मार्चअखेर म्हणजे परीक्षा संपून धमाल करायची, सुट्टी एन्जॉय करायची, ही मानसिकता तरुण मुलांची होती. पण जसा काळ बदलतोय आणि गरजा बदलत आहेत तशीच तरुणांची सुट्टी कशी घालवायची, ही मानसिकताही बदलत आहे.
म्हणजे बघा, पूर्वी सुट्टी लागली की तरुण मुले कुठे तरी पर्यटनाला जात किंवा स्वत:च्या गावी जात असत. ही स्थिती बदलून गेल्या काही वर्षांत तरुण मंडळी रिकाम्या वेळात छंदवर्गाला जात असत, जसे कॅलिग्राफी, स्केटिंग, पोहणे, चित्रकला इत्यादी. आता हा ट्रेंडदेखील बदलत आहे. आताच्या तरुण पिढीत ‘अर्निग अ‍ॅण्ड लर्निग’ ही संकल्पना रूढ होऊ लागली आहे.
शिकता शिकता पैसे कमावणे ही संकल्पना खरे तर आपल्या आधीच्या पिढीपासून आलेली आहे. काळाची गरज म्हणून शिक्षण तर हवेच, पण थोडे काही तरी वेगळे करावे म्हणून समर जॉब करावा अशी संकल्पना सध्या रुजू लागली आहे. भारतात ही संकल्पना आपल्याकडे खूप आधीपासून असली तरी त्यापेक्षा जास्त अमेरिकन कन्सेप्ट म्हणून लोकप्रिय झाली आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये व्यक्तिस्वातंत्र्यामुळे मुले तेरा-चौदा वर्षांची झाली की सुट्टीत नोकरी करतात.
भारतात आता ही संकल्पना नव्याने रुजू होताना दिसते. दोन-तीन महिन्यांच्या सुट्टीत नोकरी केली की नोकरीच्या ठिकाणी थोडय़ा ओळखीही होतात, ज्या करियरच्या पुढच्या वाटचालीला उपयोगी ठरतात. कॉलेजमधल्या पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर केल्यामुळे काम कसे करायचे, हा अनुभवही घेता येतो. सीनियर्सशी कसे बोलायचे, कामाच्या ठिकाणी प्रोफेशनली कसे वागायचे, हेपण कळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चार लोकांत वावरल्याने आत्मविश्वास येतो तो वेगळाच. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात समर जॉब केला तर करिअरच्या दृष्टीने खूप काही शिकायलादेखील मिळते आणि काही पैसे खिशात खुळखुळतात.
वित्त कंपन्या, खाजगी कंपन्या, प्रसारमाध्यमांतले काही विभाग, कन्सल्टंसी फर्मस्, अभियांत्रिकी कंपन्या इत्यादी ठिकाणी समर जॉब्स् करता येतात. सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात कॉलेजमधील युवकांना कामावर ठेवले तर कंपनीचे काम चालू राहते व मुलांना शिकायला मिळते. काही जण छोटय़ा ठिकाणी समर जॉब करणे पसंत करतात. जसे ट्रॅव्हल कंपन्या / ब्यूटिपार्लर. अशा ठिकाणी सुट्टीचे दोन महिने असिस्टंट म्हणून नोकरी के ल्याने हौस पूर्ण होते, शिवाय पैसेही मिळतात.
तर मित्रांनो, तुम्हीही करणार ना समर जॉब!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा