मितेश रतिश जोशी
नात्यातील वीण अधिक घट्ट करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येत कुठेतरी फिरस्ती करावी ही परंपरा आहे. फॅमिली ट्रिपचं माहात्म्य सांगणारी कहाणी आजच्या सफरनामामध्ये !
कोणे एकेकाळी फॅमिली ट्रिप म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर आजोळयात्रा किंवा इतर तीर्थयात्रा यायच्या. म्हणजे खासगी कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडायचं ते तीर्थाटनासाठीच असा समज होता, पण नंतर नंतर ही परिस्थिती बदलत गेली. केवळ पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोक फिरायला लागले. आता तर अनेक देशांचा पर्यटन हा प्रमुख आर्थिक स्राोत झाला आहे. आपल्या देशात पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. लोक त्या पाहायला बाहेर पडतातच, त्याचबरोबर पर्यटनाचे ट्रेण्डही बदलले आहेत. पूर्वी फक्त देवदर्शनाला जाणारे कुटुंबकबिले आता निसर्ग पाहायला, ऐतिहासिक वास्तू पाहायला, ट्रेकिंगला, निसर्गाची किमया पाहायला, नवनवी गावं एक्सप्लोर करायला एकत्र घराबाहेर पडतात. या फॅमिली ट्रिपमध्ये आणखी एक नवीन ट्रेण्ड जोडला गेला आहे तो म्हणजे ‘आराम करण्यासाठी पर्यटन करायचं’. पूर्वीपेक्षा आताचं जीवन अधिक धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे छोटा ब्रेक तर हवाच, रुटीनमधून बाहेर तर पडायचं आहे, पण हे बघ, ते बघ असं करत स्वत:ला अजिबात शिणवूनही घ्यायचं नाही आहे. रोजची धावपळ करावीच लागते, पण वर्षांतले काही दिवस फक्त आराम करायला घराबाहेर पडायचं. घरापेक्षाही आराम मिळेल, अद्यायावत सेवा मिळतील, आपल्या माणसांबरोबर निवांतपणे चार दिवस घालवता येतील, अशा पर्यायांची निवड करायला हल्ली लोकांना आवडू लागलं आहे.
प्रसिद्ध यूट्यूबर सुकीर्त गुमास्ते पूर्वीच्या व आताच्या फॅमिली ट्रिपमधला फरक सांगताना म्हणाला, ‘माझ्या लहानपणी जेव्हा माझे बाबा कामाला जायचे तेव्हा ते दहा मिनिटांत ऑफिसला पोहोचायचे. त्यांच्या काळातील आयुष्य हे फार संथ होतं, पण तितकंच सुंदर होतं आता तसं राहिलेलं नाही. स्पर्धा वाढली आहे. स्ट्रेस वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्वत:ची स्पेस शोधते आहे. पूर्वीच्या काळी फॅमिली ट्रिप्स व्हायच्या त्या नातेवाईकांच्या घरी किंवा आजोळी ! त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चाकोरीबद्ध फिरण्याचा ट्रेण्ड होता. याचं महत्त्वाचं कारण असं की पूर्वी पैसे येण्याचे मार्ग मर्यादित होते. कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे आधीच्या पिढीला प्रवास खूप काही अॅडजस्टमेंट करून करावा लागत असे. त्यांच्यासाठी प्रवास म्हणजे आनंद नाही तर बऱ्याचदा काटकसरीचा असायचा. आता तसं चित्र राहिलेलं नाही. प्रवासाच्या बाबतीतले विचार आणि मानसिकता हल्ली सतत बदलते आहे. आपल्या माणसांबरोबर निवांतपणे चार दिवस घालवता येतील अशा ठिकाणी जायला कुटुंबातील सदस्य पसंती देतात. याला सामाजिक, आर्थिक परिस्थितीही तितकीच कारणीभूत आहे’. याचं उदाहरण देताना त्याने त्याच्या लहानपणीची आठवण सांगितली. ‘आम्ही जेव्हा लहानपणी बेळगावला फिरायला जायचो तेव्हा मला व्हिडीओ कोच बसचं प्रचंड आकर्षण होतं. ज्यावेळी मी पहिल्यांदा एशियाडमध्ये बसलो तेव्हा मला माझं डोकं मागे आपटलं जात नाही आहे याचं कोण अप्रूप वाटलं. माझा मुलगा अथांग हा चार महिन्यांचा असतानाच फाइव्ह स्टार रिसॉर्टमध्ये राहिला आहे. आत्ताच्या पिढीला पुढच्या गोष्टी फार आधीच मिळत असल्याने त्यातलं अप्रूप संपून जातं. ते संपता कामा नये’, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आजकाल लोक सतत लक्झरी फॅमिली ट्रिपच्या माध्यमातून सुख विकत घेण्यासाठी धडपडत असल्याचं निरीक्षणही त्याने नोंदवलं.
हेही वाचा >>> यह देखने की चीज है…
आम्ही दिवाळी एकत्र साजरी करतो, असं सांगत पुण्याची यूट्यूबर ऊर्मिला निंबाळकर तिचे फॅमिली ट्रिपचे अनुभव सांगताना म्हणाली, ‘सण बाहेर जाऊन एकत्र साजरे करणं हा फॅमिली ट्रिपमधला खूप मोठा भाग आहे. धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीकडे वेळेचा अभाव आहे. त्यात घरात प्रत्येकाची वेगवेगळी स्क्रीन असते. फार कमी घरांमध्ये एकत्र येऊन एकच चित्रपट किंवा वेबसीरिज बघितली जाते. अनेक घरांमध्ये कुटुंबातील सदस्य कामाच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असतात. त्यामुळे नात्यांमधील दुरावा सारून एकत्र येण्यासाठी सुट्ट्या हा उत्तम पर्याय आहे’. दिवाळीला लागून आलेल्या तीनचार दिवसांच्या सुट्टीत आम्ही सर्वजण ‘फिरणं’ आणि ‘सण साजरा करणं’ या दोन भिन्न गोष्टी एकत्र आणत घराबाहेर पडतो. सणांचं प्रयोजनच कुटुंबाने एकत्र येणं हेच असल्याने आम्ही गेल्या चार वर्षांपासून दिवाळीला लागून येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये हमखास एकत्र बाहेर पडतो. नात्यांमध्ये बंध निर्माण करण्याची यापेक्षा वेगळी संधी असूच शकत नाही. भावनिकरीत्या एकमेकांशी जोडलं जाण्याचा हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो, असं मत ऊर्मिलाने व्यक्त केलं.
सतत बंद घरात राहणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी, धावण्यासाठी, मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी अधिक जागा मिळते, मुलांना पैशाचं व्यवस्थापन कसं करावं हे शिकवायचं असेल तर हीदेखील एक चांगली संधी असू शकते. यामुळे मुलांना नव्या शहरात येण्या-जाण्याचे मार्ग, नव्या शहरांची माहिती, नकाशे वापरणं अशा गोष्टीही शिकायला मिळतात. म्हणजे एकंदरीत हा प्रवास कुटुंबासाठी एक असा अनुभव ठरतो जो आयुष्यभर सर्वांना उपयोगी पडतो. कौटुंबिक सहलीचं नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात यावर आता प्रकाश टाकूयात. कौटुंबिक सहलीला जाताना पूर्वनियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पूर्वनियोजनाकडे दुर्लक्ष केलं तर ते कुटुंबातील इतर सदस्यांना अडचणीत आणू शकतं. आणि त्यातून सहलीमध्ये वाद वाढण्याची दाट शक्यता असते. तसंच प्रवासात लहान मुलांसाठी स्वतंत्र सीट बुक करा. अनेक वेळा लोक पैसे वाचवण्यासाठी मुलांसाठी वेगळी तिकिटं काढत नाहीत. मुले कुठेही जुळवून घेतील असं त्यांना वाटतं, पण अशाने मुलं सतत अंगावर राहून पालकांना त्रास देऊ लागतात. त्यामुळे मुलांसाठी स्वतंत्र सीट बुक करा, जेणेकरून संपूर्ण प्रवासात मुलं त्रास देणार नाहीत. कौटुंबिक सहलीला जाताना जास्त सामान पॅक करू नका, कारण जास्त सामान सोबत घेतल्याने तुमचा प्रवास खूप त्रासदायक होऊ शकतो. खूप सामान घेऊन मुलांना एक कम्फर्ट झोन येतो. कमी सामानामुळे आलेल्या परिस्थितीला मुलं तोंड देऊ लागतात. स्थानिक बाजारपेठ फिरल्याने मुलांना बाजारभाव व वस्तूंमधला फरकही समजू शकतो. त्यामुळे कौटुंबिक सहलीला जाताना नेहमी फक्त आवश्यक वस्तूच सोबत पॅक करून घ्याव्यात. तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात, त्या ठिकाणांबद्दल तुमच्या ट्रॅव्हल एजंटकडून किंवा टूर पॅकेज कंपनीकडून योग्य प्रकारे माहिती घ्या. तुम्हाला कोणती ठिकाणे दाखवली जाणार आहेत? तेथील प्रवेश शुल्क किंवा त्यासह इतर खर्च किती येईल? याची माहिती घ्यायला विसरू नका. तसंच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल? तुमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी केली जाईल? या सगळ्याची माहिती घेऊनच तुम्ही फॅमिली टूर पॅकेज बुक करा. अनेक वेळा असं होतं, प्रवासाला जाण्यासाठी तुम्ही इतके उत्साही असता की, या सगळ्या गडबडीत तुम्ही हिडन चार्जेसबद्दल (छुपे शुल्क) माहिती न घेताच टूर पॅकेज बुक करता. असं अजिबात करू नका, कारण असं केल्याने तुमचं बजेट बिघडू शकतं. त्यामुळे, नंतर अचानक अतिरिक्त पैसे भरण्यापेक्षा तुम्ही आधीच एजंटकडून या छुप्या शुल्काबद्दल विचारून घ्या. ट्रॅव्हल पॅकेजचं बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला प्रवासामध्ये कोणती कागदपत्रं सोबत ठेवावी लागतील? याची माहिती एजंटकडून घ्या. काही पर्यटन स्थळांवर फोटो, ओळखपत्रं आणि वैद्याकीय प्रमाणपत्र आदी विशेष कागदपत्रं लागतात. त्याशिवाय, पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे, या सर्व कागदपत्रांची आधीच माहिती घ्या आणि ही कागदपत्रं सोबत ठेवायला विसरू नका. फिरस्तीमधून एक नवा अनुभव आपल्याला मिळतो. प्रत्येक नव्या प्रवासातून आपण विविध संस्कृती, खाद्यापदार्थ, भाषा, बोलीभाषा, माणसं इत्यादींविषयी बरंच काही शिकतो. हा एक असा अनुभव आहे जो आपल्याला जीवनात कामी येतो. शरीराचा थकवा हा थोड्याशा आरामानंतर निघून जातो, पण मनाचा थकवा हा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वातावरणात गेल्याशिवाय कमी होत नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात एकाच घरात राहूनही कुटुंबातल्या लोकांना संवाद साधायला वेळ नसतो. अशा वेळी फॅमिली बॉण्डिंगसाठी वेळ मिळेल तेव्हा फॅमिली ट्रिप करत राहणं हा उत्तम पर्याय आहे. viva@expressindia.com