शब्दांकन: श्रुती कदम
कुछ नशा तिरंगे की आन का है
कुछ नशा मातृभूमि के शान का हैं
हम लहराएंगे हर तरफ तिरंगा
नशा यह हिंदुस्तान के शान का है
‘कुकू एफएम’वर प्रसारित होणाऱ्या ‘सुपर स्पाय अजित डोभाल’ या पॉडकास्टमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या वीरकथा सांगितल्या आहेत. स्वत:च्या जिवाची चिंता न करता आगीत उडी मारण्यापासून ते उरी हल्ल्याचा बदला घेण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या घडल्या आहेत. या पॉडकास्टमधील ‘सच्चा देशभक्त’ या भागात अजित डोभाल यांच्याबद्दल आणि २०१९ मध्ये पुलावामा हल्ल्याचे प्रतिउत्तर म्हणून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याची आणि अभिनंदन यांना परत भारतात आणणं या घटना आणि त्या संदर्भातील कथा सांगण्यात आल्या आहेत. परंतु या घटना सांगताना आर. जे. सूरज शुक्ला म्हणतो, भारतीय नागरिकांपर्यंत आपल्या सैनिकांच्या कामगिरीची माहिती पोहोचावी म्हणून या घटनांना नवीन आकार देऊन साध्या पद्धतीने मांडण्यात येते. पण त्या वेळी अमलात आणलेल्या योजनांचे मूळ प्लॅन कधी बाहेर पडणार नाहीत याची पूर्ण काळजी भारतीय सैन्यांकडून घेण्यात आली आहे. हा भाग संपवताना अजित डोभाल यांच्या कार्याला सलाम म्हणून आर. जे. सूरजने ‘कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमी के शान का हैं, हम लहराएंगे हर तरफ तिरंगा, नशा यह हिंदुस्तान के शान का है’ ही शायरी ऐकवली आहे.
‘उरी : द सर्जिकल’ चित्रपटातील ‘ये आज का भारत हैं, यह घर मे घूस कर मारता हैं’ हे वाक्य माझ्या लक्षात राहिलं आहे. भारतीय सैन्यात भरती होण्याचं माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. जेव्हा देशभक्तीवर चित्रपट प्रदर्शित होतात, बातम्या येतात किंवा आता कोणी पॉडकास्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून या घटना सांगतात तेव्हा या गोष्टीची तीव्रता समजते. आपल्या आजूबाजूला काही वेळा असे लोक असतात ज्यांनी देशासाठी खूप काही केलं आहे, पण त्याची आपल्याला माहितीच नसते. मुळात त्यांना कधी आपल्या देशभक्तीबद्दल सांगायचं नसतं. ते शांतपणे आपलं काम करत असतात. अजित डोभाल यांचं व्यक्तिमत्त्व मला तसंच वाटतं. त्यांनी केलेल्या कामाच्या एकचतुर्थाश माहितीदेखील आपल्याला नाही. पण जेवढी माहिती आहे ती ऐकूनच त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. मी मनोरंजन म्हणून ऐकायला सुरुवात केलेल्या या पॉडकास्टमुळे मला अजित डोभाल यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची संधी मिळाली.
राजेश पवार