अत्यंत धोकादायक परिस्थितीत काही जणांना जिवावर उदार होत दिलेला टास्क पूर्ण करायचाय किंवा जगापासून दूर एका बंदिस्त ‘घरात’ काही लोकांना खूप महिने कोंडून ठेवलं आहे आणि त्यांच्यावर सतत कंट्रोल स्टेशनमधल्या लोकांची नजर आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहेङ्घ आपल्याला असे प्रसंग सांगितले तर डोळ्यासमोर पटकन टीव्हीवरचे रिअॅलिटी शोज येतील. पण या लुटुपुटुच्या शोपेक्षा खरं आणि जास्त थ्रिल सध्या अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स अनुभवत आहेत. जूनमध्ये ‘बोइंग स्टारलाइन’ या अंतराळयानाने ८ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले हे दोघे अंतराळवीर तांत्रिक बिघाडामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत तरी त्यांना परत आणणं शक्य होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. जमिनीपासून साधारण ४०० किमी उंचीवर अंतराळात आयएसएसच्या बिग बॉस घरात राहणाऱ्या या दोघांना खरे खतरों के खिलाडी म्हटले पाहिजे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) आंतरराष्ट्रीय साहचर्यातून बनवलेले गेलेले अंतराळ स्थानक पृथ्वीभोवती साधारण ४०० किमी उंचीवर फिरते आहे. यात मानवाला राहण्यासाठी अनुकूल वातावरण बनवलं गेलं आहे. अंतराळवीर इथे काही काळ राहतात. इथल्या सूक्ष्म गुरुत्व अवस्थेत पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, शरीरशास्त्र, हवामानशास्त्र, वैद्याकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण संशोधन सुरू असतं. अंतराळवीर आणि सामान यांची पृथ्वीवरून स्टेशनमध्ये ने-आण करण्यासाठी अंतराळयानाचा (स्पेसक्राफ्ट) उपयोग केला जातो. रशियाच्या सोयूझ आणि प्रोग्रेस स्पेसक्राफ्टसोबतच सध्या खासगी कंपन्यांच्या स्पेसक्राफ्टचादेखील उपयोग होतो. नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम (CCP) अंतर्गत बोइंग, स्पेस एक्स अशा खासगी कंपन्यांशी अंतराळवीरांच्या आणि सामानाच्या वाहतुकीसाठी करार केले जातात. बोइंग स्टारलाइनर हे बोइंग या खासगी कंपनीने विकसित केलेलं असंच एक अंतराळयान आहे. हे पुन्हा वापरता येण्याजोगं अंतराळयान असून सात अंतराळवीरांना अंतराळ स्थानकापर्यंत घेऊन जाऊ शकतं.

Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश

हेही वाचा : फेनम स्टोरी : सबसे बड़ा रुपय्या

जूनमध्ये पार पडलेले बोइंग क्रू फ्लाइट टेस्ट हे बोइंग स्टारलाइनचे पहिले क्रू मिशन होते. स्टारलाइनची नियमित वाहतूक सेवा सुरू करण्याआधी अंतराळवीरांना घेऊन चाचणी करणं याचं उद्दिष्ट होतं. या चाचणीमध्ये दोन अंतराळवीरांना घेऊन उड्डाण करणे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी सुमारे एक आठवडा जोडलेलं राहून विविध चाचण्या घेऊन परत येणं अशी योजना आखण्यात आली होती. यानुसार ५ जून २०२४ रोजी स्टारलायनर भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून अंतराळात झेपावलं. स्टारलायनर आयएसएसशी जोडलं जाऊन दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचले. १४ जून रोजी अंतराळवीरांना घेऊन स्टारलायनर पृथ्वीवर परत येणं अपेक्षित होतं, पण यानात तांत्रिक बिघाड सुरू झाले.

स्टारलायनरच्या प्रक्षेपणाच्या वेळीच त्यातून एका ठिकाणाहून सूक्ष्म स्वरूपात हेलियम वायूची गळती सुरू झाल्याचं आढळलं होतं ही फार गंभीर बाब न वाटल्याने यानाचं उड्डाण पार पाडण्यात आलं, पण यान अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत आणखी दोन ठिकाणांहून गळती सुरू झाली. अशातच यानाचे काही मॅन्युअरिंग थ्रस्टर बंद पडले. नंतर यानाच्या प्रणोदक प्रणाली (प्रोपल्शन सिस्टिम)मधून हेलियम गळती झाल्याचं निदर्शनास आलं.

बोइंग आणि नासाच्या तंत्रज्ञांनी स्टारलायनरमधील या बिघाडाची तातडीने दखल घेत शोध घायला सुरुवात केली. नासा आणि बोइंगने सुरुवातीला सांगितलं की स्टारलायनर ४५ दिवसांपर्यंत अंतराळ स्थानकाशी जोडलेलं राहू शकतं. नंतर बॅटरीच्या कार्यक्षमतेमुळे साधारण ९० दिवसांपर्यंत स्टारलायनर तिथे राहू शकते असं सांगण्यात आलं, पण या दरम्यानदेखील या बिघाडाचं ठोस कारण कळू न शकल्याने संभाव्य धोके लक्षात घेऊन स्टारलायनर अंतराळवीरांना सोबत न घेताच पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय २४ ऑगस्ट रोजी नासाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यानुसार ६ सप्टेंबर रोजी स्टारलायनर क्रू सदस्याविना स्थानकापासून अलग झालं आणि न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात उतरवण्यात आलं.

हेही वाचा : परंपरा गणरायाच्या दागिन्यांची

स्पेस स्टेशनमध्ये अडकलेल्या अंतराळवीरांना स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन या स्पेसक्राफ्टने परत आणण्यात येईल, पण यासाठी फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाट पाहणं क्रमप्राप्त आहे. या तांत्रिक बिघाडामुळे ८ दिवसांसाठी अंतराळ स्थानकात गेलेले हे दोन्ही अंतराळवीर तब्बल ८ महिन्यांसाठी स्थानकात अडकून पडले आहेत. याशिवाय, सोशल मीडियावर या अंतराळवीरांचं काय होणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंतराळ मोहिमेतील धोके, अंतराळात मुक्काम, दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने मानवी शरीरावर मनावर होणारे परिणाम या बाबी प्रकाशझोतात आल्या आहेत.

अंतराळात वातावरण आणि ऑक्सिजनचा अभाव, निर्वात अवस्था, सूक्ष्म गुरुत्व अशी जगण्यास अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. इथे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचं सुरक्षा कवचसुद्धा नाही. त्यामुळे सूर्यापासून निर्माण होणारी अतिनील किरणं, सौरवात, कॉस्मिक किरणं यांचा मोठा धोका अंतराळात असतो. हे सगळे धोके लक्षात घेऊन अंतराळ स्थानकाची रचना केली गेली आहे. याच्या आत वेगवेगळ्या जीवनरक्षक सिस्टिमद्वारे योग्य दाब, ऑक्सिजनचा पुरवठा, योग्य तापमान, आर्द्रता राखत अनुकूल वातावरण बनवलं जातं. स्थानकाच्या आत पृथ्वीप्रमाणेच हवेचा दाब, तापमान, ऑक्सिजनचं प्रमाण राखलं जात असल्याने अंतराळवीरांना आत स्पेससूट घालायची गरज नसते. स्टेशनच्या आत नेहमीचेच कपडे घातले जातात.

स्थानकातली ऑक्सिजन जनरेशन सिस्टिम ही प्रणाली इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाण्यापासून ऑक्सिजन तयार करते. वोझदुख यंत्रणेद्वारे हवेतील कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतला जातो. वॉटर रिकव्हरी सिस्टिममध्ये सांडपाणी, बाष्प यांच्यापासून पुन्हा शुद्ध पाणी बनवलं जातं. स्थानकाला अन्न, पाणी आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्यासाठी नॉर्थरोप ग्रुमनने विकसित केलेले सिग्नस आणि स्पेसएक्सचे ड्रॅगन ही मानवरहित कार्गो स्पेसक्राफ्ट वापरली जाऊ शकतात. या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर सोशल मीडियावर जसं चित्र रंगवण्यात येत आहे तसं नसून दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकात सुरक्षित आहेत हे लक्षात येतं.

हेही वाचा : सफरनामा: नकाशावाचन आणि भटकंती

तरीही तब्बल ८ महिन्यांनी लांबलेल्या या मोहिमेमुळे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतात. मानवी शरीर आणि शरीरांतर्गत क्रिया पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानुरूप बनले आहे. अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाच्या अवस्थेत अंतराळवीर कायम अधांतरी तरंगत असतात. दीर्घ काळ अशा अवस्थेत राहिल्यास मानवी शरीरावर लक्षणीय परिणाम होऊ लागतात.

रक्तदाब कमी होतो आणि विशेषत: पायाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होते. रोगप्रतिकारकशक्ती कमी होत अंतराळवीरांना संक्रमण आणि आजार होण्याची शक्यता वाढते. यावर अनुकूलन साधण्यासाठी योग्य व्यायाम, खास डाएट अशा काही बाबींवर विशेष लक्ष द्यावं लागतं. अंतराळवीरांना दररोज दोन तास व्यायाम करावा लागतो. ट्रेडमिलवर धावणं, स्थिर सायकलिंग अशा कार्डिओ एक्सरसाइजद्वारे हृदयाचं कार्य व्यवस्थित राखलं जातं. स्नायूंची मजबुती राखण्यासाठी स्ट्रेचिंग आणि वेटलिफ्टिंग प्रकार केले जातात. अंतराळवीरांना आहारातून सगळी पोषणद्रव्यं आणि गरज पडली तर सप्लिमेंट देऊन आरोग्य चांगलं राखलं जातं.

हेही वाचा : ट्रेण्ड स्टॅन्ड अप कॉमेडीचा

अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शारीरिकच नाही तर मानसिक तणावांनाही सामोरं जावं लागतं. पृथ्वीवर आपले जैविक घड्याळ हे पृथ्वीच्या परिवलन गतीशी समरूप असतं. म्हणून उठणं, झोपणं, भूक लागणं या क्रिया यांचा ताळमेळ राहतो. अंतराळात याची गडबड उडते, दिवस -रात्र यांच्या अभावाने झोपेचं चक्र बिघडतं. स्टेशनमधील मर्यादित जागेमुळे तिथं राहणं बंदिवास वाटू लागतो. दीर्घकाळ घरापासून लांब राहिल्याने अंतराळवीर होमसिक होतात. सिस्टिममध्ये बिघाड होण्याची भीती, ऑक्सिजन संपण्याची भीती, स्टेशनवर एखादी अशनी धडकण्याची भीती अशी अनेक दडपणं कायम मनावर असतात. पण अंतराळवीरांच्या प्रशिक्षणादरम्यान अंतराळात राहण्याच्या दृष्टीने शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेतली जाते. अंतराळात असणाऱ्या संभाव्य धोक्यांची आणि तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या अशा परिस्थितीसाठी ते मानसिकदृष्ट्या सक्षम असतात. प्रदीर्घ अंतराळ निवासासाठीदेखील त्यांची सज्जता असते. यामुळे सोशल मीडियावर पसरवलं जात आहे तसं हे दोघं अंतराळवीर अंतराळात अडकून पडलेले, हताश झालेले आणि जीव धोक्यात असलेले असं चित्र नक्कीच नाही.

बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे दोघं अंतराळवीर आपल्या या अंतराळ मुक्कामाच्या दरम्यान विविध प्रयोग, स्थानकाची देखभाल दुरुस्ती करत कार्यरत राहणार आहेत. अंतराळ मोहिमेत धोके आणि जोखीम आहे, पण वेगाने होणारी वैज्ञानिक प्रगती आणि या विश्वाविषयी जाणून घेण्याचं मानवाचं कुतूहल यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमा अधिक निर्धोक आणि सुरक्षित होत जातील यात शंका नाही.

viva@expressindia.com