वेदवती चिपळूणकर
आनंदी राहणं किंवा आनंदासाठी जगणं हे आपल्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट असतं. आपण करत असलेल्या साध्या साध्या गोष्टींतही आपण आनंद शोधत असतो; किंबहुना आनंद मिळावा हा विचार करूनच आपण अनेक निर्णय घेत असतो. पण आनंद ‘शोधण्या’च्या नादात आपण असलेला आनंद उपभोगायचा विसरतो. आपल्याच लहानसहान गोष्टींतला आपला आनंद आपण स्वत:च ओळखू शकत नाही. छोटय़ाछोटय़ा गोष्टींनी आपल्याला राग येतो, दु:ख होतं, हर्ट होतं, चीड येते, वाईट वाटतं, ताण येतो, निराशा येते. कारण फारसं मोठं किंवा महत्त्वाचं नसलं तरी आपल्या मनात नकारात्मक भावना असतात. मानसिक स्थिती आणि शारीरिक स्वास्थ्य या दोन गोष्टी परस्परावलंबी आहेत हे जगजाहीर आहे. या दोन्हीचा समतोल स्वत:लाच साधावा लागतो. हा समतोल साधण्यात मदतीचा हात देतो सुवीर सबनीस.
सुवीरला शाळेत असल्यापासून भविष्यात सीए व्हायची इच्छा होती. त्या दृष्टीने त्याने शिक्षण घ्यायलाही सुरुवात केली. सीएच्या परीक्षेची तयारी केली आणि एकएक परीक्षा देत त्याने वाटचाल सुरू केली. लहानपणी ‘आवडेल’ असं वाटलेलं हे प्रोफेशन आणि त्याचा अभ्यास त्यावेळी मात्र त्याला खटकू लागला होता. केवळ पैशाशी निगडित असलेलं हे प्रोफेशन आहे, असं त्याला वाटायला लागलं आणि त्याचं त्या अभ्यासातून मन उडालं. सीएचा अभ्यास त्याला फारसा आवडतही नव्हता आणि त्या परीक्षांचं टेन्शन आणि फ्रस्ट्रेशनही येत होतं. काहीशा अनिच्छेने अभ्यास सुरू असताना त्याला अध्यात्मात रस वाटू लागला. घरच्या आध्यात्मिक वातावरणाने त्याला रीलॅक्स वाटत असे. हळूहळू त्यातला त्याचा इंटरेस्ट वाढत गेला आणि त्याने अध्यात्माच्या मार्गाने जायचा विचार हळूहळू पक्का केला. मात्र त्याचा निर्णय ठाम होत नव्हता.
‘हीलिंग’ हे सुवीरचं कार्यक्षेत्र आहे. नेमकं हीलिंग हेच का याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘आईला असलेला आथ्र्रायटिस मी लहानपणापासून बघत आलोय. कितीही औषधं दिली तरी तात्पुरता आराम पडतो, पण कायमस्वरूपी इलाज होत नव्हता असंच चित्र होतं. त्यातच मी ‘द सीक्रेट’ नावाचं पुस्तक वाचलं. त्यावरून मला असं जाणवलं की आपली सगळी ऊर्जा आपल्या मेंदूत आणि विचारांत असते. आपल्या संपूर्ण आरोग्याचे (पान २ वर) (पान १ वरून) आणि अनारोग्याचे धनी आपण स्वत: आहोत. तेव्हा मला असा प्रश्न पडला की जसं आपण आपल्या विचारांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो, तसं आपल्या विचारांनी इतरांचं दुखणं बरं करू शकतो का? मग मला लहानपणी ऐकलेल्या साधूसंतांच्या, महाराजांच्या कथा आठवल्या की कसे ते इतरांना दु:खमुक्त करत असत. त्यावेळी मला हीलिंग या प्रकाराची माहिती मिळाली आणि त्याचं शिक्षण घेता येतं हेही कळलं. ज्यावर्षी मी सीएची आयपीसीसी ही परीक्षा देत होतो त्याच वर्षी मी हीलिंग शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकलो. त्याच्या सगळ्या लेव्हल्स ज्या असतात त्या पूर्ण केल्या. त्याने मला स्वत:मध्ये पडलेला फरक जाणवत होता. मला खूप छान आणि फ्रेश वाटत होतं.’
स्वत:च्या हीलिंग कोर्सने स्वत:त होणारा बदल समजत असतानाही सुवीरची सीए सोडून हीलिंगला जवळ करण्यासाठी पुरेशी हिंमत होत नव्हती. सीएची फक्त फायनल परीक्षा बाकी असताना सुवीरने मार्ग बदलायचा निर्णय पक्का केला. त्यासाठी दोन प्रसंग त्याला महत्त्वाचे वाटतात. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘एकदा असं झालं की कॅन्सरसदृश लक्षणं माझ्यात दिसायला लागली. बायोप्सी करायची ठरली, मी अॅडमिट झालो आणि डॉक्टरांना जवळजवळ खात्री होती की रिपोर्ट्समध्ये कॅन्सर डिटेक्ट होणार आहे. त्यावेळी मला ज्यांनी हीलिंग शिकवलं ते मला हीलिंग देत होते. रिपोर्ट्स यायच्या आधीच केमोथेरपीसाठी काउन्सेलिंग वगैरे सुरू केलं होतं. पण मी प्रचंड पॉझिटीव्ह होतो आणि खरंच रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यावेळी माझा मानसशास्त्र आणि आपल्या विचारांच्या सकारात्मकतेची ताकद यावर विश्वास बसला.’ दुसऱ्या प्रसंगात मात्र सुवीरने स्वत: एका पेशंटला यशस्वी ट्रीटमेंट दिली आणि पॅरालिसिस झालेला माणूस काही महिन्यांनी चक्क ऑफिसलाही जायला लागला. या दोन प्रसंगांनंतर मात्र त्याचा निर्णय पक्का झाला आणि त्याने सीए फायनल द्यायची नाही असं ठरवलं, असं तो सांगतो.
सीए फायनलपर्यंत आलेला मुलगा अचानक सीए सोडायचं म्हणतोय म्हणजे त्याला नक्कीच प्रचंड ताण असणार किंवा परीक्षेची भीती असणार असं म्हणून आईबाबांनी साहजिकच त्याला अनेक पद्धतीने समजवायचा प्रयत्न केला. पण तो त्याच्या निश्चयावर ठाम होता. सीए करताना त्याला आनंद मिळत नाहीये आणि ‘शेवटी जे आपण करतो ते सगळं स्वत:च्या आनंदासाठीच ना’,असं म्हणून त्याने त्याचा निर्णय बदलला नाही. स्वत:च्या आनंदासाठी काम करावं असं म्हणताना तो सांगतो, ‘आपण कोणतंही प्रोफेशन निवडतो ते आपल्याला आनंद मिळावा म्हणून. प्रोफेशन तर दूरची गोष्ट, आपण रोजचे कपडे निवडताना, स्वयंपाक ठरवताना आणि अगदी गाणी ऐकतानाही आपली आवड जपतो, आपल्याला कशातून आनंद मिळणार आहे हे बघतो आणि त्यानुसार ठरवतो. मग जी गोष्ट दिवसाच्या चोवीस तासांपैकी कमीतकमी अठरा तास करायची असते त्यात आनंद शोधायला नको का? संपूर्ण आयुष्यभर तेच काम करत राहण्याचा कंटाळा येणार नाही अशी ज्याबद्दल खात्री असेल तेच काम माणसाने करावं. त्यासाठी थोडी हिंमत करावी लागली तर ती करायलाच पाहिजे कारण अंतिमत: सगळ्या गोष्टी या आनंदापाशी येऊन थांबतात.’
आत्मानंद हेच आपल्या आयुष्याचं पहिलं आणि शेवटचं ध्येय आहे, हे आपल्याला संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञानाने सांगितलेलं आहे. ‘हीलिंग’सारखं कार्यक्षेत्र निवडताना सुवीरला घरच्यांशी, परिस्थितीशी कमीअधिक प्रमाणात झगडावं लागलंच, मात्र आपण जे करायचं ठरवतो आहोत त्या कामात काहीही चुकीचं नाही, गैर नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद आहे, या जोरावर त्याने सगळ्या परिस्थितीला सामोरं जात आपलं काम सुरू ठेवलं. सगळ्यांना सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की हीलिंग ही कोणतीही अंधश्रद्धा नाही की भंपकपणाची कृती नाही. हीलिंग ही संपूर्णत: वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय आधारावर उभी राहिलेली पद्धत आहे. मन:शक्तीवर विश्वास ठेवून या क्षेत्रात आलेल्या सुवीरला आपल्या निर्णयाचा अभिमानही आहे आणि करत असलेल्या कामावर श्रद्धादेखील !
आपल्याला आनंद देणारी गोष्ट आपण करायची ठरवली आणि त्यात नैतिकदृष्टय़ा जर काही चूक नसेल तर त्याच विचारांवर आपण ठाम राहिलं पाहिजे. जे काम आपल्याला अगदी चोवीस तास केलं तरी कंटाळा येणार नाही किंवा त्याचा ताण येणार नाही तेच काम निवडलं पाहिजे. असं म्हटलं जातं की तुम्ही स्वत: स्वत:च्या आनंदासाठी प्रयत्न करा, मग जग पण त्यासाठी प्रयत्नशील राहील.
सुवीर सबनीस