या सृष्टीतल्या चराचरावर खाबू मोशायचं प्रेम आहे. हे प्रेम तो वेळोवेळी हातातोंडाची गाठ घालून आणि पल्लेदार ढेकर देऊन व्यक्त करतच असतो. पण मुलांमध्येही आईचं एखादं लाडकं मूल असतंच. तसंच खाबू मोशायचंही ‘चराचर सृष्टीबाबत आहे. खाबू मोशाय इतर पदार्थ ज्या आत्मीयतेनं चरतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तो माशांचा समाचार घेताना समाधानी असतो. खाबू मोशायच्या मनात या समुद्रसृष्टीबद्दल अपरंपार आदरभाव आहे. त्यामुळे गोव्याच्या गाडीत बसल्यानंतरच खाबू मोशाय वेगवेगळ्या माशांची दिवास्वप्ने बघत होता. माशांचे पदार्थ तयार करण्याची पद्धतही प्रांतवार किंवा अगदी जातवारही मस्त बदलत असते. म्हणजे कोलंबीचं लोणचं हा पदार्थ कायस्थाकडेच बनतो. तर साधा बांगडा किंवा पापलेट बनवण्याची मालवणातली पद्धत आणि ५०-१०० किलोमीटर पुढे गोव्यातली पद्धत वेगवेगळी असते.
तर, गोव्यात पाय ठेवल्यापासून खाबू मोशायची ही मत्स्यभ्रमंती सुरू झाली. अगदी टिपिकल गोवन फिश कुठे मिळेल, असा प्रश्न मुखी घेऊन खाबू मोशाय कळंगुटेमधील रस्ते तुडवायला लागला. (सध्या या ठिकाणाला कलंगुट म्हणतात. पण मूळ नाव कळंगुटे आहे.) या भ्रमंतीत त्याला कळंगुटेमध्येच कॅफे सुसेगादो नावाचं एक हॉटेल दिसलं. अगदी गोवन स्टाइलच्या एका घरात उघडलेल्या या हॉटेलचं रूपडं पाहूनच खाबू मोशाय खूश! खास गोव्यातच दिसणारी पिवळी-पांढरी रंगसंगती, त्यात चकचकीत पॉलिश केलेली चॉकलेटी टेबलं, एका बाजूला वारुणीचा आस्वाद घेण्यासाठी उघडलेला मयखाना, वर कौलं.. खाद्यपदार्थाच्या चवीबरोबरच असं चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारं ठिकाण असेल, तर खाण्याचा मझा काही औरच!
या ‘सुसेगादो’बाहेरच ‘टूडेज कॅच’ची यादी लावलेली असते. पट्टीचे मासे खाणारे असाल, तर मग थेट चिंबोरी मागवा! त्या दिवशी असलेल्या चिंबोऱ्यांपैकी तुम्हाला हवी असलेली चिंबोरी तुम्ही निवडू शकता. ही चिंबोरी मस्त उकडून खास गोवन मसाल्याचा झणका देऊन तुमच्यासमोर आणून ठेवली जाते. चिंबोरी खायची पद्धत माहीत नसेल किंवा तशा पद्धतीने बाहेर खाताना लाज वाटत असेल, तर या वाटेला न गेलेलंच बरं. पण सर्व लज्जा त्याजून तुम्ही खाद्ययज्ञाचा संकल्प सोडून बसलात, तर मोठय़ा आनंदाचे धनी व्हाल.
खाबू मोशायने याच ठिकाणी प्रॉन्झ सेस्मे टोस्ट नावाचा पदार्थ खाल्ला. एका ब्रेडवर प्रॉन्झ किसून टाकले जातात. ते ब्रेडवर चिकटून राहावेत, यासाठी त्याखाली अंडय़ाचा मुलामा देण्यात येतो. वर काही तीळ टाकले जातात. हा ऐवज मस्त मसाला लावून तळला जातो. अत्यंत खुसखुशीत आणि चविष्ट अशा या पदार्थाने खाबू मोशाय जामच खूश झाला. सुरमई आणि पापलेट हे दोन तर माशांमधले ऑल टाइम फेवरिट मासे! पण इथे खाताना त्यावरील मसाल्यामुळे त्यांची लज्जत आणखीनच वाढलेली.
नवमत्स्याहाऱ्यांमध्ये ‘छे बुवा, माशाला काटे खूप असतात असं म्हणायची फॅशन आहे. हे म्हणजे माणसाच्या शरीरात हाडं खूपच आहेत, असं म्हणण्यासारखं आहे. तर या नवमत्स्याहाऱ्यांचा अतिशय नावडता मासा म्हणजे बांगडा! हा मासा वासाला थोडा उग्र असतो आणि तो करताना अनुभवी हात लागतो. पुरणपोळी जशी तव्याचे चटके खाल्लेल्या हातालाच चांगली जमते, तस्संच बांगडय़ाचं आहे. बांगडा हा खाबू मोशायचा आवडता मासा आहे. ‘सुसेगादो’मध्ये हाच मासा मॅकेरल हे नाव धारण करून आला. खाबू मोशायचं पोट भरलं होतं. पण बाजूच्या एका टेबलवर मागवलेल्या या माशाने खाबू मोशायच्या नाकपुडय़ांद्वारे मनात आणि पोटात ठाण मांडलं. खाबू मोशाय त्वरित बांगडा फ्राय ऑर्डर करता झाला. मासा टेबलावर आल्यानंतर आधी काही काळ त्या माशाचा गंध नाकात भरून घेत खाबू मोशाय माशावर तुटून पडला आणि काही वेळातच त्या माशाचे काटे खाबू मोशायच्या प्लेटमध्ये उरले. अस्सा बांगडा खाबू मोशायने कधी खाल्ला होता, त्यालाही आठवत नाही!
गोव्यात मासे स्वस्त असतात, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यात अजिबातच तथ्य नाही, असं काही नाही. कारण हे सगळे मासे प्रत्येकी जेमतेम ३०० रुपयांच्या आसपासच होते. त्यामुळे खाबू मोशायच्या खिशावरही फार भार पडला नाही. कवी बा. भ. बोरकर हेदेखील खाबू मोशायसारखेच, नव्हे, खाबू मोशायपेक्षाही जास्त मत्स्यप्रेमी! त्यांनी एकदा म्हटलं होतं की, मी मेल्यानंतर माझं शरीर समुद्रात फेकावं. ज्या माशांवर मी आयुष्यभर जगलो, त्यांना माझ्या शरीरावर एक दिवस तरी जगू दे! खाबू मोशायचं मत्स्यप्रेमही असंच पराकोटीचं आहे. या प्रेमातली एक कंठभेट गोव्यात ‘सुसेगादो’मध्ये झाली, हे खाबू मोशायचं भाग्य!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा