परंतु जाडी विचित्र पद्धतीनं वाढण्यासाठी कोणती हार्मोन्स किंवा कोणत्या ग्रंथी कशा कारणीभूत ठरतात, त्याबद्दलची बेसिक शास्त्रीय माहिती खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या जाडी वाढण्याच्या पद्धतीवरून आणि लक्षणावरून आपल्या शरीरात कोणती कमतरता असू शकेल, हे तरी या माहितीमुळे लक्षात येऊ शकेल. गेल्या आठवडय़ात मी लिहिल्याप्रमाणे हार्मोन्समुळे जाडी वाढणाऱ्या चार प्रकारांबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते.
ओव्हरी बॉडी टाइप- या प्रकारच्या ओबेसिटीमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे विशेषत: रजोनिवृत्तीच्या काळात महिलांमध्ये ओटीपोट, सीट आणि आऊटर थाईजमध्ये जाडी वाढायला लागते. मोठय़ा बदामाच्या आकाराच्या दोन ओव्हरी ग्रंथी गर्भाशयाच्या दोन बाजूला असतात. त्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची निर्मिती करतात. या ग्रंथींमध्ये गडबड झाली की या प्रकारची जाडी वाढते. रात्री अचानक घाम येणे, मूड स्विंग्ज, पाठ, सीट आणि गुडघे दुखायला लागणे, विनाकारण फटीग येणे, मासिक पाळीच्या आधी वजन वाढणे ही या प्रकारातली काही ठळक लक्षणं आहेत.
अॅड्रिनल बॉडी टाइप- दोन्ही किडन्यांच्या वरील बाजूला असलेल्या अॅड्रिनल ग्रंथीमध्ये बिघाड झाला तर ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यावर परिणाम होतो. त्याचबरोबर पूर्ण सेंट्रल बॉडी, विशेषत: हिप्स तसेच राहून पोटात आणि छातीमध्ये वेडीवाकडी जाडी वाढायला लागते. मानसिक ताणतणाव हे या ग्रंथींमध्ये बिघाड होण्याचं प्रमुख कारण समजलं जातं. याची लक्षणं म्हणजे रात्रभर झोपून झाल्यावरही फ्रेश न वाटणे, सकाळी उठायचा कंटाळा येणे, कायम थकवा असणे, पचनक्रिया मंदावणे, सहनशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा वाढणे, कुठलेही काम करायला उत्साहाचा पूर्ण अभाव, जनरल डिप्रेशन, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी. काही शास्त्रज्ञांच्या मते आपण जो मांसाहार करतो त्यामधून सिन्थेटिक हार्मोन्स पोटात जातात, त्यामुळे शरीरातली हार्मोन्स कंट्रोल सिस्टिम बिघडते.
थायरॉइड बॉडी टाइप- सध्या अगदी विसाव्या वर्षांपासून पुढे थायरॉइड होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. शरीराचं मेटॅबॉलिझम वाढवणं, फॅटलॉस, पेशींची दुरुस्ती, मेंदूची कार्यक्षमता आणि पचनापासून ते मलनिस्सारणापर्यंत प्रत्येत बाबतीत थायरॉइड हार्मोन्स जबाबदार असतात. यांच्या कमतरतेमुळे किंवा जास्त होण्यामुळे या कामांत तर बिघाड होतोच. शिवाय उभ्या फुग्यात हवा भरल्यासारखी जाडी वाढायला लागते. सुस्ती येणे, आळस न जाणे, हळूहळू पण सातत्यानं वेटगेन होत राहाणे, त्वचा कोरडी होणे, सांधेदुखी सुरू होणे, बद्धकोष्ठ, केस गळणे, किंवा राठ होणे, आयुष्यातली गंमत संपल्याचे फिलिंग येणे आणि निद्रानाश, ही या प्रकारातली काही प्रमुख लक्षणं आहेत.
लिव्हर बॉडी टाइप- लिव्हर हा शरीरातला शुद्धीकरण आणि डिटॉक्सिफिकेशन करणारा सगळ्यात मोठा अंतर्गत अवयव आहे. लिव्हरमध्ये बिघाड झाला की पोट मडक्यासारखं किंवा ‘पॉट बेली’ सारखं वाटतं. पण विशेष म्हणजे या सुटलेल्या पोटात फॅट नसतं, तर मुख्यत्वे फ्ल्युइड्स असतात. लिव्हरच्या आरोग्यासाठी न चालणाऱ्या पदार्थाची खायची तीव्र इच्छा होणे, हे या प्रकाराचे सगळ्यात मोठे वैशिष्टय़ आहे. जेवल्यावर खूप ढेकरा येणे, बद्धकोष्ठ, तोंडाला वास येणे, उजवा खांदा दुखणे किंवा आखडणे, सकाळी मूड गेलेला असणे, शरीराचे विशेषत: पायांचे तापमान रात्री वाढणे, आणि पहाटे गजर होण्याआधीच हमखास जाग येणे ही या प्रकारची काही प्रमुख लक्षणं आहेत.
खरं तर ही सगळी माहिती वैद्यकीय स्वरूपाची आहे. परंतु वरील लक्षणांवरून किंवा जाडी वाढण्याच्या पद्धतीवरून वरीलपैकी कुठल्याही प्रकारात तुम्ही येत असाल किंवा वरीलपैकी लक्षणं तुम्हाला लागू होत असतील, तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या. खरोखरच तुमच्यामध्ये एखाद्या हार्मोन्सची कमतरता असेल किंवा एखाद्या ग्रंथीमध्ये गडबड असेल तर भरपूर व्यायाम करून आणि योग्य डाएट करूनसुद्धा तुमचे वेटलॉसचे किंवा स्पॉट रिडक्शनचे प्रयत्न वाया जातील.
स्टे-फिट : हार्मोन्स आणिफिगर
आपलं शरीर म्हणजे एक अतिप्रगत केमिकल फॅक्टरी आहे. आपण खाल्लेल्या अन्नामधून शरीरात ५० पेक्षा जास्त प्रकारची हार्मोन्स निर्माण केली जातात आणि वापरलीसुद्धा जातात. हार्मोन्स म्हणजे काय, ती कशी तयार होतात, ती काय आणि कसं काम करतात, हा पूर्णपणे वैद्यकीय भाग झाला.
First published on: 23-11-2012 at 03:32 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stay fit harmons and figure