|| वेदवती चिपळूणकर
दीपिकाच्या मुंबई रिसेप्शनची लाल कांजीवरम साडी, प्रियांकाची हिरवी ‘एअरपोर्ट लुक’ची साडी, ईशा अंबानीने लग्नात नेसलेली तिच्या आईची ३३ वर्ष जुनी साडी, श्लोका मेहताचा वेडिंग लेहंगा या सगळ्यांच्या ड्रेपिंगमागे असलेला हात अखंड कामात होता. तो हात होता ‘डॉली जैन’ यांचा! साडी ड्रेपिंग याला मुळात त्यांनी कला म्हणून पाहिलं आणि करिअर म्हणून स्वत:ला त्यात झोकून दिलं.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाने सर्वानाच वेड लावलं होतं. प्रत्येकजण त्या इव्हेंटकडे आपापल्या दृष्टीने बघत होता. सगळा सोशल मीडिया त्यांच्या लग्नात अगदी बिझी होऊन गेला होता. त्यानंतरही प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी, आकाश अंबानी यांच्या लग्नांवर मीडिया आणि सोशल मीडियाही लक्ष ठेवून होता. मात्र सगळ्यात जास्त चर्चा होत होती ती अर्थात त्यांचे लुक्स आणि स्टायलिंगची! दीपिकाच्या मुंबई रिसेप्शनची लाल कांजीवरम साडी, प्रियांकाची हिरवी ‘एअरपोर्ट लुक’ची साडी, ईशा अंबानीने लग्नात नेसलेली तिच्या आईची ३३ वर्षं जुनी साडी, श्लोका मेहताचा वेडिंग लेहंगा या सगळ्यांच्या ड्रेपिंगमागे असलेला हात अखंड कामात होता. तो हात होता ‘डॉली जैन’ यांचा! साडी ड्रेपिंग याला मुळात त्यांनी कला म्हणून पाहिलं आणि करिअर म्हणून स्वत:ला त्यात झोकून दिलं. स्टायलिंगसुद्धा न विचारात घेता फक्त साडी ड्रेपिंगवर संपूर्ण लक्ष त्यांनी केंद्रित केलं आणि आज जवळजवळ संपूर्ण बॉलीवूडमध्ये त्यांना नावाजलं जातं.
वयाच्या बऱ्याच उशिराच्या टप्प्यावर डॉली यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यांच्या करिअरच्या, त्यांच्या कामाच्या मागे त्यांची सर्वात मोठी प्रेरणा कोणी असेल तर ते त्यांचे वडील! करिअरच्या आणि आयुष्याच्याही सर्वच टप्प्यांवर त्यांना त्यांच्या वडिलांचा कायम पाठिंबा मिळाला. त्या म्हणतात, ‘आई आणि बाबा या दोघांमुळे माझं जे काही आयुष्य आहे, करिअर आहे ते घडलेलं आहे. बाबांनी माझ्यातली पॅशन कायम जिवंत राहील याची काळजी घेतली आहे. कोणत्याच कठीण प्रसंगी प्रयत्न सोडायचे नाहीत हे मला माझ्या बाबांनी कायम शिकवलं आहे. भविष्यावर लक्ष ठेवून वाटचाल करायची हे बाबांचं व्हिजन त्यांनी माझ्यात रुजवलं. नवीन गोष्टी करून पाहण्याला त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. जेव्हा जेव्हा मी अडले आणि मला एक पुश मिळण्याची गरज होती तेव्हा तेव्हा बाबांनी कायमच मला तो पुश दिला आहे. प्रोफेशनल बाबतीत बाबा हे माझे गाइड आहेत तर आईने मला एक चांगली व्यक्ती म्हणून जगायला शिकवलं, अशा शब्दांत आईबाबांशी असलेलं आपलं नातं स्पष्ट करतानाच या व्यवसायात मिळवलेल्या नावलौकिकाचं श्रेयही त्या आपल्या आईवडिलांनाच देतात.
साडी ड्रेपिंग याच क्षेत्रात विशेषत्वाने काही करायचं असं काहीही ठरवलेलं नसताना डॉली यांना त्यांच्यातील कलेची हळूहळू जाणीव होत गेली आणि मग त्यांनी त्याला प्रोफेशनल स्वरूप द्यायला सुरुवात केली. साडी ड्रेपिंगच्या निवडीबद्दल त्या सांगतात, ‘मला स्वत:ला काही साडय़ांची विशेष आवड होती असं नाही, मात्र माझं लग्न अशा घरात झालं जिथे मला फक्त साडीच परिधान करावी लागायची. जेव्हा माझ्या लक्षात आलं की आता आपल्याकडे कपडय़ांचा हा एकच प्रकार आहे तेव्हा मी त्यावर प्रयोग करायला सुरुवात केली. एकाच साडीला वेगवेगळ्या पद्धतीने नेसायला सुरुवात केली. ड्रेपिंगच्या वेगवेगळ्या स्टाइल्स तयार करायला सुरुवात केली. हळू हळू मला हे लक्षात यायला लागलं की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने साडी ड्रेप करता येते. मात्र तेव्हा ते केवळ घरगुती होतं. त्यांचं हे साडी ड्रेपिंगचं कौशल्य इतरांना कळलं तेही एका छोटय़ाशा प्रयत्नामुळे.. विद्या शिकवल्याने वाढते म्हणतात. डॉली यांनी प्रत्यक्षात ते अनुभवलं.
आमच्या ओळखीत तीन-चार मुली होत्या ज्यांना साडी ड्रेपिंग शिकायचं होतं. त्यांच्या घरच्यांनी त्यांना माझ्याकडे पाठवलं. त्यांना ड्रेपिंग शिकवताना मला असं लक्षात आलं की मला अनेक पद्धतींनी ड्रेपिंग येतं. स्वत:ला साडी ड्रेप करताना काही मर्यादा येतात, मात्र त्यांना शिकवताना, त्यांना साडी ड्रेप करताना आतापर्यंत न करून पाहिलेल्या ड्रेपिंग स्टाइल्सही मला जमायला लागल्या. त्या मुलींपैकी एकीचं रायपूरला ग्रूमिंगचं वर्कशॉप होणार होतं. त्यात तिने एक दिवस माझ्या साडी ड्रेपिंग या विषयासाठी ठेवला आणि तिथून मला माझा पहिला क्लाएंट मिळाला, रायपूरमधला ‘हिरा ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज’! तिथून माझ्याकडे क्लाएण्ट्स यायला सुरुवात झाली, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा सोशल मीडिया वगैरे नसल्याने लोकांचे अनुभव हीच पब्लिसिटी होती. अशातून माझी खरं तर अचानकपणेच सुरुवात झाली, असं त्या म्हणतात.
साडी नेसवणं यात काही कौशल्य आहे, कला आहे आणि ते करिअरही आहे हे लोकांना पटायला जो वेळ गेला त्यात डॉली यांनी स्वत:ला स्वत:च स्ट्राँग ठेवलं आणि मागे न हटण्यावर त्या ठाम राहिल्या. ‘या ड्रेपिंगला आज जितका मिळतोय तितका मान तेव्हा मिळत नव्हता,’ करिअरच्या स्ट्रगलबद्दल त्या सांगतात. ‘साडी ड्रेपिंग यात करिअर होऊ शकतं हेच कोणाला विशेष पटत नव्हतं तर त्यात करिअर प्रत्यक्ष घडवणं किती अवघड असेल! मात्र मी कोणाकडेही लक्ष न देता माझ्या पॅशनप्रमाणे काम सुरू ठेवलं. माझ्या घरात एक मॅन्युक्विन घेऊ न ठेवलेलं होतं. रात्री एक वाजता उठून मी ड्रेपिंग करायला लागायचे. दिवसाच्या कोणत्याही वेळेला सुचेल तेव्हा हे ड्रेपिंगचे प्रयोग मी करत राहायचे. एखादा प्रयत्न चांगला जमला की मी त्याचा फोटो काढून ठेवायचे. अशा पद्धतीने मी हळू हळू स्वत:च्या स्टाइल्स तयार करायला सुरुवात केली. आता माझ्या ज्या स्टाइल्स सगळ्यांना आवडतात त्यांची मूळ सुरुवात तिथून झाली आहे’, असं त्यांनी सांगितलं.
बॉलीवूड सेलेब्रिटींमध्ये वावरणाऱ्या डॉली जैन यांच्या हाती साडी शिस्तीत वागते आणि कोणताही कपडा त्यांचं सगळं ऐकतो, अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलं जातं. आर्थिक बाजूचा कधीही विचार न करता केवळ पॅशन म्हणूनच त्यांनी कायम ड्रेपिंगकडे पाहिलं आहे. लोक त्यांना हसत असतानाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना मनापासून आनंद आहे. ‘ड्रेपिंग करता आलं नसतं तर मी दुसरं कोणतंच प्रोफेशन स्वीकारलं नसतं’, अशा शब्दांत डॉली त्यांच्या पॅशनचं वर्णन करतात. सेलेब्रिटींच्या बहुचर्चित लुक्सच्या मागे त्यांचे शब्दश: ‘करविते हात’ असतात.
प्रत्येक माणसाकडे काही ना काही कला असते. प्रत्येकाकडे काही दैवी देणगी असते आणि त्याच्यातून आपण काय करतो ती आपली त्या कलेप्रती असलेली कृतज्ञता असते. आपल्याला मिळालेली कला हे गॉड्स गिफ्ट आणि आपण त्यातून घडवलेलं आयुष्य, सौंदर्य हे आपण त्याला दिलेलं रिटर्न गिफ्ट या तत्त्वावर माझा विश्वास आहे. या विचाराने चाललो की आपोआप आपल्या अंगभूत गुणांना आपण न्याय देतो. – डॉली जैन