दसरा-दिवाळी म्हणजे कपडे शॉपिंगचा वर्षांतला सगळ्यात मोठा सीझन! मला स्वत:ला कपडय़ांच्या शॉपिंगची प्रचंड आवड आहे. मी माझ्यासाठीच नाही, तर माझ्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाइकांसाठीसुद्धा उत्साहानं शॉपिंगला जाते. माझ्या व्यवसायामुळे कुठल्या कपडय़ांमध्ये कोण कसं दिसतं, याचा अभ्यास करण्याचा मला छंद आपोआप लागला. शरीराच्या उंची आणि आकाराप्रमाणे कपडे कसे निवडावेत आणि जाडी कशी ‘चीट’ करावी, याच्या काही सोप्या टिप्स तुम्हाला देते!
बुटक्या मुला-मुलींनी शक्यतो उभ्या स्ट्राइप्सचे आणि फार उंच नसलेले टॉप किंवा शर्ट घ्यावेत म्हणजे त्यांचा बुटकेपणा बऱ्यापैकी झाकला जाईल. अशा मुलांनी शर्ट नेहमी इन् करावेत आणि लो वेस्टच्या ट्राऊझर्स घ्याव्यात. बुटक्या मुलांनी विशेषत: झब्बे किंवा कुडते गुडघ्याइतके उंच घेऊ नयेत. त्यामुळे लोअर बॉडीतला बुटकेपणा अजूनच उठून दिसेल, तसंच अशा लोकांनी आडव्या रेघांचे आणि मोठय़ा डिझाईनचे कपडे घेऊ नयेत, त्यामुळे ते अजूनच बुटके दिसतील. उंच लोकांनी मात्र झब्बे किंवा कुडते घेताना जास्त उंचीचे घ्यावेत, त्यामुळे ते अजून उंच आणि स्मार्ट दिसतील.
तुम्ही जाड असाल तर पेपरमधल्या जाहिरातींमधली मॉडेल्स बघून त्याप्रमाणे कधीही कपडे निवडू नका, हमखास फसाल. जाड लोकांनी टाइट फिटिंगच्या कपडय़ांच्या नादी चुकूनही लागू नये, त्यांची जाडी अजूनच ठळकपणे हायलाइट होईल. पोटं सुटलेल्या मुलांनी आणि पुरुषांनी मोठे चेक्स आणि आडव्या स्ट्राइप्सचे शर्ट टाळावेत. त्याऐवजी प्लेन कलर्स, डार्क कलर्स निवडावेत. त्यामुळे पोटांचे आकार नजरेत भरणार नाहीत. हाय वेस्टचा जमाना आता जुना झालाय. त्यामुळे तुमची सवय बदला आणि लो वेस्ट ट्राऊझर्स घ्या.
जाड मुलींनी आणि महिलांनी टॉप, ट्राऊझर्स, सलवार-कुडते घेताना तर विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमचे कुडते आणि टॉप्स फार लूज घेतलेत, तर तुम्ही प्रत्यक्ष आहात त्यापेक्षाही जास्त जाड दिसाल. पण त्याचबरोबर कुडते आणि टॉप्स टाइट फिटिंगचे घेतलेत, तर तुमचे अप्पर बॉडी कव्‍‌र्हज थोडे जरी आऊट-ऑफ शेप असले तरी ते जास्तच ठळकपणे उठून दिसतील. त्यासाठी तुमच्या बॉडी साइजपेक्षा फक्त एक किंवा फार तर दोन साइज लूज कपडे घ्या. कुडते आणि टॉप्स खादीचे किंवा अंगावर उभ्या राहणाऱ्या कडक कापडांचे घेऊ नका. डार्क शेड्स आणि पातळ कापडांचे कुडते आणि टॉप्स तुम्हाला जास्त शोभून दिसतील. मांडय़ांमधली जाडी झाकण्यासाठी लूज सलवार घेतलीत, तर ते बऱ्याचदा ओंगळवाणं दिसतं. त्यापेक्षा टाइट फिट सलवार घ्या आणि गुडघ्याइतके उंच टॉप घ्या, म्हणजे मांडय़ांमधली जाडी आपोआप झाकली जाईल. तुम्ही वेस्टमध्ये जाड (बेल शेप) असाल तर तुमचे कुडते आणि टॉप्स खांद्यांपासून लूज असावेत. त्यामुळे सिटातली जाडी उठून दिसणार नाही.
दंडात जाडी असलेल्या मुलींनी किंवा महिलांनी (नवऱ्यांचा आग्रह नसेल तर) स्लीव्हलेसचा किंवा शॉर्ट स्लीव्हज्चाही विचार करू नये. त्यामुळे दंडाची जाडी जास्तच खुलून दिसते आणि लोकांचं नेमकं तिथंच लक्ष जातं. त्याऐवजी कोपराइतके लांब आणि बारीक डिझाइनचे कुडते आणि टॉप्स तुम्हाला शोभून दिसतील. लोअर बॉडी जाड असलेल्यांनी लाइट कलर्सच्या तसंच टाइट फिटिंगच्या ट्राऊझर्स अजिबात घेऊ नयेत. काळा किंवा कोणताही डार्क रंग आणि त्यांच्या जवळची कुठलीही शेड असलेल्या कपडय़ांमध्ये जाडी बऱ्यापैकी झाकली जाते हा थंबरूल नेहमी लक्षात ठेवा.
तरुण बॉडी बिल्डर्सना बहुतेक वेळा टाइट कपडे घालून आपले कव्‍‌र्हज् दाखवण्याची हौस असते आणि त्यात काहीही गैर नाही. कारण त्याच कारणासाठी ते रोज मेहनत घेत असतात! त्यांना मात्र एकच सांगायचंय, ते म्हणजे कव्‍‌र्हज् जास्त ठळकपणे दिसावेत म्हणून बऱ्याचदा हे तरुण जरा नको इतके जास्त टाइट कपडे घालतात! इतके, की एकतर शर्टची वरची दोन बटणं लागतच नाहीत आणि उरलेली बटणं लावल्यावर दोन बटणांच्या मधून छाती दिसते! असो! मला काय म्हणायचंय ते त्यांच्या लक्षात आलं असेल.
कपडय़ांचं शॉपिंग करताना तिथले डिस्प्ले पाहून, जाहिरातींमधील मॉडेल्स पाहून किंवा नटनटय़ांचं ड्रेसिंग पाहून कपडे निवडू नका. तशा फिगर्स फक्त ५ टक्के लोकांच्या असतात आणि तुम्ही त्यापैकी नसण्याची शक्यता ९५ टक्के असते! तेव्हा या काही साध्या टिप्सचा विचार करून शॉपिंग केलंत तर कपडय़ांमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसेल! हॅपी दिवाळी!

Story img Loader