‘संपलंय सगळं काही. अर्थच उरला नाहीये. आता आईबाबा तर ओरडतीलच, पण त्याहीपेक्षा जास्त त्यांना किती वाईट वाटेल? माझ्या अभ्यासासाठी किती पैसे खर्च केलेले त्यांनी. क्लासला पैसे, पुस्तकांना पैसे, काय सांगू मी त्यांना? की मी नापास झाले? तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले म्हणून?आजूबाजूचे लोक मला नावं ठेवणाऱ  नातेवाईक हिणवणार. काय उत्तर देणार मी या सगळ्यांना?आयुष्यातली एवढय़ा महत्त्वाच्या परीक्षेत मी कशी काय नापास झाले? कसं फेस करू मी या सगळ्याला?खूप भीती वाटतेय मला. नाही.. मी नाहीच फेस करू शकणार हे. आत्महत्या..
‘‘अगं थांब थांब, उठू नकोस अशी पटकन. पडून राहा. घाबरू नकोस. काय गं तुम्ही आजकालच्या पोरी. कसले ते डाएट का काय ते करता आणि मग असं रस्त्यावर चक्कर येऊन पडण्याची वेळ येते. चक्कर आलेली तुला. मी त्याच रस्त्याने येत होते. पाच मिनिटांवरच होते माझे घर तिथून म्हणून घरी आणले. सकाळपासून काही खाल्ले नाहीयेस ना?या सफरचंदाच्या चार फोडी खा. बरं वाटेल. जरा घे. अगं घाबरू नकोस. मी म्हातारी काय करणार अगं तुला. घे.. खा.’’
खाल्ल्यावर तिला जरा तरतरी आली. तिने सभोवार नजर फिरवली. ‘‘तुम्ही जेवणाचे डबे पोहोचवता?’’ दु:खात बुडालेल्या तिला तिचे कुतूहल मात्र गप्प बसू देईना. ‘‘अच्छा, हे डबे होय, अगं मी खाणावळ चालवते. तिथले अधिकचे डबे आणून ठेवलेत इथे. बरं तू चहा घेणार ना? नाही घेच.’’ ‘‘तुम्ही एकटय़ाच सांभाळता? की फॅमिली बिजनेस आहे?’’ चहा संपेपर्यंत काहीतरी बोलायचे म्हणून ती बोलत होती. ‘‘फॅमिलीचाच म्हणायचा आता.’’ तिच्या काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून त्या लगेच म्हणाल्या. ‘‘अगं, म्हणजे माझे पती आणि मुलगा केव्हाच देवाघरी गेले. माझ्या मुलाला तो ६ वर्षांचा असताना एक असाध्य रोग झाला  खूप उपचार केल़े  होते-नव्हते ते सगळे पैसे खर्च केले. पण काही उपयोग झाला नाही. ७ वर्षांचा असताना तो गेला. त्यानंतर दोनच वर्षांत माझ्या मिस्टरांचा मोठय़ा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मी एकटीच.’’ सहज सांगावे तसे त्या बोलल्या. तिला मात्र फारच ओशाळल्यागत झाले. ‘‘सॉरी हां, म्हणजे मला माहिती नव्हते. एकटे वाटत असेल ना तुम्हाला आता फार?साहजिक आहे.’’ चहाचा शेवटचा घोट घेत ती जाण्याच्या बेतात वाक्य पूर्ण करणार तोच त्यांनी तिला मध्येच थांबविल़े  ‘‘छ़े  बिलकुल नाही. हां, म्हणजे ते दोघे गेल्यावर माझ्या आयुष्यात पोकळी जरूर निर्माण झाली. अगं, एकदा तर अशी वेळ आली की घरात खायला अन्न नव्हत़े  पैसेच शिल्लक नव्हते. कारण मनाशी पक्के ठरवले आत्महत्या करायची़  जगून काय करायचे असे वाटले, नेमके त्याच दिवशी माझ्या शेजारणीने मला तिच्याबरोबर एका हॉस्पिटलमध्ये येण्याचा आग्रह केला. तिच्या नातेवाईकाला पाहायला जायचे होते. तिथून आल्यावर आपण आत्महत्या करायची हा विचार मी मनात पक्का केलेला़  पण त्याच दिवशी माझे संपूर्ण आयुष्यच पालटले. त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे वेदनेने विव्हळणारी माणसे मला दिसली. व्याधिग्रस्त झालेले, पण तरीही जगण्याची दुर्दम्य इच्छा बाळगलेले रुग्ण मला दिसले. त्या रुग्णांचे आयुष्य वाढावे यासाठी पराकोटीचे प्रयत्न करणारे आप्तस्वकीय मला दिसले. तिथे सगळयांना फक्त एकच गोष्ट हवी होती  जीवऩ  जगणे. आणि मी मात्र माझ्याकडे अजूनही शाबूत असलेली ही गोष्ट संपवण्याचा प्रयत्न करीत होते. त्या क्षणी मला माझी चूक कळली. मी माझा निर्णय बदलला. अर्थात पुढच्या आयुष्यात बरेच कठीण प्रसंग आल़े  पण म्हणून मी माझ्या जिवाची अवहेलना कधीच केली नाही.’’ हे सारे ऐकून ती सुन्न झाली होती  मात्र मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते. काहीशा सुन्नतेनेच ती म्हणाली  ‘‘तुमच्या जागी मी असते तर कदाचित आत्महत्येचा पर्याय निवडला असता,’’ काहीशा खिन्न हसून त्या म्हणाल्या ‘‘तुमची पिढी ना खरे तर खूप हुशार आह़े  अत्यंत मेहनती आहे, पण जेव्हा सहनशक्तीची वेळ येते तेव्हा मात्र मार खाता. तुम्ही समजून घ्यायला हवे की परिस्थितीसमोर तग धरणे याचा अर्थ काही तिला शरण जाणे नसतो  तर या संकटापेक्षा मी माझ्या आयुष्याला जास्त किंमत देतो असा असतो. मला तर वाटते की संकटे आल्यावरच आपण खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करतो. जन्माला येताना आपल्याला हे आयुष्य मिळालेले असते, पण परिस्थितीचे चटके सोसून पार पडल्यावर आपण आयुष्य कमावलेले असते. काही जण या चटक्यांना घाबरून सोन्यासारखे आयुष्य गमावून बसतात, पण जे या चटक्यांतून तावून सुलाखून पार पडतात त्यांना मात्र अमूल्य असा आयुष्याचा ठेवा मिळतो.’’ ती ऐकत होती. विचारांचे वादळ आता शांत झाले होते. ‘‘अरे बापरे, किती वेळ बोलले मी. मीपण ना, कोणत्याही वेळी काहीही बोलते.’’ ‘‘नाही नाही आज्जी  तुम्ही अगदी योग्य वेळी, योग्य गोष्टी बोलला आहात. तुमचे खूप आभार. मला शुद्ध हरपण्यापासून वाचवण्यासाठी.’’