जसं तुमच्या कपडय़ांवरून, तुमच्या पेहरावावरून तुमची आवड-निवड कळते, स्टाईल समजते. तसं स्टाईल स्टेटमेंट देण्याची क्षमता छत्रीतही आहे. छत्री कशी आहे त्यावरून छत्री वापरणारी कशी असू शकेल, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
तो कसा?
मान्सून बरसतोय, आकाशात सगळं करडय़ा रंगाचं साम्राज्य आहे. या सीझनमध्ये आसमंतात रंगाची उधळण अगदी अभावानं दिसतेय. त्याची उणीव रस्यावरच्या रंगीबेरंगी छत्र्या भरून काढताहेत. छत्री म्हटल्यावर काळी असं समीकरण कुठल्या कुठे हद्दपार झालंय. नुसते ट्रेंडी कलरच नाही तर ट्रेंडी डिझाईनच्या छत्र्यांची फॅशन परेड रस्त्यात दिसायला लागलीय. हिरव्या, निळ्या, पिवळया, गुलाबी, इंद्रधनुष्याचे सगळे रंग अंगावर वागवणाऱ्या छत्र्या आल्यात. नुसत्या रंगात हे वैविध्य नाही तर आकारांमध्येही आहे.
यंदा अगदी वेळेवर सुरू झालेल्या मान्सूननं आत्तापर्यंत चांगलीच धुलाई केलीय. यंदाची छत्र्यांची खरेदी त्यामुळे अगदी जूनच्या पहिल्या आठवडय़ात सुरू झाली असेल. अजूनही ठिकठिकाणचं छत्र्यांचं मार्केट बहरलेलंच दिसतंय. स्टेशनबाहेरच्या पथारीवाल्यापासून ते आठ मजली मॉलपर्यंत सगळीकडे छत्र्यांची स्टॉल्स दिसतात. विक्रीच्या ठिकाणानुसार किमतीही बदलतात. छत्र्यांच्या ऑनलाईन शॉपिंसाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिझायनर छत्रांची रेंज १५० रुपयांपासून पुढे सुरू होते.
मुलांसाठी कार्टूनचे वेगवेगळे आकार असणारी, लांब कान वर आलेली, मांजरीचा आकार असणारी आणि मिकीचे कान असलेली अशा अनेक हटके छत्र्या पाहून कधी कधी आपल्यालाही त्या मोहात टाकतात. लेडिज छत्र्यांमध्ये असलेली व्हरायटी तर वेडं करते. फ्रील लावलेल्या सिंगल फोल्ड छत्र्यांची चलती आहे. अगदी आतापर्यंत लेडिज छत्र्या म्हणजे पर्समध्ये किंवा पिशवीत मावणाऱ्या प्रिंटेड टू फोल्ड छत्र्या एवढंच लोकांना माहिती होतं. पण आता सिंगल फोल्ड छत्र्यांमध्ये एवढे रंग आणि इतकी आकर्षक डिझाईन्स आली आहेत की, त्या पारंपरिक छोटय़ा छत्र्यांचा ट्रेंड त्यात पुरता धुवून निघालेला दिसतोय. या छ्त्र्या आकारानं मोठ्या असल्यानं धो धो पावसातही चांगली तग धरतात. टू- फोल्ड छत्र्यांपेक्षा या मजबूत असल्यामुळे टिकतातही जास्त. फक्त पाऊस नसेल तेव्हा ही त्या हातातच वागवाव्या लागतात. पण छत्री निवडताना तुम्ही किती विचार करता? फार नाही. नक्कीच. कारण जसं तुमच्या कपडय़ांवरून, तुमच्या पेहरावावरून तुमची आवड-निवड कळते, स्टाईल समजते. तसं स्टाईल स्टेटमेंट देण्याची क्षमता छत्रीतही आहे. छत्री कशी आहे त्यावरून छत्री वापरणारी कशी असू शकेल, याचा अंदाज बांधता येतो. यात अतिशयोक्ती अजिबात नाही.
गुलाबी, फ्लोरल प्रिंटची नाजूक छत्री वापरणारी रोमँटिक असू शकेल. साधी काळी मोठी छत्री वापरणारी फारच प्रॅक्टिकल. ब्राईट कलरची, वेगळ्या छंगाची छत्री जिच्या हातात आहे, ती तशीच उत्फुल्ल असण्याची शक्यता आहे. फ्रील लावलेली लेटेस्ट फॅशनची छत्री वापरणारी कदाचित फॅशन कॉन्शस असेल. एक एकदम हटके छत्रीवाली एकदा पाहण्यात आली. तिच्या छत्रीची मूठ बंदूकीच्या मुठीच्या आकाराची होती. ती मुलगी आक्रमकच असली पाहिजे, असं वाटलं.
डिझायनर छत्री जिच्या हाती ती नक्कीच चोखंदळ म्हणायला हवी. पण आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं डिझाईन तिनं निवडलं तरच. डिझायनर छत्र्यांमध्ये ब्राईट कलरना पसंती द्यायला हवी. त्या गडद रंगातच त्यांचं फॅशन स्टेटमेंट आहे. एकाच ब्राईट रंगाची फ्रील असलेली छत्री किंवा दोन रंगाच्या कॉम्बिनेशनची छत्री कॅज्युअल कॉलेजवेअरला अगदी सूट होते. प्रिंटेड छत्र्यांमध्ये पोल्का डॉट्स आणि बटरफ्लाय डिझाईन सध्या फॉर्ममध्ये आहे. काहीजणी आजही फॅशनच्या बरोबरीनं बरोबर न्यायला सोयीची छत्री शोधत असतात. छोटय़ा पर्समध्येही घडी करून राहील अशी थ्री फोल्ड छत्री त्यामुळे चलतीत असलेली दिसते. एका कंपनीनं तर यंदा फाईव्ह फोल्ड छत्री नॅनो अंब्रेला नावानं बाजारात आणली आहे. अगदी छोटय़ा पर्समध्येही मावेल एवढी छोटी तिची घडी होते. काळ्या रंगातही या छत्र्या दिसतायत.
पण मान्सूनच्या काळ्या- करडय़ा मळभ दाटलेल्या वातावरणात ब्राईट कलफूल छत्र्याच जान आणताहेत हे नक्की.
छत्रीतलं स्टाईल स्टेटमेंट
जसं तुमच्या कपडय़ांवरून, तुमच्या पेहरावावरून तुमची आवड-निवड कळते, स्टाईल समजते. तसं स्टाईल स्टेटमेंट देण्याची क्षमता छत्रीतही आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 19-07-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Styles in umbrella