गेल्या आठवडय़ात नेमक्या महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवरच स्त्रीविषयक मानसिकतेची चर्चा सुरू होती. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या कट्टय़ांपासून ते खऱ्याखुऱ्या कट्टय़ांपर्यंत सगळीकडे पुन्हा एकदा निर्भयाविषयी बोललं जात होतं. ‘बीबीसी’साठी तयार केलेली ‘इंडियाज डॉटर’ ही डॉक्युमेंटरी आणि तिच्यावरची सरकारी बंदी हा चर्चेचा विषय होता. दिल्ली बलात्कार प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या एका आरोपीची निर्लज्ज बडबड आणि त्यातून दिसलेली पारंपरिक पुरुषी मानसिकता या डॉक्युमेंटरीमधून अधोरेखित झाली. ‘निर्भयां’ची घुसमट त्यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली.v30सरकारने त्या डॉक्युमेंटरीवर बंदी आणूनदेखील बीबीसी चॅनेल ४ वर ती दाखवण्यात आली आणि लगोलग यूटय़ूब आणि इतर सोशल मीडियावर त्याच्या लिंक्स अवतरल्या. यूटय़ूबने नंतर ती काढूनदेखील टाकली. तरीही इतर काही सोशल मीडिया शेअरिंगच्या साइट्सवर ती उपलब्ध होती. ती पाहिल्याचे अनेकांनी सांगितले. त्यावर सोशल नेटवर्किंगवरून प्रतिक्रियाही उमटू लागल्या. अजूनही त्याचा ओघ सुरू आहे. या डॉक्युमेंटरीला बंदी घालावी का इथपासून ते डॉक्युमेंटरीची गुणवत्ता, पाश्चात्त्य देशांनी रेप कॅपिटल म्हणून रंगवलेलं एकांगी चित्रण, तिहार जेलमध्ये जाऊन चित्रीकरण करण्याची दिलेली परवानगी अशा अनेक विषयांवर चर्चा झडल्या.
निर्भयाच्या आई-वडिलांचं या माध्यमातून जनतेसमोर येणं अगदीच भावुक करणारं होतं, मात्र आरोपीनं आणि त्याच्या वकिलांनी स्त्रियांविषयी केलेली टिप्पणी आणि त्यांच्या राहणीमानाविषयी आळवलेला सूर पाहून केवळ संतापजनक प्रतिक्रियाच आल्या. ब्लॉग, फेसबुक, ट्विरच्या माध्यमातून या वकीलद्वयींच्या मुक्ताफळांचा अनेकांनी समाचार घेतला. ‘ताली एक हाथ से नही बजती’ असं निर्लज्जपणे सांगणारा गुन्हेगार आणि त्याची बाजू घेणारे त्याचे वकील यांची वक्तव्य केवळ चीड आणणारी आहेत.
आता आरोपीच्या वकिलांविरुद्ध कारवाई करण्यासाठी याचिका करण्यात येत आहेत आणि त्यासाठी फेसबुकवरून लोकांना त्यात सहभागी करून घेण्यात येत आहे. जर जास्त लोक विरोधात असतील तर आपण हा खटला पुढे लढवणार नाही, असे एका एफ. एम. रेडिओ चॅनेलवर आरोपीच्या वकिलांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर  व्हॉट्सअपच्या माध्यमातून आर.जे. गिनी हिने लोकांना एस.एम.एस करून आपला निषेध व्यक्त करण्याचं आवाहन केलं. तेही झटक्यात व्हायरल झालं.
‘इंडियाज डॉटर’ हा माहितीपट अनेकांनी पाहिला. तन्वी दिवाण त्यांपैकीच एक. ती म्हणते, ‘ही डॉक्युमेंटरी पाहून माझ्या भावना संमिश्र होत्या. आरोपीचा निर्लज्जपणा पाहून राग येत होता आणि दुसऱ्या बाजूला या देशातील स्त्री म्हणून एक भीती उत्पन्न झाली. शिक्षण माणूस घडवत नाही हे आरोपीच्या वकिलाच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं.’
तर चार्मी छेडा म्हणाली, ‘डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो की, स्वत:ला वकील म्हणवणारी व्यक्ती १० व्या शतकात जगत आहे की देशातील स्त्रियांनी १० वर्षांत केलेली प्रगती त्यांनी पाहिलेली नाही? स्वत:च्या चुका लपवून आणि पुरुषी अहंकाराचं दर्शन घडवण्यातच त्यांना धन्यता वाटतेय अजून. आरोपीला दया दाखवण्यापेक्षा फाशी द्यावी असं वाटतं.’
निकिता घाडगे म्हणाली, ‘आरोपीला त्याच्या चुकीचं गांभीर्य तर सोडाच, साधा पश्चात्तापसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. याउलट निर्भयाची कशी चूक होती हे सांगताना त्याला लाज वाटत नाही. वकिलाच्या मूर्खपणाची तर कीव करावी तितकी कमीच. त्यांनासुद्धा शिक्षा करणे गरजेचे आहे.’
डॉक्युमेंटरी प्रसारित करावी की करू नये यावर संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. पण तुरुंगात जाऊन चित्रीकरणाची परवानगी दिली नसती तर ती बंदी आणायची वेळच आली नसती, असेही मत या माध्यमातून पुढे आले. ‘इफ यू आर अग्ली, इट्स नॉट द फॉल्ट ऑफ द मिरर’, असं म्हणून आपल्या समाजातील स्त्रियांविषयीचा दूषित दृष्टिकोन मान्य करणारी ट्विट्सही फिरत होती.
 (संकलन : कोमल आचरेकर)
 viva.loksatta@gmail.com     

Story img Loader