वेदवती चिपळूणकर
सस्टेनेबल फॅशन हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. सस्टेनेबल फॅशन पर्यावरणपूरक असली तरी त्याची किंमत हा विषय ग्राहकांसाठी अजूनही त्यापासून दूर ठेवणारा आहे. मात्र लॅक्मे फॅशन वीकमध्ये डेली वेअर कलेक्शनपासून ते लक्झरी फॅशनपर्यंत सगळय़ा कलेक्शन्साठी डिझायनर्सनी मोठय़ा प्रमाणावर सस्टेनेबल फॅशनवर जोर दिल्याचे दिसून आले. डिझायनर्सचे हे प्रयत्न सस्टेनेबल फॅशनला अधिकाधिक व्यवहार्य बनवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतील अशी आशा म्हणूनच वाटू लागली आहे.
‘सस्टेनेबल’ हा शब्द सध्या ट्रेण्डमध्ये आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्याचं महत्त्व वाढत राहिलेलं आहे. सुरक्षित भविष्यासाठीचा उपाय म्हणून सस्टेनेबल या शब्दाकडे पाहिलं जातं. फॅशनविश्वात तर सस्टेनेबल फॅशन ही आता जणू गरज बनली आहे. याबद्दल अनेकदा बोललं गेलं आहे, चर्चा झाल्या आहेत, संकल्पना वेगवेगळय़ा पद्धतीने प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न झाले आहेत, मात्र आता डिझायिनग करतानाच सस्टेनेबिलिटीचा विचार करून पहिल्या पायरीपासूनच ती प्रत्यक्षात आणली जाते आहे. नवीन लाँच होणाऱ्या सर्व कलेक्शन्समध्ये सस्टेनेबिलिटी हा एक महत्त्वाचा आणि मोठा फॅक्टर आहे. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्येही सर्वच डिझायनर्सचा मुख्य फोकस त्यांची डिझाईन्स सस्टेनेबल बनवण्याकडे होता. काही डिझायनर्सनी तो उद्देश प्रकाशात आणला, तर काहींनी वापरलेल्या फॅब्रिक्समधून सस्टेनेबिलिटीचा विचार केल्याचे ठळकपणे जाणवले.
रिसायकल्ड फॅब्रिक हा सस्टेनेबल फॅशनमध्ये महत्त्वाचा ठरणारा भाग आहे. जुन्या वस्तूंचं विघटन करून त्यापासून नवीन वस्तू बनवण्याला रिसायकल करणे म्हणतात. याच पद्धतीने जुन्या कापडावर प्रक्रिया करून नवीन कापड बनवलं जातं त्याला रिसायकल्ड फॅब्रिक म्हणतात. जुन्या कपडय़ांचे धागे वेगळे केले जातात आणि त्यापासून पुन्हा कापड विणून त्याचे नवीन कपडे बनवले जातात, ही रिसायकिलगची सोपी प्रक्रिया म्हणता येईल. नैसर्गिक कापड आणि कृत्रिम कापड हे मात्र वेगवेगळे रिसायकल केले जातात. नैसर्गिक आणि कृत्रिम धागे शक्यतो एकत्र केले जात नाहीत. अशा पद्धतीचे फॅब्रिक वापरून बनवलेल्या डिझाईन्सचा अंतर्भाव सस्टेनेबल फॅशनमध्ये होतो. अशा पद्धतीचे रिसायकल्ड फॅब्रिक्स वापरून या सीझनमध्ये काही डिझायनर्सनी आपली कलेक्शन्स सादर केली. मात्र कापडाच्या रिसायकिलग प्रक्रियेमध्ये सगळय़ात महत्त्वाचा भाग ठरतो तो म्हणजे त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, जागा, वेळ आणि या सगळय़ाला येणारा खर्च. या घटकांमुळे रिसायकल्ड फॅब्रिकची किंमत प्रभावित होते आणि ती वाढत जाते. त्यामुळे आपोआपच रिसायकिलग हा पर्याय सहजासहजी व्यवहार्य ठरत नाही.
या अडचणींना पर्याय म्हणजे अपसायकिलग. अपसायकिलग म्हणजे असलेल्या कपडय़ापासूनच नवीन डिझाईन तयार करणे. साधारणत: यासाठी जुने, थोडेसे फाटलेले, मापात न बसणारे अशा पद्धतीचे कपडे गोळा केले जातात. त्यांचे वापरण्यासारखे तुकडे काढून घेतले जातात. यात कॉलर, लेस, एम्ब्रॉयडरीचे पॅचेस, कापडाचे बेल्ट, खिसे, बटण्स अशा लहानसहान गोष्टी जमा केल्या जातात; पण केवळ इतकंच नाही तर कापडाचा खराब झालेला, विरलेला, डाग लागलेला किंवा फाटलेला भाग सोडून उर्वरित संपूर्ण कापड नवीन कपडय़ांसाठी वापरलं जातं. पूर्वीच्या काळी जुन्या कापडांच्या तुकडय़ांमधून गोधडय़ा आणि दुपटी शिवली जात असत, तोही अपसायकिलगचाच प्रकार आहे. अशा अपसायकल्ड फॅब्रिक्समधून सामान्यपणे अॅबस्ट्रॅक्ट पॅटर्नची डिझाईन्स आणली जातात. अपसायकिलगची प्रक्रिया लहान आणि कमी खर्चीक असल्याने ती डिझाईन्स अफोर्डेबल होऊ शकतात. यामुळेच ती अधिक व्यवहार्य आणि सर्वसाधारण खरेदीदारांना जास्त जवळची वाटणारी डिझाईन्स ठरतात. ‘लॅक्मे फॅशन वीक’मधील नेक्स्ट जनरेशन डिझायनर्सनी अपसायकिलगचा वापर केलेला अधिक दिसून आला. याचाच अर्थ तरुणाईने इतर अनेक गोष्टींप्रमाणे फॅशनच्या बाबतीतही सस्टेनेबिलिटीचा विचार अधिक गांभीर्याने सुरू केला आहे. फ्युचरिस्टिक थीम घेऊन डिझाईन्स करणाऱ्या सर्वच डिझायनर्सनी डेली वेअर कलेक्शनमध्ये अपसायकिलगचा उपयोग केला.
अपसायकिलगच्या तंत्राचा वापर करून डिझाईन्स करणं हे रिसायकिलगच्या तुलनेने स्वस्त आणि सुकर वाटत असलं तरीही त्याला काही मर्यादा आहेत. अपसायकिलगच्या तंत्राने ट्रॅडिशनल डिझाईन्स कमी प्रमाणात केल्या जाऊ शकतात, हा त्यातला एक मोठा घटक आहे जो भारतीय कंझ्युमर्सना प्रभावित करतो. त्यामुळे अपसायकिलगपेक्षा अधिक सस्टेनेबल पर्याय म्हणून अनेक डिझायनर्स पुन्हा भारतीय पारंपरिक फॅब्रिककडे वळले आहेत. कृत्रिम धागे आणि फॅब्रिक यासाठी लागणारी सामग्री, त्यातून होणारं वेस्टेज, त्यात वापरली जाणारी रसायनं, त्या धाग्यांचा टिकाऊपणा या सगळय़ाची तुलना नैसर्गिक धागे आणि फॅब्रिकशी केली असता, नैसर्गिक फॅब्रिकच उजवं ठरतं. त्यामुळे वेडिंग कलेक्शन्ससाठी मिक्स धागे वापरण्याऐवजी हँडलूम सिल्क, चंदेरी सिल्क, रॉ सिल्क, जामदानी सिल्क अशा प्रकारचे नॅचरल फॅब्रिक्स यंदा डिझायनर्सनी वापरले. नैसर्गिक कपडय़ाचा टिकाऊपणा हा कोणत्याही रिसायकल्ड किंवा अपसायकल्ड फॅब्रिकपेक्षा अधिक असतो. मुळातच फॅशनमधून वेस्टेज तयार होऊ नये यासाठीचा हा पर्याय सस्टेनेबल फॅशनच्या मूळ उद्देशाला सर्वाधिक न्याय देतो.
फास्ट फॅशनने पर्यावरण आणि निसर्गाचं केलेलं नुकसान हळूहळू संपूर्ण फॅशन इंडस्ट्रीच्या लक्षात आलं आणि सस्टेनेबल फ्युचरसाठी सर्वाचे प्रयत्न सुरू झाले. सस्टेनेबल फॅशनसाठी ‘गोइंग बॅक टू रूट्स्’ हा सर्वोत्तम पर्याय अनेक डिझायनर्स आता निवडू लागले आहेत आणि भारतात फॅशनच्या मोठय़ा बाजारपेठेला प्रभावित करणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सस्टेनेबल फॅशनचा केलेला ठळक वापर फॅशन इंडस्ट्रीची पुढची दिशा स्पष्ट करणारा ठरला आहे.