. घास न चावताच गिळला तर आतडय़ांमध्ये त्याचे विघटन व्हायला जास्त वेळ लागतो. शिवाय घास चावताना जबडय़ाला व्यायाम होतो तो वेगळाच! लाळमिश्रित आणि चावून बारीक केलेलं अन्न पोटात गेल्यावर त्याचं पचन जास्त सुलभ, प्रभावी आणि लवकर होतं. अशा पद्धतीने जेवणाऱ्यांना गॅसेस आणि बद्धकोष्ठाचा त्रास सहसा होत नाही. जेवताना पाणी पिणं बरोबर की चूक, यावर दुमत आहे. पण एक नक्की की अन्न कोरडं नसावं. जेवणात रसभाज्यांचा किंवा वरण, आमटी यांचा समावेश असावा. अन्न ताजं, शेगडीवर गरम केलेलं आणि सात्त्विक असावं. मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या आणि शेगडीवर किंवा चुलीवर गरम केलेल्या अन्नात फरक पडतो असा माझा अनुभव आहे. घरातल्या फ्रीजला मी शिळ्या अन्नाचं कोठार म्हणते. आणि ते संपवायचा ठेका बहुतेक वेळा घरातल्या स्त्रियांनीच घेतलेला असतो. एक वेळ चार घास अन्न कमी शिजवा, पण शिळं अन्न खाणं टाळा. शक्य झालं तर फ्रीजचा आकार लहानात लहान ठेवा, म्हणजे शिळ्या अन्नाचा निचरा आपोआप केला जाईल.
रोजच्या आहारामध्ये सर्व चवींचा समावेश असावा. आपल्या एखाद्या समारंभात पंक्तीला जे ताट मांडतात, त्यात डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला काही पदार्थ हमखास असतात. त्यामागेही खूप शास्त्रीय विचार केला गेला आहे. त्यात मीठ, लिंबू, लोणचं, खीर, पूरण, साजुक तूप, ताक या पदार्थामधून खारट, आंबट, तिखट, गोड या चवी मिळतात. मिठातून क्षार, लिंबातून व्हिटॅमिन सी, खीर किंवा पुरणातून साखर, तुपातून स्निग्ध आणि ताकातून पचनाला मदत करणारे बॅक्टेरिया पोटात जातात. पूर्वी जेवणानंतर त्रयोदशगुणी विडा खायची पद्धत होती. त्यातले बहुतेक पदार्थ पचनाला मदत करणारे असतात. रोजच्या जेवणात या पदार्थाचा समावेश करणं बिनखर्चाचं आणि सहज शक्य आहे. यामुळे आहार अधिकच समाधानकारक आणि संतुलित होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा