‘बैठे बैठे क्या करे, करना हैं कुछ काम, शुरू करो ‘समर जॉब’ ढुंढना, लेकर प्रभू का नाम..‘ हाय फ्रेण्डस्! अंताक्षरी खेळण्यासाठी उपयोगी पडणारं हे गाणं तुम्ही बरोबर वाचलंत. फक्त आपल्याला अंताक्षरी खेळायची नाहीये, तर समर जॉब शोधायचाय. कसं आहे की, बऱ्याच जणांच्या परीक्षा संपल्यात. काहींच्या संपायच्या बेतात आहेत. काहींचा अभ्यास २४x७ चालूच असतो, त्यांच्या नादाला आपण लागायचंच नाहीये. तर मंडळी या उन्हाळी सुट्टीत तुम्ही काय करताय? काय प्लॅन्स आहेत तुमचे?
हो, हो.. मला मान्य आहे की, अभ्यास करून थकल्याभागल्या जिवांना आराम हवा. विरंगुळा हवा. म्हणून मग भरपेट झोप, भरपूर खाणं-पिणं, मनसोक्तखेळणं, वाटेल तेवढं नि तसं हुंदडणंही. बाहेरगावी आऊटिंगला जाणं, चार चार पिक्चर बघणं, नेटवर पडिक असणं, एसएमएसचा रतीब घालणं असे सुट्टीफेम उद्योग तुम्हाला करायचेत. पण एक सांगा, की हे सगळं किती दिवस करणार? या लांबलचक उन्हाळी सुट्टीचा उपयोग ‘उन्हाळी उद्योगा’साठी केलात तर?
जागे व्हा, मित्रहो, जागे व्हा.. तुम्हाला ‘उन्हाळी उद्योगा’बद्दल माहीत नाही? की माहीत करून न घेता फक्त आळशीपणा करायचाय? आता परदेशाएवढे भारतात समर जॉब्स मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत, ही खरी गोष्ट आहे. हळूहळू परिस्थिती बदलत्येय, त्यामुळे निराश व्हायचं कारण नाही. आपण समर जॉबचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, याकडे आपण लक्ष द्यायला हवं.  
जरा आजूबाजूला बघा की.. परवाच असितचा ग्रुप ‘सीसीडी’मध्ये गेला होता.
तिथे त्यांना एस.वाय.मधला जॉय भेटला. सुट्टीत त्यानं ‘सीसीडी’मधलं काम स्वीकारलं होतं. असितचा ग्रुप तर बघतच राहिला. जॉय किती पटापट काम करत होता ते.. फक्त ‘सीसीडी’ कशाला किती तरी रेस्टॉरंटस्, पब्ज, शैक्षणिक संस्था, क्लासेस आदी किती तरी ठिकाणी विद्यार्थी काम करू लागल्येत. कारण या विद्यार्थ्यांचा कल उन्हाळी सुट्टीत फक्त मौजमजा करण्याचा नसतो. उलट आपली स्किल्स वाढवून त्यांचा आपल्या करिअरला कसा उपयोग होईल, याचाही विचार ते करतात. काही जण केवळ पॉकेटमनीसाठी, कुणी आवडत्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या फीसाठी, कुणी केवळ आवड म्हणून सुट्टीत काम करतंय, कुणी समाजसेवेची आवड म्हणून काम करतंय.  
आपण जे शिकतोय, त्याला पूरक ठरून त्यातला अनुभव गाठीशी बांधण्याचा विचारही केला जातो. संचिता टूर अँण्ड ट्रॅव्हलचा कोर्स करतानाच ट्रॅव्हल एजन्सीसाठी टूर गाईड म्हणून काम करत्येय. काही जण अभ्यासाखेरीज प्रत्यक्ष कामातला अनुभव बरंच काही शिकवतो, असा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून काम करतात. त्यात पसेही मिळतात आणि व्यावहारिक शिक्षणही मिळतं. असं काम मिळवण्यासाठी ही मंडळी थोडी आधीच तयारी करतात. कॉलेजचे नोटीस बोर्ड, नातलग आणि शेजार-पाजारची ओळख, पेपरमधल्या जाहिराती आदींवर ते लक्ष ठेवतात. शिवाय वेळीच आपली आवड-निवड ओळखून तसं काम मिळवतात. मयंकला गाडय़ांची प्रचंड आवड. मग तो कार शोरूममध्ये काम करताना दिसला तर त्यात नवल ते काय ? गाडय़ांच्या मॉडेलविषयीची खडान्खडा असणारी माहिती क्लाएंटला पुरवताना मयंकचा बोलघेवडा स्वभावही त्याला उपयोगी पडतोय. प्राची एका साप्ताहिकासाठी आपल्या फोटोशॉपमधल्या स्किलचा करिश्मा दाखवतेय. सुटीच्या कालावधीत विविध कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था अनेक प्रोजेक्टस् हाती घेतात. या शॉर्ट टर्म प्रोजेक्टस्साठी त्या कालावधीपुरतीच या मुलांची नेमणूक करून प्रोजेक्ट पूर्ण केले जातात.
तुम्ही ‘आपली बोली, आपला बाणा’ असे बाणेदार व्यक्तिमत्त्वाचे असाल तरी तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता. फक्त त्यासाठी हवी मेहनत, चिकाटी नि एकजुटीची तयारी! तुमचा ग्रुप मिळून आंबेविक्री किंवा अन्य उन्हाळी प्रॉडक्टसचे स्टॉल्स टाकणं, इव्हेंट मॅनेजमेंट वगरे कामं करू शकतो. आता ‘आयपीएल’ची धूम सुरू होतेय. त्यात तरुणाईला वाव मिळू शकतो. त्यातल्या विविध व्यवस्थापनांत तरुणांना काम मिळू शकेल. यासाठी काम करणाऱ्या कंपन्यांनाही समर जॉब करणाऱ्या तरुणांची गरज असते. स्पध्रेसाठी धावपळ करून घाम गाळायचा नि खेळाचा आनंद घ्यायची ही संधी साधता येईल.    
याखेरीज मॉल, शोरूम्स, शॉिपग कॉम्प्लेक्समध्ये काम करणं, हॉबी क्लासेस घेणं, कॉपी रायटिंग करणं, कॉल सेंटर्स, बँक-पोस्टात काम करणं, लायब्ररीत काम करणं, युनिव्हर्सिटीच्या पेपर्सची असेसमेंट करणं, केमिस्ट-ज्वेलर्सकडं काम करणं, लॅब असिस्टंट होणं, टय़ूशन्स घेणं, कार्यक्रमांसाठी स्वयंसेवक होणं, इव्हेंटच्या प्रमोशन्ससाठी काम करणं असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही जण सामाजिक भान ठेवून विविध हॉस्पिटल्स आणि सामाजिक संस्थांमध्ये विनामूल्य काम करतात. त्यांचा वसा उचलायला काही हरकत नाही. फक्त समर जॉबचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. कोणत्याही ठिकाणी नोकरी करताना त्या कंपनीची माहिती, तिथलं वातावरण, आपल्या कामाचं स्वरूप आणि वेळाची माहिती व्यवस्थित काढावी. त्यासंदर्भात घरी कल्पना देऊन घरच्यांचा सल्लाही घ्यावा. उन्हाळी सुट्टीतल्या या कामामुळं केवळ पसे आणि अनुभव मिळण्याखेरीज व्यक्तिमत्त्वविकास होणं, आत्मविश्वास वाढणं, वेळेचं नियोजन, व्यावहारिक जगाचं थोडंसं भान येतं. सुट्टीत प्रॉडक्टिव काम केल्याचं समाधान मिळतं. आपल्यातले गुण-अवगुण कळतात. सुसंवाद साधायची कला अवगत होते. त्या क्षेत्रातले कॉण्टॅक्स तयार होतात. आपण निवडलेलं क्षेत्र आपल्याला सूट होतंय का नाही, याची चाचपणी करून, इतर पर्यायांचा विचार करता येतो.
कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता या वयात काही तरी करून दाखवायची खुमखुमी मुलांच्यात असतेच, असं जाणकार म्हणतात. शिवाय प्रत्येक वेळी स्वत:च्या खर्चासाठी आई-बाबांकडे पसे मागणं काहींना पटत नाही, म्हणून काही जण सुट्टीत काम करतात. तर कुणी वेगळा अनुभव घेण्यासाठी काम करतात. एकुणात काय? तर सुट्टीतले उद्योग करताना आपण घडत जातो हे नक्की. कष्ट करून मिळवलेल्या पशांचा आनंद आणि महत्त्व कळतं. वास्तवाची जाणीव होते. उगाच टीपी करण्यापेक्षा हे बरं नाही का? दोस्तहो, तुमच्या आवडीचं काम तुमची वाट पाहतंय. मग काय, या सुट्टीत ‘उन्हाळी उद्योग’ करणार ना?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा