वेदवती चिपळूणकर परांजप
सुट्टीसाठी मायदेशी आलेल्या तरुणाला इथल्या वास्तव्यात पाण्याची समस्या किती भीषण आहे याची जाणीव झाली. परदेशात आपल्या कामाच्या ठिकाणी परतल्यानंतरही त्या प्रश्नाने त्याची पाठ सोडली नाही. अखेर या समस्येवर आपल्यालाच काहीतरी करायला हवे या निर्धाराने तो परदेशातील घरनोकरी सोडून भारतात परतला. आणि सांडपाण्यावर पुन:प्रक्रिया करून ते वापरण्यायोग्य बनवणारे प्लांट्स बसवायला सुरुवात केली. आज त्याच कामाने प्रशांत शर्मा या तरुणाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
प्रशांत शर्मा हा लंडनमध्ये आय. टी. सेक्टरमध्ये उत्तम पगाराची उत्तम नोकरी करणारा, तिथेच सेटल असलेला माणूस. एकदा सहज आपल्या नातेवाईकांच्या घरी चेन्नईला आलेला असताना प्रशांतला चेन्नई शहर अत्यंत मोठ्या संकटात असल्याचं कळलं. तो दिवस होता १९ जून २०१९. त्या दिवसाला चेन्नईच्या इतिहासात ‘डे झीरो’ असं म्हटलं जातं. त्या दिवशी चेन्नईच्या म्युनिसिपालिटीकडील सगळं पाणी संपलं होतं. त्यामुळे अख्ख्या चेन्नईमध्ये पाण्याचं संकट होतं. त्याला आपल्या २ वर्षांच्या मुलासाठी पिण्याचं पाणी शोधत त्या दिवशी शब्दश: वणवण फिरावं लागलं. त्या दिवशीची ती परिस्थिती बघून त्याने ठरवलं की यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे.
प्रशांत सांगतो, ‘तो दिवस मला अजूनही आठवतो आहे, जेव्हा लोक टँकरच्या रांगेत उभे राहून एकमेकांशी भांडत होते. अक्षरश: मिळेल तिथून टँकरकडे धाव घेत होते. अधिकचे पैसे द्यायचीही त्यांची तयारी होती, काहीही करून त्यांना पाणी मिळेल अशी आशा वाटत होती. पण एवढं करूनही त्यांना मिळालेलं पाणी खारटच होतं, ते पाणी त्यांना पुन्हा पुन्हा उकळवून प्यायला वापरावं लागलं.’ त्या वेळी प्रशांतला हे जाणवलं की अशा प्रसंगात केवळ कोणीतरी काहीतरी करेल म्हणून बसून बघत राहण्यात काहीही अर्थ नाही, ही ती वेळ नाही. आता पाण्याचा प्रश्न नाकातोंडाशी आला होता. ‘मला काय करावं कळत नव्हतं. पाणी हे मर्यादित संसाधन आहे. त्यामुळे ते नव्याने निर्माण करणं तर शक्य नाही. मग असं काय करता येईल ज्याने त्या पाण्याचा पुरेपूर वापर होईल, याचा विचार करायला हवा होता. या विचारांत मी कित्येक दिवस घालवले’ असं प्रशांत सांगतो.
एका रिपोर्टनुसार भारतात दररोज ३१ बिलियन लिटर पाणी सांडपाणी म्हणून तयार होतं. प्रशांतने अशाच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करायच्या सोल्यूशन्सचा विचार करायला सुरुवात केली. अशा सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा झाडांना घालायला, टॉयलेट फ्लशमध्ये, गार्डनिंगमध्ये, स्वच्छतेसाठी वापर करता येईल, असा विचार त्याने केला. पाण्याचा हा प्रश्न काहीही करून सोडवायचाच या उद्देशाने पेटून उठलेल्या प्रशांतने लंडनमधील त्याची सुखासीन नोकरी सोडली आणि २०२२ मध्ये त्याने ‘पॉझिटिव्ह अॅक्शन फॉर चाइल्ड अँड अर्थ फाऊंडेशन’ ही नॉन – प्रॉफिट ऑर्गनायझेशन सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या शाळांमध्ये हे ‘ग्रे वॉटर रिसायकलिंग’ प्लांट बसवायला सुरुवात केली. ग्रे वॉटर म्हणजे ते सांडपाणी जे वॉश बेसिन, सिंक, टॉयलेट यांच्यातून बाहेर पडतं. ज्यात केमिकल नसतं, ज्यावर काही प्रक्रिया झालेली नसते, असं पाणी पुन्हा वापर करण्याच्या योग्यतेचं असतं. अशा पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणण्याची प्लांट्स प्रशांतने उत्तराखंड आणि दिल्ली इथल्या शाळांमध्ये बसवली. प्रशांत सांगतो, ‘या प्लांटमुळे दिल्ली आणि उत्तराखंडमधल्या शाळा वर्षाला सहा लाख लिटर पाणी वाचवतात.’ फ्रेश वॉटर जे एरवी या स्वच्छतेच्या कामासाठी वापरलं जातं, त्याऐवजी हे पुनर्वापर केलेलं पाणी त्या कामांसाठी वापरून ते फ्रेश वॉटर वाचवलं जातं.
आर्थिक दृष्टीने एका संपन्न टप्प्यावर पोहोचल्या नंतर खरंतर आपण समाज आणि पर्यावरण यांसाठी काहीतरी करावं असा विचारही फार कमी लोकांच्या मनात येतो. लंडनमध्ये नोकरी-घर सगळ्याच बाबतीत स्थिरस्थावर असलेल्या प्रशांतच्या मनात मात्र पर्यावरणासाठी पर्यायाने समाजासाठी काहीतरी ठोस कार्य उभारण्याचा विचार आला. त्याने या विचाराला अंतिम स्वरूप देण्यासाठी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ या कामात झोकून दिलं. त्याच्या कामामुळे आज तो समाजात काहीतरी चांगल्या गोष्टी पेरण्यात, निदान तसा प्रयत्न करण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्यासारख्या तरुणांनी उभारलेल्या कार्यामुळे समाजातील समस्या सुटण्यास मदत होतेच, मात्र त्याचबरोबर अनेकांना अशा पद्धतीने पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याची वा समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणाही मिळते. ग्रे वॉटर पुनर्वापराचे प्लांट्स अधिकाधिक शहरांत बसवून पाणी वाचवण्याचे काम व्यापक करण्याचा प्रशांतचा उद्देश आहे. अर्थात, हे काम पूर्ण करणे तितके सोपे नाही याचाही अनुभव त्याने घेतला आहे. भारतात सरकारी लालफितीत अडकून अनेक काम वर्षानुवर्षं रखडतात, शिवाय लोकांमध्ये याबद्दल जनजागृती करणं हेही एक आव्हान आहे. पण हळूहळू का होईना प्रशांतला आपलं काम वाढवायचं आहे. आज केलेल्या कामातूनच भविष्याची दिशा ठरू शकते हे मला अनुभवातून कळलं आहे, असं म्हणणारा प्रशांत म्हणूनच आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी झपाटून काम करतो आहे.
viva@expressindia.com