सणासुदीच्या दिवसांत पार्लरमध्ये चक्कर अनिवार्य असते. चेहरा, केस, हात-पाय, नखं यांसाठी अनेक ट्रीटमेंट्स हल्ली उपलब्ध असतात. अनेक क्रीम्स, ब्लिच, स्क्रब त्यासाठी वापरले जातात. ही केमिकल्स वापरताना आपण किती सुरक्षित असतो, नेहमी याचा वापर योग्य की अयोग्य ही उत्तरं शोधण्यासाठी व्हिवानं काही तज्ज्ञांशी संवाद साधला.
ऑगस्टनंतर सहसा आपल्याकडे सणांचा महोत्सव सुरू होतो. रक्षाबंधन, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी असे लागोपाठ अनेक सण येऊ लागतात. त्यापाठोपाठ लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. या फेस्टिव्ह सीझनमध्ये लोकल पार्लर्सपासून प्रोफेशनल्सकडे वेगवेगळ्या ट्रीटमेंट घ्यायला मुलींची रीघ लागते. नेहमीचा हेअर कट, फेशिअल तर असतंच पण या उत्सवी काळात सुंदर दिसायला, फ्रेश दिसायला आणखीही अनेक गोष्टी करून घेण्यासाठी मुली जातात. स्किन टाईटिनगपासून ते ब्लिचिंग, ब्लॅकहेड्स रिमूिव्हगसारख्या छोटय़ा मोठय़ा मागण्या येत राहतात. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी, अधिक उठावदार दिसण्यासाठी सहसा ब्लिचिंग आणि फेशिअल केलं जातं. यांसारख्या गोष्टी अनेक जणी घरच्या घरीसुद्धा करतात. ब्लिच करताना हर्बल ब्लिच असतं तसं काही केमिकल्स वापरून केलेलं ब्लिचही असतं. सरसकट ब्लिच चांगलं किंवा वाईट असं म्हणता येत नाही. पण त्यात काय वापरलंय, ते स्किनला सूट होणारं आहे की नाही आणि आपल्याला त्याची खरंच किती आणि का गरज आहे, यावरून ते ठरवावं लागतं. खरंच ही केमिकल्स वापरताना आपण किती सुरक्षित असतो, नेहमी ब्लिच करणं योग्य की अयोग्य ही उत्तरं शोधण्यासाठी व्हिवानं काही तज्ज्ञांशी संवाद साधला.
डॉ. स्वाती श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, ब्लिचिंग हे साधारणत: चेहऱ्यावरील केस आपल्या त्वचेच्या रंगाचे दिसण्याकरिता केलं जातं. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. उठाव येतो. अनेक जणी घरच्या घरी ब्लिच करतात. पण तसं करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक असतं. जर आपण प्रथमच या ब्लिचचा वापर करणार असू तर छोटय़ाशा भागावर प्रयोग म्हणून वापरून पाहावं. तसंच ब्लिचिंग क्रीम व पावडर संपूर्ण मॅन्युअल वाचून त्यावर दिलेल्या कमीत कमी वेळेपुरतंच चेहऱ्यावर ठेवायला हवं, असं डॉक्टर स्वाती सांगतात. अधिक काळ ब्लिच ठेवू नये, म्हणजे कोणतीही हानी होणार नाही. त्यातील केमिकल्सचा त्रास होत नाहीये याची खात्री करून घ्या, असंही त्या सांगतात. सततचं ब्लिचिंग करणं मात्र टाळलं पाहिजे. त्याने त्वचेला दाह निर्माण होऊ शकतो. कोरडय़ा त्वचेवर ब्लिच करणं टाळावं, असंही डॉक्टर स्वाती म्हणाल्या.
ब्लिचबरोबर चेहरा साफ करणंही महत्त्वाचं असतं. नुसता पाण्यानं धुवून तो साफ होईलच असं नाही. आपण ज्या वातावरणात वावरत असतो, तिथे आसपास खूप प्रदूषण असतं, धूळ असते. त्वचेवरील रंध्रांत हे धुळीचे, धुराचे कण अडकतात. चेहऱ्याची नियमित स्वच्छता यासाठी आवश्यक असते. त्वचेवरील डेड सेल्स काढण्याकरिता स्क्रब वापरावं, असं तज्ज्ञ सुचवतात. आठवडय़ातून दोनदा चेहरा स्क्रब केल्यास उत्तम.
मेकअप करताना काळजी घ्यावी लागते तशी काढतानाही घ्यावी. कधी मेकअप केल्यास तो कार्यक्रम संपल्यावर किंवा घरी आल्यावर मेकअप रिमूव्हरने काढावा. सध्या बाजारात उत्तम दर्जाचे अनेक मेकअप रिमूव्हर उपलब्ध आहेत. झोपण्यापूर्वीदेखील मेकअप काढून झोपावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा