१९२६ मध्ये अर्थशास्त्रज्ञ जॉर्ज टेलर यांनी एक वेगळी संकल्पना मांडली होती – ‘हेमलाइन इंडेक्स’ नावाची. त्यानुसार स्कर्टची लांबी आणि देशाची अर्थव्यवस्था यामधील संबंध दाखवण्याचा प्रयत्न केला होता. देशाची अर्थव्यवस्था जितकी उत्तम तितकी त्या देशातील स्त्रियांच्या स्कर्ट्सची उंची आखूड असते. जसजसा देश आर्थिक डबघाईला जातो तशी स्कर्ट्सची उंची वाढत जाते. अर्थातच या संकल्पनेवर त्या वेळी अनेक वादविवाद घडले. तरीही पुढे अनेक अर्थविश्लेषकांनी ही थेअरी पुन्हा आजमावून पाहण्याचा मोह आवरला नाही.
या संकल्पनेला दुजोरा देणारी उदाहरणेही सापडतात. पण परिमाण काहीही असो, थेट अर्थतज्ज्ञांना विचारात पाडणाऱ्या स्कर्टच्या फॅशनची नोंद घेतलीच पाहिजे. कारण उन्हाळ्याचा मौसम म्हणजे स्कर्ट्सची फॅशन येणारच.
उन्हाळ्यात टीव्हीवरच्या कुकरी शोमध्ये आंब्याच्या नाना प्रकारच्या पाककृती दाखवल्या जातात, त्याप्रमाणेच या मौसमात देशोदेशीचे फॅशन स्ट्रीट स्कर्ट्सनी रंगून जातात. यंदाचा सीझनही अपवाद नाही. पण मजा म्हणजे यंदा तुम्हाला साठीच्या मिनी स्कर्ट्सपासून ते नव्वदच्या दशकातील जिप्सी स्कर्ट्सपर्यंत याची विविध रूपं पाहायला मिळतील. सो स्कर्ट लव्हर्स गिअर अप, इट्स युअर टाइम टू शाइन..
मागशी म्हटल्याप्रमाणे स्कर्ट्सचे भरपूर प्रकार आहेत. पण आपल्याकडे फ्लेअर स्कर्ट्सचा बोलबाला अधिक आहे. विशेषत: मल्टीकलर जिप्सी स्कर्ट्सचा. एखाद्या टी-शर्ट, गंजीवर जिप्सी स्कर्ट घाला, वाटल्यास श्रग किंवा मोठा नेकपीस आणि कूल समर लुक तयार. यात फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. फ्लेअर स्कर्टमध्ये तर मिड-लेंथ (गुडघ्यापर्यंत), काफ लेंथ (घोटय़ाच्या वर), अँकल लेंथ, फ्लोअर लेन्थ असे अनेक प्रकार आहेत. फ्लेअर मिनी स्कर्टसुद्धा मस्त दिसतो. हे स्कर्ट शिवायलासुद्धा अगदी सोप्पे आहेत. कपडा बायसवर दुमडा आणि वरच्या बाजूस कमरेच्या मापाने वर्तुळाकार आकार कापा.
खालच्या बाजूला तुम्हाला अपेक्षित उंचीनुसार वर्तुळाकार कट द्या. वेस्टबँडला शिवून तुमचा स्कर्ट तयार. फ्लेअर स्कर्ट्सना जादाचा घेरा देण्याच्या विविध पद्धतीसुद्धा आहेत. प्लिट्स, पॅनल्स यांचा वापर तुम्ही करू शकता. फॉर्मल्समध्ये बॉक्स प्लिट स्कर्ट्स वेगळा लुक देतात.
नेहमीच्या पेन्सिल किंवा टय़ूब स्कर्ट्सना हा वेगळा पर्याय ठरू शकतात. ऑफिस वेअरमध्ये ट्रम्पेट स्कर्ट्ससुद्धा यंदा ट्रेंडमध्ये आहेत. हा पेन्सिल स्कर्ट्सचाच एक प्रकार असून त्याच्या हेमलाइनला असलेले रफल्स, फ्लेअर याला ट्विस्ट देतात. फॉर्मल जॅकेट किंवा शर्टसोबत हे स्कर्ट सहज घालू शकता.
अकॉíडअन किंवा नाइफ प्लिट्स हा प्रकार मागील काही सीझनपासून स्कर्ट्समध्ये पाहायला मिळतोय. त्यात प्लिट्सची लांबी कमी असल्याने संख्या जास्त असते. बाजारात थोडंसं धुंडाळल्यास तुम्हाला या प्लिट्स केलेलं तयार कापडसुद्धा मिळू शकतं. पेस्टल किंवा मेटॅलिक कापड या स्कर्ट्ससाठी शोभून दिसतं. स्कर्ट्स आणि त्यातील विविध प्रकार फॅशनप्रेमींना वेगळे नाहीत. पण तरीही बाजारात मिळणाऱ्या स्कर्ट्सपेक्षा हटके स्कर्ट हवा असल्यास छोटय़ा ट्रिक्स आणि प्रयोग नक्कीच करावे लागतील.
* फ्लेअर स्कर्ट म्हणजे सुळसुळीत कापड अशी जोडी पूर्वापार बनलेली आहे. पण स्टिफ किंवा जाड कापडाला पॅनल्स देऊन फ्लेअर स्कर्ट बनवून पाहा. तो नक्कीच वेगळा लुक देईल.
* तुमच्या फ्लेअर स्कर्टला समोरच्या बाजूला स्लीट द्या आणि स्कर्टसोबत कॉन्ट्रास्ट रंगाची लेगिंग घाला. टय़ुनिक किंवा टी-शर्ट लेगिंगच्या रंगाचा असू द्या. जॉर्जेटचे स्कर्ट यासाठी उत्तम आहेत. मिडलेन्थ स्कर्टसोबत अँकल लेन्थ लेगिंग घालू शकता.
* स्कर्टच्या स्लिटला झिपर लावून बघा. फक्त स्कर्ट घालायचा असल्यास गरजेइतक्या लांबीपर्यंत झिप बंद करून स्लिट कमी करता येईल. झिप मेटालिक आणि हायलाइट करणारी असू दे.
* रफल्स, िफजेस हे या सिझनचे हायलाइटर्स आहेत. स्कर्टच्या हेम किंवा वेस्टला यांचा वापर नक्की करा. वेस्टलाइनला फ्रिंजेस लावल्यास स्कर्टला वेगळा इफेक्ट मिळतो.
* डेनिम स्कर्टचा ट्रेंड पुन्हा येतोय. त्यामुळे यंदा जीन्सऐवजी स्कर्ट तुमच्या शॉपिंग यादीत असू दे.
* एकाच रंगाचा टॉप आणि स्कर्ट हा मॅचिंगचा फंडा यंदा ट्रेंडमध्ये आहे. फक्त दोघांची शेड एकच असली पाहिजे. प्लेन स्कर्ट आणि टॉप घालणार असाल तर मात्र दोन वेगवेगळ्या शेड्स वापरता येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा