तेजश्री गायकवाड viva@expressindia.comp
टोक्यो ऑलम्पिकमधील खेळाडू, त्यांच्यात रंगणारी स्पर्धा, विजयासाठीची धडपड, पदांची आशा-निराशा यावर सध्या सगळीकडेच आवर्जून चर्चा होते आहे. खेळाच्या या मैदानात जीवाची बाजी लावून खेळणाऱ्या या खेळाडूंची फॅ शन हाही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. खरंतर खेळाडूंसाठी त्यांच्या खेळाप्रमाणे ठरलेले कपडे असतात आणि तेच घालून ते स्पर्धेत खेळतात. त्यामुळे कपडय़ांपेक्षाही त्यांच्या अॅक्सेसरीजमधून त्यांच्या फॅशनची झलक दिसून येते. त्यांचं हे फॅशन स्टेटमेंट अनेकांना आकर्षित करून घेताना दिसत आहे. टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये खेळाबरोबरच फॅ शनसाठीही वाहवा मिळवणारे हे खेळाडू आहेत तरी कोण..
टोक्यो ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच भारतीय खेळाडूंना ब्रॅण्डेड कपडय़ांवर काट मारावी लागली, त्याउलट फक्त ‘इंडिया’ लिहिलेले खास कपडे या खेळाडूंनी मिरवले. अगदी ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात पथसंचलनात सहभागी झालेल्या पुरुष खेळाडूंनी परिधान के लेले गळाबंद जॅके ट आणि महिला खेळाडूंचा खाकी रंगाचा सलवार कु र्ता हाही चर्चेचा विषय ठरला. नैसर्गिक कापड आणि भारतातील महत्त्वाचे कापड असलेल्या खादीचा वापर या पेहरावासाठी करण्यात आला होता. निळ्या रंगाचे जॅकेट्स दोघांनीही परिधान के ले होते. मुलींसाठी खुले जॅकेट्स होते. त्या जॅकेटवर पुढच्या बाजूला आणि कॉलरवर सुंदर नाजूक नक्षीकाम होते. मुलांच्या बंद गळा जॅकेट्सवर असलेल्या बटणावरही नक्षीकाम होते. जॅकेट्सच्या पुढच्या बाजूवरील खिशावर ‘इंडिया’ असं लिहिलेलं होतं आणि त्या खाली ऑलिम्पिकचा लोगो होता.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये काही भारतीय खेळाडूंची फॅशन ही अगदी आकर्षित करणारी अशीच होती. यात पहिलं नाव घ्यायला हवं तेभारताला पहिल्याच दिवशी पदक मिळवून देणारी मीराबाई चानूचं.. तिच्या कर्णफुलांनी लोकांचं खास लक्ष वेधून घेतलं. मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. तिने कानात घातलेल्या कर्णफुलांची डिझाइन नीट निरखून बघितली तर ऑलिम्पिकच्या लोगोशी साधम्र्य साधणारी अशीच त्याची डिझाइन होती. ऑलम्पिकच्या लोगोमध्ये ज्या पद्धतीने पाच गोल एकात एक गुंफलेले आहेत तशीच रचना मीराबाईच्या कर्णफु लांमध्येही पाहायला मिळाली. खरं तर तिच्या या कर्णफु लांच्या डिझाइनमागे एक खास गोष्ट आहे. ही कर्णफुले तिच्या आईने पाच वर्षांपूर्वी दागिने विकून तिच्यासाठी बनवून घेतली होती. या कर्णफुलांनी तिचं नशीब चमकेल असा विश्वास तिच्या आईला होता. मीराबाईही या कर्णफुलांना तिच्यासाठी खूप लकी मानते. कर्णफुलांबरोबरच तिने केसांना लावलेल्या ‘हेअर बो’नेही लोकांचं खूप लक्ष वेधून घेतलं. त्यांचा तो कापडी बो केसांवर एखाद्या फुलाप्रमाणे माळल्यासारखाच दिसत होता. तो बो मीराबाईंच्या स्पर्धेच्या ड्रेसला मॅचिंग असा होता.
या शिवाय पी. व्ही. सिंधू आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्राने केलेलं नेल आर्ट हे ट्रेण्डिंग फॅशनचं उत्तम उदाहरण होतं. पी. व्ही. सिंधू आणि मनिका बत्रा या दोघी एरव्हीही त्यांच्या फॅ शन स्टेटमेंटसाठी ओळखल्या जातात. शिमरिंग ड्रेसेस, गाऊन्स अशा पद्धतीचे फॅ शनेबल ड्रेसेस विविध सोहळ्यांमधून पी. व्ही. सिंधू सहज कॅ री करताना दिसते.ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा खेळणारी मनिका बत्राही तिच्या हटके फॅ शनसाठी ओळखली जाते. या दोघींनीही ऑलिम्पिकमध्ये नेल आर्टच्या माध्यमातून आपले स्टाइल स्टेटमेंट दाखवून दिले. मनिकाच्या थंब नेलवर ऑलिम्पिक रिंग्ज बनवल्या होत्या. तर अंगठय़ावर निळ्या रंगामध्ये ‘भारत’ हा शब्द लिहिला होता. इतर दोन बोटांवर तिने राष्ट्रध्वज रंगवला होता, तर पी.व्ही. सिंधूने तिच्या मधल्या दोन बोटांच्या नखांवर पांढऱ्या रंगाचं नेलपॉलिश लावून त्यावर रंगीबेरंगी ऑलिम्पिक रिंग्ज साकारल्या होत्या. हे ऑलिम्पिक मॅनीक्युअर आता बऱ्याच वर्षांपासून प्रचलित आहे. २०१२ मध्ये लंडनमधील खेळांच्या वेळी असे मॅनीक्युअर मुख्य प्रवाहात आले होते, असे सांगितले जाते. तेव्हा जलतरणपटू मिस्सी फ्रँकलिन आणि रेबेका अॅडलिंग्टन यांनी देशभक्तीपर नेल आर्ट परिधान केले होते. नंतर या गोष्टींचा ट्रेण्डच आला जो आजही सुरू आहे. २०१२च्या आधी अगदी १९व्या शतकातही हा ट्रेण्ड बघितला गेला होता. १९८०च्या उत्तरार्धात ट्रॅक आणि फिल्ड अॅथलिटने तीन इंच रंगीबेरंगी टाचा रंगवल्या होत्या. या गोष्टीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. तर सगळ्यात पहिला प्रयोग फ्लॉरेन्स ग्रिफिथ -जोनर यांनी केला होता असं म्हटलं जातं.
अर्जुन पुरस्काराचा मानकरी असलेला भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हाही त्याच्या फॅ शनसाठी ओळखला जातो. टॅटू आणि रंगीबेरंगी अॅथलेटिक वेअरमध्ये दिसणाऱ्या मनप्रीतने या वेळी ऑलिम्पिकसाठी निवडल्या गेलेल्या ड्रेसमध्येही आपल्या व्यक्तिमत्त्वातील आणि खेळातील चमक दाखवून दिली आहे. भारतीय खेळाडूंसह अन्य देशांतील खेळाडूंनीही यंदा टोक्यो ऑलम्पिकमध्ये फॅशन ट्रेण्ड सेट केले. त्यामुळे या वेळी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळाबरोबरच फॅ शनचाही रंगतदार खेळ पाहायला मिळाला यात शंका नाही.