रश्मि वारंग
हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
कोणत्याही उद्योगाची उभारणी आर्थिक हेतूनेच होते, पण काही उद्योग त्यापलीकडे जाऊन अनेक गोष्टी साध्य करतात. एका मोठय़ा समूहाला आर्थिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान देतात. भारतीय महिलांना असाच आत्मविश्वास आणि आत्मसन्मान देणारा सुप्रसिद्ध ब्रॅण्ड म्हणजे श्री महिला गृहउद्योग समूहाचा ब्रॅण्ड लिज्जत. स्त्रीशक्तीचे, सबलीकरणाचे उत्तम उदाहरण ठरलेल्या या ब्रॅण्डची ही कहाणी!
मुंबईतील गिरगाव परिसरातील लोहाणा निवास इमारत म्हणजे परिसरातील इतर इमारतींसारखीच एक! पण इथल्या सात स्त्रियांच्या अनोख्या निर्धारामुळे ही इमारत एका मोठय़ा उद्योगाच्या पायाभरणीस कारणीभूत ठरली. या इमारतीत राहणाऱ्या या सात स्त्रिया कोणत्याही भारतीय गृहिणीसारखंच आयुष्य जगत होत्या. पण तेवढय़ावरच समाधानी न राहता आपल्या पाककौशल्याने आपण घराला हातभार लावला पाहिजे असं त्यांना मनातून वाटत होतं. १९५९ सालच्या मार्च महिन्यात त्याच परिसरातील सेवाभावी वृत्तीचे छगनलाल करमशी पारेख तथा छगनबाप्पा यांच्याकडून निव्वळ ८० रुपयाच्या भांडवलासह या सात जणींनी इमारतीच्या गच्चीवरच पापड लाटण्याचा उद्योग सुरू केला. दत्ताजी बावळा या सद्गृहस्थांचाही त्यांना पाठिंबा मिळाला. पहिल्या दिवशी पापडाची चार पाकिटं लाटून तयार झाली. कामाला सुरुवात झाली. तयार पापड भुलेश्वर परिसरातील ओळखीच्या व्यापाऱ्यांना विकले जात. या संपूर्ण व्यवसायात सातही जणी एका तत्त्वावर ठाम होत्या. जरी भविष्यात नुकसान झालं तरी कुणाहीकडून देणगी वा तत्सम मदत घ्यायची नाही. व्यवसाय स्वबळावर करायचा. सुरुवातीला पापड दोन प्रकारांत तयार केले जात. थोडे कमी दर्जाचे स्वस्त पापड आणि उत्तम दर्जाचे महाग पापड. पण छगनलालनी सल्ला दिला की, असं न करता दर्जा कायम ठेवायचा. त्यात तडजोड नको. हे तत्त्व त्या सात जणींनीच नाही तर भविष्यात विस्तारलेल्या उद्योगानेही पाळलं. एकच दर्जा कायम राखण्यात आला. तीन महिन्यांत या सात जणींच्या पंचवीस जणी झाल्या. पहिल्या वर्षी ६,१९६ रुपयांचे पापड विकले गेले. दरम्यान, अडचणी होत्याच पण त्यावर कौशल्याने उपाय शोधले जात होते. पहिल्या वर्षी पावसाळ्यात पापड वाळवायला जागा नव्हती त्यामुळे चार महिने व्यवसाय बंद ठेवावा लागला. पण नेहमी हे परवडणारं नव्हतं. पुढच्या वर्षी महिलांनी काही खाटा आणि स्टोव्ह विकत घेतले. खाटांवर पापड पसरून खाली स्टोव्हची मंद आच ठेवून पापड सुकवण्यात आले. पापडांचा उरलेला चुरा शेजारी-पाजारी वाटून दिला जाई. अशातून तोंडी प्रसिद्धीद्वारे या पापडांसाठी परिसरात मागणी वाढत गेली. पापड लाटायला येणाऱ्या महिलांची संख्याही वाढत होती. गच्चीत साऱ्यांना सामावून घेणं कठीण होतं. त्यावर उपाय म्हणून स्त्रियांना पापडाचं भिजवलेलं पीठ दिलं जाऊ लागलं. बायका पीठ घरी नेत आणि पापड लाटून सुकवून आणून देत. अशात तीन र्वष पूर्ण झाली. तेव्हा सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या या व्यवसायाला एका उत्तम नावाची गरज होती.
१९६२ साली छानसं नाव सुचवण्यासाठी सदस्य महिलांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. बक्षीस होतं पाच रुपये रोख! त्यातून या व्यवसायाला नाव मिळालं लिज्जत पापड. लज्जतदार या अर्थाने गुजराथी लिज्जत शब्दाची निवड करण्यात आली आणि उद्योग समूहाचं श्री महिला गृहउद्योग असं नाव निश्चित करण्यात आलं. श्री म्हणजे लक्ष्मी. प्रत्येक स्त्री हे लक्ष्मीचंच रूप असतं. त्यामुळे हा शब्द जाणीवपूर्वक निवडण्यात आला. श्री महिला गृहउद्योगचा लोगोही हेच दर्शवतो. त्यात हाती कमळ धरलेल्या स्त्री तथा लक्ष्मीचा हात आहे. म्हणजे या उद्योगातील गृहलक्ष्मींचं प्रतीकच!
हळूहळू हा पापड उद्योग मोठा होत गेला. यश आणि अपयश दोन्हींचा अनुभव या उद्योग समूहाने घेतला. या समूहाशी जोडली गेलेली प्रत्येक स्त्री उद्योगाची भागीदार आहे, कामगार नाही. ही बाब विशेषच. केवळ महिला भागीदारांच्या सहभागाचा हा जगातील एकमेव उद्योग समूह असावा. लोहाणा निवासच्या गच्चीत सुरू झालेला हा पापड व्यवसाय आज ८१ शाखा, २७ विभाग आणि ४३,००० महिला भागीदार यांच्यासह विस्तारला आहे. जेमतेम ८० रुपयांपासून सुरू झालेली उलाढाल २०१८ मध्ये ८०० कोटींच्या पुढे जाऊन पोहोचली आहे.
आजघडीला पहाटे ४.३० वाजता हा उद्योग सुरू होतो. ठिकठिकाणच्या गृहिणी विविध शाखांमधून भिजवलेले पाच किलो पीठ घरी घेऊन जातात किंवा तिथेच पापड लाटून देतात. कष्टणाऱ्या या हातांना ताबडतोब मिळणारा मोबदला दिलासा देणारा आहे. स्वबळावर उभं राहण्याचं सामथ्र्य देणारा आहे. विविध राज्यांमध्ये लिज्जत पापडच्या शाखा आहेत.
इथला माल इंग्लंड, अमेरिका, मध्यपूर्व देश, सिंगापूर, नेदरलॅण्ड्स, थायलंड अशा देशोदेशी जाऊन पोहोचला आहे. उद्योगाची परदेशी निर्यात आश्वासक आहे. आजवर अनेक सन्माननीय पुरस्कारांनी उद्योग समूहाला गौरवण्यात आलं आहे. पापडांसोबतच मसाले, गव्हाचं पीठ, ससा डिर्टजट पावडर ही उत्पादने देखील या समूहातर्फे तयार केली जातात.
हा ब्रॅण्ड सर्वपरिचित होण्याचं श्रेय, ऐंशीच्या दशकातील जाहिरातींनाही द्यावंच लागेल. आज महिला सबलीकरण करणारा ब्रॅण्ड म्हणून आपल्याला तो विशेष वाटत असला तरी या ब्रॅण्डची खरी ओळख रामदास पाध्येंच्या सुप्रसिद्ध ससुल्यानेच करून दिली होती हे विसरता येणार नाही. वैशिष्टय़पूर्ण आवाजात ‘कर्रम् कुर्रम कुर्रम कर्रम्’ करत पापड खाणारा तो ससा आणि ती जाहिरात अविस्मरणीय आहे.
पापड हे खरंतर मुख्य अन्न नाहीच. ते साधं तोंडी लावणं आहे. पण तरीही या साध्याशा पदार्थाच्या माध्यमातून एक मोठा उद्योग समूह आकाराला येणं अकल्पित आहे. पापड लोणची विकून काय होणार? असा विचार करत सर्वसामान्य गृहिणींना गृहीत धरणाऱ्यांना या उद्योगाने दिलेलं उत्तर मोलाचं आहे. स्त्री सक्षमीकरण म्हणताना तिचं मानसिक सबलीकरण जितकं महत्त्वाचं तितकंच आर्थिकही! आणि ते या ब्रॅण्डने उत्तमरीत्या केलं. तेलाच्या तळणीत उतरणारा पापड जसा फुलत जातो, तसंच अनेक स्त्रियांचं आयुष्य या ब्रॅण्डने फुलवलं, बहरवलं! रोजच्या कंटाळवाण्या जगण्याची चव बदलत या ब्रॅण्डने खरंच आयुष्यात कुरकुरीतपणा आणला, कधीही बेचव न होणाऱ्या लज्जतीचा.. आणि स्त्रियांनी स्त्रियांसाठी निर्माण केलेल्या स्त्रियांच्या आदर्शाचाही.
viva@expressindia.com