माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचे ‘वेड’ असायला हवे. त्याला एखाद्या गोष्टीचे वेड असले तरच तो त्या गोष्टीमध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत आणि विजिगीषूवृत्तीच्या जोरावर बदल किंवा क्रांती घडवू शकतो. २००७ साली एका स्पर्धेत तिच्या गुडघ्याला दुखापत झाली, तरीही तिला त्या स्पर्धेत खेळायचं होतं, दोन पायांवर नीट उभं राहता येत नसतानाही. पण डॉक्टरांनी तिला थांबवलं.. या स्पर्धेनंतर तू यापुढे जिम्नॅस्टिक करूच शकणार नाही, असं काही जणांनी तिला सांगितलंही. पण ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो, इतिहास घडवण्याची धमक असते अशा व्यक्ती सारं काही जुगारून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि ते गाठतातही. ध्येय गाठल्यावरही त्या व्यक्ती शांत बसत नाहीत, तर आपल्यापुढेही आपल्या देशातले खेळाडू कसे पोहोचतील आणि देशाचं नाव उंचावतील यासाठी प्रयत्न करतात, अशीच एक छोटय़ाशा डोंगराएवढी गोष्ट आहे, ती ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये स्वत:बरोबरच देशाचे नाव उंचावणाऱ्या पूजा सुर्वेची.
लहानपणी आजारपण असल्याने तिला घरच्यांनी बाहेर पाठवायचं टाळलं. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी तिला कोणत्या तरी एका खेळाला पाठवा, असा सल्ला देण्यात आला आणि दादरमधील श्री समर्थ व्यायाम मंदिरामध्ये जिम्नॅस्टिकचे धडे गिरवायला तिने सुरुवात केली. फक्त काही महिन्यांतच तिच्यातली चुणूक दिसली आणि बऱ्याच स्पर्धामध्ये विजयाची पताका फडकवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या दिशेने
‘२००७ साली राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान एन्ट्री केल्यावर काही वेळातच माझा गुडघा दुखावला गेला. त्यावेळी स्ट्रेचरवरून मला बाहेर नेण्यात आलं. दुखापतीचे स्वरूप मला माहिती नव्हतं, त्यामुळे माझं नाव पुकारलं जातंय, मला स्पर्धा खेळायची आहे, असं मी डॉक्टरांना सांगत होती. माझा हट्ट शिगेला पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं की, मी तुला स्पर्धा खेळायला देतो, पण दोन्ही पायावर नीट उभी राहून दाखव. मी प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. ही दुखापत एवढी गंभीर होती की, बरीच जणं मला म्हणाली की, तू यापुढे जिम्नॅस्टिक खेळू शकत नाही..’ हे सर्व सांगत असताना पूजाच्या अंगावर शहारे आले होते. कदाचित तो प्रसंग तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला असावा.
‘त्यावेळी आई-बाबा माझ्या पाठीशी होते. महेंद्र चेंबूरकर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय संघटनांही पाठीशी होत्या. त्यामुळे लोकं काय बोलतात, याचा मला विसर पडला. ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायचं, हे मनाशी पक्क केलं होतं. डॉक्टरांकडून उपचार घेतले. त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत २००९ साली विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठीही माझी निवड झाली’,असं पूजा सांगत होती.
पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेबद्दल विचारल्यावर ती म्हणाली की, ‘जपानला स्पर्धेच्या ठिकाणावर गेल्यावर मी भारावूनच गेले. आपण कुठे आलो आहोत, इथले खेळाडू कोणत्या उंचीवर आहेत आणि आपण कुठे आहोत हे कळून चुकले. जिंकणार नाही, हे तर जवळपास माहितीच होते. कारण तिकडचे स्पोर्ट्स कल्चरच वेगळे आहे. तिथे खेळाडूंना आपल्या इथल्या हीरो-हीरॉइन्सपेक्षाही जास्त सन्मान मिळतो आणि आपल्याकडे असे काहीच नाही. त्यावेळी एक ठरवलं, या वर्षी जिंकलो नाही तरी पुढच्या वर्षी काही ना काही तरी मिळवायचेच. सारं काही विसरून फक्त आणि फक्त जिम्नॅस्टिकच्याच मागे लागले. श्वासही तोच आणि ध्यासही, अशी माझी अवस्था होती आणि मला या मेहनतीचे गोड फळ मिळालेही. २०१० साली बेलारूसला झालेल्या विश्वचषकात मला ‘मिस एक्सोटिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तो माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण होता. याच वर्षी नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळामध्ये माझा देशातून पहिला आणि विश्व क्रमवारीत १६वा क्रमांक आला.’ आतापर्यंत जिम्नॅस्टिकमध्ये एवढे घवघवीत यश कुणीही संपादन केले नव्हते.
२००४ साली पूजाला ‘बालश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता तिच्याकडे जवळपास शंभरहून अधिक मेडल्स आहेत. त्याचबरोबर ती कथक विशारद असून जिम्नॅस्टिक आणि कथक यांचा मिलाप सादर करत तिने बऱ्याच जणांची मनेही जिंकली आहेत.
सध्या तू काय करतेस, असं विचारल्यावर पूजाच्या डोळ्यात आशेचा किरण दिसतो. ‘जे आमच्या वाटय़ाला आलं ते नंतरच्या पिढीतल्या मुलांच्या वाटय़ाला येऊ नये, असं वाटतं. आम्ही मैदानावर मातीत किंवा इमारतीच्या गच्चीवर प्रॅक्टिस करायचो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना फार समस्या व्हायची. पण आता मी ठाण्यामध्ये तीन ठिकाणी युवा खेळाडूंना शिकवते आणि तेही मॅटवर. आतापासून त्यांना मॅटची सवय झाली तर त्यांना पुढे याचा नक्कीच फायदा होईल. माझ्या मते आपल्याकडे फार टॅलेंट आहे, पण ते पुढे
खेळाडूपासून तू आता अवघ्या २३ वर्षांमध्ये प्रशिक्षकही झाली आहेस. आता यापुढे तुला काय मिळावं, असं वाटतं, असं विचारल्यावर पूजा सांगते की, माझ्याकडे सध्या दीडशेहून अधिक युवा खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, पण एकही स्टेडियम त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे माझी सरकारला विनंती असेल की, जिम्नॅस्टिक स्टेडियमसाठी एक जागा द्यावी, जेणेकरून या युवा पिढीला चांगले प्रशिक्षण देता येईल. कारण ६-७ वर्षांतल्या खेळाडूंमध्ये जबरदस्त टॅलेंट असून त्यांना जर चांगले प्रशिक्षण आणि सुविधा मिळाल्या तर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच काही वर्षांत पदके मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे एवढी चमकदार कामगिरी करूनही मला राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला नाही. गेली काही वर्षे मी त्यासाठी प्रयत्नशील आहे.
देदीप्यमान कामगिरी करूनही राज्य सरकार पूजासारख्या खेळाडूंची दखल घेताना दिसत नाही. पण पूजाला मात्र, आपल्या शिष्यांकडून देशाला भेट द्यायची आहे ती ऑलिम्पिक पदकाची. ती आणि तिच्या शिष्या तयारीलाही लागल्या आहेत. गेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या राज्याने जेवढी पदके पटकावली, त्याच्या अर्धी म्हणजे २५ पदके ठाण्यातील पूजाच्या शिष्यांनी पटकावलेली आहेत. या राष्ट्रीय पदकांचे रूपांतर आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदकांत व्हायला हवे, अशीच साऱ्यांची इच्छा असेल. पूजाने लावलेला हा कल्पवृक्ष अधिकाधिक बहरावा आणि त्याला पदकांची गोड फळं लागावीत, हीच आशा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा