थंडीचे दिवस हळूहळू सरत आले आहेत आणि रणरणत्या उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच त्वचेचे विकारदेखील आपले डोके वर काढू लागतील. त्यामुळे या दिवसात सनस्क्रीन लोशन हा अत्यावश्यक असा घटक ठरतो. ज्या सनस्क्रीनमध्ये एसपीएफचे प्रमाण २० पर्यंत असते, असा सनक्रिन किंवा अशा स्वरूपाचा मॉइश्चरायझर उपलब्ध झाल्यास आवर्जून वापरावा.
बऱ्याचदा लोक सनबर्न आणि अ‍ॅलर्जी या एकाच स्वरूपाच्या समस्या असल्याचा गरसमज करून घेतात. परंतु, ह्या दोन्ही समस्या वेगवेगळ्या आहेत. सनबर्नमध्ये त्वचेच्या उघडय़ा भागाचा अल्ट्राव्हायोलेट किरणांशी संपर्क येतो. त्यामुळे त्वचेमध्ये असलेला मेलनिन हा घटक या अल्ट्राव्हायोलेट किरणांशी लढू पाहतो. परंतु, इथे मेलनिनचा प्रभाव कमी पडल्यामुळे त्वचा भाजल्यासारखी दिसू लागते.
तर, अ‍ॅलर्जीमध्ये त्वचेच्या उघडय़ा भागाचा प्रखर सूर्यकिरणांशी संपर्क येतो. परिणामी, त्वचेमध्ये असलेले प्रतिकार करणारे घटक, त्यापासून त्वचेचे संरक्षण करू पाहतात. परंतु, त्यात ते कमी पडल्यामुळे अ‍ॅलर्जीसारखा परिणाम त्वचेवर दिसू लागतो.
या समस्या अतिसंवेदनशील स्वरूपाच्या समजल्या जातात. त्वचेवर अ‍ॅलर्जी निर्माण झाल्यास ती पटकन बरी होते. पण सनबर्नसारख्या समस्येमध्ये त्वचेला पूर्ववत होण्यास बराच वेळ जावा लागतो. आणि सातत्याने सनबर्नसारख्या समस्येला तोंड दय़ावे लागले तर त्याचा अंतिम परिणाम त्वचेचा कर्करोग यासारखी समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.
आतापर्यंतच्या माझ्या वैद्यकीय करिअरमध्ये सनबर्न आणि अ‍ॅलर्जीपेक्षा ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्वचेच्या समस्या व रोग पाहिलेले आहेत. विशेष म्हणजे, त्या सर्वामागे मूळ कारण प्रखर स्वरूपाची सूर्यकिरणे हीच आहेत. त्यापकी काही समस्या तुमच्यासमोर मांडायला मला निश्चितपणे आवडेल.
इलॅस्टोसिससारख्या प्रकारात प्रामुख्याने मानेच्या मागील त्वचा जाड होऊन, त्यावर सुरकुत्या पडायला लागतात.
सुरकुत्यांमुळे त्वचा एकदम पातळ स्वरूपाची बनते.
अतिप्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या पेशी उघडय़ा पडतात नि त्यामुळे त्वचा एकदम सल पडते. थोडय़ा काळासाठी जरी ही त्वचा सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आली तरी लगेच परिणाम दिसून येतात.
हातापायंवर छोटे छोटे डाग आणि पांढरे ठिपके तयार होणे.
मेलेनोमा, बॅसल सेल कारसिनोमा आणि स्कॅयुमॉस या तीन स्वरूपाचे त्वचेचे कर्करोग आहेत. त्यापकी, मेलेनोमा हा घातक स्वरूपाचा कर्करोग असून तो त्वचेमध्ये अति जलद वेगाने पसरतो.
यावरून तुम्हाला समजले असेल की, उन्हात कोणत्याही स्वरूपाचे संरक्षण न घेता गेल्यास त्वचेचे विकार किती गंभीर पातळीपर्यंत पोहचू शकतात ते. सनबर्न किंवा अ‍ॅलर्जीसारखे गंभीर स्वरूपाचे विकार होतात म्हणून उन्हात बाहेर पडणं आपल्याला टाळता येत नाही. म्हणूनच मला इथे एक सल्ला आवर्जून द्यावासा वाटतो की, सूर्यप्रकाशाची प्रखरता कमी करणे हे निश्चितपणे आपल्या हातात नाही. पण त्याच्या तीव्रतेचा धोका कसा कमी करता येईल हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. त्यामुळेच उन्हात बाहेर पडताना काही छोटय़ा छोटय़ा गोष्टींची काळजी घेतल्यास चांगलाच फरक पडू शकतो.
अल्ट्राव्हायोलेट किरणे फक्त त्वचेवर नुसताच परिणाम घडवून आणत नाहीत, तर ती पार त्वचेच्या आतपर्यंत जाऊन परिणाम घडवून आणत असतात. त्यामुळे त्वचेच्या आतमध्ये जंतुसंसर्ग होऊन तऱ्हेतऱ्हेचे विषारी विषाणू निर्माण होत असतात. त्यामुळेच आपण आपल्या त्वचेची अधिक डोळसपणे काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. जाता जाता काही खास टिप्स :
उन्हात बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास आगोदर उन्हापासून संरक्षण करणारे कपडे घालून ठेवा.
उन्हात बाहेर पडण्यापूर्वी कानाला व मानेला सनक्रिनलोशन लावायला विसरू नका.
जर तुमची त्वचा जास्त संवेदनशील असेल तर तेलयुक्त नसलेले आणि वजनाला हलके असलेले सनक्रिन लोशन वापरा.
भरपूर पाणी प्या.
तुमचे शरीर पूर्ण झाकले जाईल असेच कपडे वापरा. आणि, सरतेशेवटी,
उन्हात बाहेर पडताना लांब बाह्यांचे व लांब पॅण्टस् नि संपूर्ण डोके झाकले जाईल अशी टोपी नि डोळ्यांवर गॉगल लावायला विसरू नका.
तेव्हा आता उन्हात बाहेर पडताना, तुमचे शरीर पूर्णपणे झाकलेले आहे नि आवश्यक त्या संरक्षक गोष्टी तुम्ही परिधान केलेल्या आहेत याची काळजी घ्या. आणि हो बाहेर जाताना भरपूर पाणी किंवा द्रव स्वरूपाच्या गोष्टी पिण्यास विसरू नका. जेणेकरून डी-हायड्रेशनची समस्या टाळता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा