‘बाई, नमस्ते’, असं शाळेतल्या बाई वाटेत कुठंही भेटल्यावर म्हणण्याचे दिवस अजूनही आहेत का? कोण जाणे. कारण आपली शिक्षण पद्धती नि भोवतालच्या परिस्थितीमुळं एकुणातच शिक्षक-प्रोफेसर्सविषयी आदरभाव व्यक्त करणं दुर्मीळच झालंय. ५ सप्टेंबर अर्थात ‘शिक्षक दिना’निमित्तानं शाळेतील आदर्श शिक्षकांविषयी अनेकदा लिहिलं-बोललं जातं. पण कॉलेजमधल्या प्रोफेसर्सशी तेवढं पटकन ओपन होत नाहीत अनेक जण. त्यांच्याशीही आपला तेवढाच रॅपो असतो का? ते आदर्श वाटणं, ते आवडणं, त्यांच्याशी संवाद साधणं हा टीचिंग प्रोसेसच्याच ओघातला एक भाग असतो का? काय आहे आजच्या विद्यार्थ्यांचं मत? आदर्श प्रोफेसर कसे असावेत, आवडते प्रोफेसर कोण नि त्यामागची कारणं काय आहेत, याविषयी काही जणींनी आपली मतं ‘व्हिवा’शी शेअर केली आहेत.
जान्हवी केळस्कर, डी.जी. रुपारेल कॉलेज
माझ्या मते आदर्श प्रोफेसर हे हुशार, चांगले वक्ते नि श्रोते, मनमिळाऊ, समजून घेणारे, भेदभाव न करणारे, हसतखेळत शिकवणारे आणि प्रोफेसर असूनसुद्धा आपले एक चांगले मित्र असणारे असावेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या रुपारेलचे इब्नेझर मार्टनि. ते आम्हाला इंग्लिश शिकवतात. साधी राहणी नि उच्च विचारसरणी हेच त्यांचं वैशिष्टय़ आहे. ते शिकवत असताना विद्यार्थी अगदी उत्साहानं नि समरसून शिकतात. आम्हाला कितीही अवघड प्रश्न पडलेले असू देत, ते अगदी साध्या-सोप्या भाषेत समजावतात. शिकवताना थोडीशी मज्जा-मस्करी चालू असते. पण शिस्तीच्याबाबतीत ते अगदी काटेकोर आहेत. ते आम्हाला विविध गोष्टी शिकण्यासाठी कायमच प्रोत्साहन देतात. मार्टनि सर माझं आवडतं नि आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. भविष्यात मला कधी शिकवण्याची संधी मिळाली तर मी माझ्या डोळ्यांसमोर त्यांचाच आदर्श ठेवून शिकवण्यास सुरुवात करेन.
शांभवी खटाव, विल्सन कॉलेज
माझ्या आवडत्या प्रोफेसर आहेत इकॉनॉमिक्स शिकवणाऱ्या सुनीती पेठे. कारण त्या एकदम हसतखेळत शिकवतात. जेणे करून विद्यार्थ्यांना त्या गोष्टी पटकन लक्षात राहतील. नोट्स कशा काढाव्यात, अभ्यास कसा करावा, याविषयी त्यांनी मला मार्गदर्शन केलं. माझे आदर्श प्रोफेसर आहेत पॉलिटिकल सायन्सचे ‘एचओडी’ सुधाकर सोलोमन राज. त्यांचं शिकवणं मला खूप आवडतं. ते कडक शिस्तीचे भोक्ते असल्यानं त्यांची भीतीही वाटते. प्रत्येकाला किती नि काय समजलंय, हे त्यांना आमच्या चेहऱ्यावरून समजतं. केवळ परीक्षार्थी बनवून नुसतं पुस्तकी ज्ञानापेक्षा ते आम्हाला जनरल नॉलेजही देतात. त्यांनी दिलेल्या असाईनमेंट्सच्या इंटरेिस्टग टॉपिक्समधूनही खूप काही शिकायला मिळतं. ते मुलांच्या एक्स्ट्राकरिक्युलर अॅक्टिव्हिटीजना खूप सपोर्ट करतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना आपलं टॅलेंट इतरांसमोर दाखवायची संधी मिळून विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करून ते जणू विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्वं नव्यानं आकारतात. सुरुवातीला प्रत्येकाला त्यांच्याबद्दल भीती वाटली तरी नंतर त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होते. मलासुद्धा त्यांचा आदर्श ठेवत प्रोफेसर व्हायचंय.
प्रियांका पाटील, मिठीबाई कॉलेज
हल्ली बऱ्याचदा फक्तपरीक्षेपुरतं शिकवलं जातं. तसं केवळ परीक्षार्थी न बनविता जे आपल्याला त्या विषयाचं सखोल नॉलेज देतील, जे ज्ञान आपल्याला पुढील आयुष्यात उपयोगी पडेल, असे आदर्श प्राध्यापक हवेत. कारण कॉलेजमधल्या जडणघडणीच्या, अतिशय महत्त्वाच्या काळात आपण भरपूर गोष्टी शिकत असतो. आत्मसात करत असतो. म्हणूनच चांगलं मार्गदर्शन मिळाल्यास आपण एक चांगला माणूस म्हणून घडू शकतो. माझ्या आवडत्या नि आदर्श प्रोफेसर आहेत डॉ. नूपुर मेहरोत्रा. त्या फक्त शिकवायचं म्हणून शिकवत नाहीत, तर मनापासून शिकवतात. त्यांच्याकडचं बेस्ट नॉलेज इतरांना देतात. त्या बायोकेमिस्ट्री शिकवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं संशोधन केलं. केव्हाही नि कधीही विचारले जाणारे आमचे डाऊट्स त्यांनी कायमच पटकन सॉल्व्ह केले. मार्क कमी मिळाल्यास खंत करत न बसता अभ्यासासाठी मेहनत घेऊन पुढच्या वेळी चांगले मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करायलाच हवा, असे त्या कायमच कळकळीनं सांगतात.
ऐश्वर्या चौधरी, फग्र्युसन कॉलेज
माझे आदर्श प्रोफेसर आहेत ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या ‘यूपीएससी’ कोचिंग सेंटरचे हेड विवेक कुलकर्णी. त्यांच्या साध्यासुध्या राहणीमानाकडं बघून ते प्रोफेसर असतील, हे चटकन कुणाला पटणार नाही. त्यांनी सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवलेत. आयआयटी पवईतून उच्च शिक्षण घेतलेल्या सरांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून समाजकार्याची आवड म्हणून ‘ज्ञानप्रबोधिनी’ जॉईन केली. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आमच्या फग्र्युसन कॉलेजमधील जिऑग्राफीचे प्राध्यापक संजीव नलावडे हेदेखील माझे आवडते प्रोफेसर आहेत. त्यांच्यासारखा नम्र माणूस मी अद्याप बघितलेला नाही. एकदम शांतचित्तानं ते शिकवतात. एकदम ह्य़ुमरस स्टाईल आहे त्यांच्या शिकवण्यामध्ये. ते पक्षितज्ज्ञही आहेत. त्यांची पर्सनॅलिटी साधी असली तरी शिकवणं अप्रतिम आहे. आणखी एक म्हणजे, आपल्या आयुष्यात प्रोफेसर्सबद्दल पूर्वीइतका आदरभाव राहिलेला नाहीये, हे मला खटकतं. शिक्षकांचा आपल्या आयुष्यात फार मोलाचा वाटा असतो, ही भावना रुजवायला हवी. हे खरं असलं, तरीही ज्या प्रोफेसर्सना चांगलं शिकवणं जमत नाही, त्यांच्याबाबत काही तरी ठोस पावलं उचलायला हवीत. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातल्या या स्पॅनचा परिणाम त्यांच्या भविष्यावरही होणार असल्यानं याबद्दलचा विचार व्हायला हवा.
ऋचा क्षीरसागर, आर. ए. पोदार कॉलेज
आदर्श प्रोफेसर हे एक पॅकेज असलं पाहिजे. त्यांनी प्रामाणिक, सिंपल, नॉलेजेबल, असावं. ज्या मूल्यांची रुजवण प्रोफेसर्स विद्यार्थ्यांमध्ये करू इच्छितात, ती मूल्य त्यांनी स्वत:ही आचरावीत. विद्यार्थी प्रोफेसर्सना माणूसच समजत असल्यानं त्यांना सगळंच माहिती पाहिजे, अशी अपेक्षा ठेवत नाहीत, पण मुलंही माणूसच आहेत, याची कल्पना बऱ्याचदा प्रोफेसर्सना नसते. ही कल्पना प्रोफेसर्सना असणं नि त्यांनी विद्यार्थ्यांनाही समजून घेणं गरजेचं आहे. माझे आवडते प्रोफेसर आहेत आसिफ शेख. ते रिप्लेसमेंट म्हणून आल्यानं त्यांनी जेमतेम वर्षभरच आम्हाला शिकवलं. ते मॅथेमॅटिक्स शिकवतात. समोरच्या विद्यार्थ्यांना समजून घेऊन ते शिकवतात. त्यामुळं खूप कमी वेळात आम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकलो. सर समाजकार्यात अॅक्टिव्ह असून ते बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांना भेटलेत. सर आणि मी डॉ. बंग यांच्या ‘निर्माण’ संस्थेशी जोडलेलो होतो. आता सीएच्या अभ्यासामुळं मला या अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होता येत नाहीये. तरी समान आवडीमुळं हा विषय आम्ही शेअर करतो. कॉलेज क्राऊडची सायकॉलॉजी त्यांना परफेक्टली माहितेय. त्यांच्याकडे कधीही कोणतेही ‘सिली डाऊट्स’ घेऊन गेलं तरी कोणताही आविर्भाव न आणता ते प्रत्येक डाऊट ग्रेसफुली हॅण्डल करतात. ते कुणाच्याच बाबतीत जजमेंटल होत नाहीत. त्यांचा सगळ्यांशी खूप छान रॅपो आहे. आसिफ सर इज दॅट पॅकेज, असं मला वाटतं.
हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.