|| शेफ अनघा गोडबोले

सध्या पंख्याची जागा ए.सी.ने आणि साध्या पाण्याची जागा थंडगार पाण्याने घेतली आहे. कडक उन्हाळा आता चांगलाच जाणवू लागलाय. म्हणूनच आम्ही ‘व्हिवा’ वाचकांसाठी खास समर फूडची सीरिज घेऊन आलो आहोत. शेफ अनघा आपल्याला एप्रिल महिन्यात जगभरातील समर फूडची सैर करायला नेणार आहेत. सीरिजच्या सुरुवातीला शेफ अनघा आपल्याला मेक्सिकोतल्या समर फूडची ओळख करून देणार आहेत.

थेट अमेरिकेतून आपल्या माणसांशी जेव्हा संवाद साधायला मिळतो तेव्हाचा आनंद काही निराळा असतो. ऋतुचक्रानुसार मनुष्याचा आहार ठरलेला असतो. उन्हाळ्यात शरीर उष्ण असतं त्यामुळे शरीराला व मनाला कूल ठेवण्यासाठी नाना पेयं प्यायली जातात, उपयुक्त पदार्थ खाल्ले जातात. या आगळ्यावेगळ्या खाबूगिरीची सुरुवात मेक्सिको या देशापासून करूयात.

मेक्सिको हे एक अमेरिकेच्या दक्षिणेकडे वसलेलं भव्य राष्ट्र आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास अशा राज्यांमधून दक्षिणेकडे जाताना मेक्सिकोची सीमा दिसते. खरंतर कॅलिफोर्निया हे राज्य पूर्वीच्या काळी मेक्सिको देशाचा भाग होता. मायनस आणि अ‍ॅझटेकस सारख्या जमाती या मेक्सिको देशाच्या मूळ रहिवासी आहेत. १५०० सालानंतर स्पेन आणि फ्रान्स यांनी मेक्सिको देशावर आक्रमण करून सत्ता चालवली. मेक्सिको देश आपले कलाकौशल्य व संगीतासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे निसर्गसौंदर्यही खूप सुंदररीत्या अनुभवायला मिळतं. आकर्षक पर्वत प्रदेश ते नयनरम्य समुद्रकिनारे यामुळे मेक्सिको हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थान आहे. स्पॅनिश भाषेत पार्टीला फिएस्टा असं म्हणतात, मेक्सिकन लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही अगदी असाच आहे. मित्रमंडळ, फॅमिली, मस्त म्युझिक, छान खाणे आणि थंड बीअर असली की ही मंडळी खूश!

मेक्सिकोमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळं खाणं असतं. मध्यवर्ती भागात जास्त तिखट, तर समुद्रकिनारी भागात माशांचा वापर जेवणात जास्त होताना आढळतो. वेगवेगळ्या संस्कृतींचा मेक्सिकोच्या खाण्यावरचा प्रभाव दिसून येतो. माया अँड अझ्टेक लोक मका, कडधान्य, भोपळ्याचा वापर त्यांच्या आहारात करतात. ते स्वत: याची शेतीसुद्धा करतात. अझ्टेक लोकांनी चॉकोलेट किंवा कोकोचा शोध लावला. त्याचा वापर मेक्सिकन कुझिनमध्ये तिखट आणि गोड पदार्थात हमखास केला जातो. स्पॅनिश लोकांकडून आलेला भात आणि फ्रेंच लोकांकडून आलेला ब्रेड हा आता मेक्सिकोच्या खाण्याचा महत्त्वाचा भाग आहे. पोर्तुगीज आणि वेस्ट आफ्रिकन खाद्यपदार्थाचा देखील मेक्सिकन खाण्यावर प्रभाव थोडय़ा प्रमाणात दिसतो.

मेक्सिको हा उष्ण तापमानाचा देश असल्यामुळे इथे ं०४ं ऋ१ी२ूं म्हणजेच ताजे पाणी हे सरबताइतकेच खूप पॉप्युलर आहे. अननस, आंबा, स्ट्रॉबेरी सारख्या फळांच्या चवीचे पाणी इथे उपलब्ध असते. ज्याची चव कडक उन्हाळ्यात चाखल्याने जिभेला एक वेगळीच तृप्ती मिळते. या पाण्याचे असंख्य वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. जसं आंबटगोड चिंचेच्या चवीचं गूळमिश्रित पाणी, तांदूळ भिजवून केलेलं ऌ१ूँं३ं, जास्वंदीच्या वाळलेल्या फुलाचे लालभडक फ्रेश पाणी. हे पाणी फक्त दिसायला किंवा चवीलाच छान नाही, तर याच्यात शरीरासाठी आवश्यक असणारे औषधी गुणसुद्धा भरभरून आहेत.

जमैका (हामाईका) हे जास्वंदीचे वाळवलेले फूल असते. त्याचे हे सरबत मेक्सिकोमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. हे अगदी कोकम सरबतासारखे लागते.

मका हा मेक्सिकोच्या जेवणाचा एक अविभाज्य घटक आहे. अझ्टेक आणि माया लोक तब्बल ७००० वर्षांपासून मक्याची शेती करत आहेत. पोळी वजा टॉर्टिया, होमिनी नावाचे सूप, कणसाच्या सालात वाफवलेले तमाले अशा विविध पद्धतींनी मका वापरला जातो.

कुठलेही मेक्सिकन जेवण एका चविष्ट साल्साशिवाय अपूर्ण आहे. जशी भारतीय जेवणात डाव्या बाजूला चटणी किंवा लोणचे असते तसाच हा साल्सा. टोमॅटो, कांदा, लसूण आणि मिरची यांचं परिपूर्ण मिश्रण यामध्ये असतं. काहीवेळेस फळांचे तुकडे देखील साल्सात वापरलेले आढळतात. कॉर्न चिप्सबरोबर, चिकन वा फिशबरोबर साल्साची चव अधिकच खुलून येते. मेक्सिकोमध्ये साल्सा उन्हाळ्यात आवर्जून खाल्ला जातो. उन्हाळ्यात रस्त्यावर जागोजागी टॅकोजचे स्टॉल्स दिसतात. मक्याची पोळी, ग्रिल केलेले चिकन किंवा फिश हा आहार उन्हाळ्यात आढळतो. ‘ग्वाकामोली’ हा पदार्थ मेक्सिकन लोक शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी खाताना दिसतात. ग्वाकामोली हा क्रिमी पदार्थ आहे. अवोकाडो नावाच्या फळापासून तयार होणाऱ्या या पदार्थाची ओळख आपण कोशिंबीर या अनुषंगानेसुद्धा करून घेऊ  शकतो.

मेक्सिकोमध्ये हवा गरम व्हायला लागली की सगळ्यांना काहीतरी हलकफुलकं खावंसं वाटतं. मेक्सिकोमध्ये उन्हाळ्यात एक हलकीफुलकी डिश आवर्जून खाल्ली जाते ती म्हणजे ‘सेव्हीचे’. या डिशमध्ये माशाचे तुकडे लिंबाच्या रसात भिजवत ठेवून शिजवले जातात. सगळ्या लॅटिन देशांमध्ये ही डिश पाहायला मिळते.

उन्हाळ्यात मेक्सिकोमध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. तिथे चुरेस हे हमखास मिळतात. गल्लोगल्ली चुर्रेरिया दिसतात. चुरेस हा मैद्यापासून बनवला जातो. त्यावर दालचिनी मिश्रित साखर घालून तो खाल्ला जातो. मेक्सिकोचे हवामान गरम असल्यामुळे इथे ताजी फळं, हलकाफुलका आहार उन्हाळ्यात दिसून येतो. मेक्सिकोमध्ये उन्हाळ्यात कैरी, आंबा, अननस, चेरीमोया, सपोटे, पॅशनफ्रूट, सीताफळ, चिकू या फळांवर ताव मारला जातो.

भारतीय पॅलेटला साम्य असलेले हे मेक्सिकोचे खाणे सर्व जगभर प्रसिद्ध आहे

 

जास्वंदाचं सरबत

साहित्य : दोन कप कोरडी जास्वंदीची फुले, एकूण २० कप पाणी, पावणेदोन कप साखर

कृती : एका भांडय़ात सहा कप पाणी घेऊन उकळायला ठेवा, त्यात स्वच्छ धुतलेली जास्वंदाची फुलं घाला आणि मंद आचेवर ५ ते ७ मिनिटं उकळून घ्या. आता त्यात साखर घाला. साखर विरघळेपर्यंत उकळवा. गॅसवरून काढून १ ते २ तास फ्रीजमध्ये सरबत छान थंड करा. मिश्रण गाळून घेऊन त्यात १४ कप पाणी घाला. आवश्यकतेनुसार साखर घाला. बर्फाचा खडा घालून सव्‍‌र्ह करा.

 

सेव्हीचे

साहित्य : २ टिलापियासारखा मासा, लहान तुकडे करून बारीक चिरून घ्यावे, १ कप लिंबाचा रस, १/४ कांदा बारीक चिरून, २ बारीक हिरव्या काकडय़ा चिरून (जर बिया मोठय़ा असतील तर काढून टाकाव्यात), १ सेरानो मिरची बारीक चिरून, १/२ कप चिरलेली कोथिंबीर, १ टोमॅटो चिरलेला, चवीनुसार मीठ.

कृती : लिंबाचा रस आणि माशाचे तुकडे एक भांडय़ात घ्या. जेणेकरून सर्व तुकडे लिंबाच्या रसाने झाकले जातील. कधीकधी मी यात लिंबांबरोबर संत्र्याचा रसही वापरते. किंचित गोड आणि पदार्थाला छान रंग येतो. हे मिश्रण फ्रीजमध्ये किमान ४५ मिनिटे ठेवा. फ्रीजमधून बाहेर काढून एकदा खात्री करून घ्या की मासा पांढऱ्या रंगाचा झाला आहे का? झाला असेल तर तो पुढच्या कृतीसाठी रेडी आहे. मासे फ्रीजमध्ये असताना सर्व भाज्या चिरून घ्या आणि त्या एकत्र एका वाडग्यात मिसळा. त्यात चवीनुसार मीठ घाला. माशांना भाज्यांच्या मिश्रणामध्ये घाला आणि सर्व काही हलक्या हाताने चांगले मिसळा. मासे कुस्करू नका. कॉर्न चिप्सबरोबर सव्‍‌र्ह करा सेव्हीचे..

viva@expressindia.com