बदललेल्या कामाच्या स्वरूपामुळे आणि जॉब प्रोफाइल्समुळे अनेकांना कामासाठी बाहेरगावी जायची संधी मिळते. बाहेरगावी आणि बाहेरच्या देशातही जायची संधी नोकरीमुळे मिळते. अशा वेळी मिळालेल्या सुट्टीमध्ये शक्य तितकं फिरून घेण्यासाठी सगळे तयारीत असतात. यामध्ये मुलीसुद्धा मागे नाहीत.
काम आणि आवडीनिवडीची सांगड घालायला मिळणं हे मोठं भाग्याचं. भटकंती ही ज्यांची आवड आहे त्यांना कामामधूनही त्यासाठी वेळ काढायला मिळाला की चैन वाटते. भटकंती ही आता सध्याच्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनली आहे. पूर्वी भटकंतीला जायचं ते सुट्टीत. तेही नातेवाइकांकडे किंवा देवदर्शनाला, एवढाच मर्यादित अर्थ माहीत होता. आता आपलं भटकंतीचं जग कमालीचं विस्तारलंय. रुटीन आयुष्यातला एक हवाहवासा ब्रेक म्हणून सुट्टी काढून भटकंतीला आता आपण जातो. पण हल्लीच्या बदललेल्या कामाच्या स्वरूपामुळे आणि जॉब प्रोफाइल्समुळे अनेकांना कामासाठी बाहेरगावी जायची संधी मिळते. बाहेरगावी आणि बाहेरच्या देशातही जायची संधी नोकरीमुळे मिळते. अशा वेळी मिळालेल्या सुट्टीमध्ये शक्य तितकं फिरून घेण्यासाठी सगळे तयारीत असतात. यामध्ये मुलीसुद्धा मागे नाहीत.
आयटी, मॅनेजमेंट आणि तत्सम क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींना अनेक वेळा वेगवेगळ्या शहरांत जायची, परदेशातही जायची संधी मिळते आणि मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्या आसपासचा परिसर मनसोक्त बघून घेतात. बऱ्याचदा फारशा ओळखीच्या नसलेल्या कलीग्जबरोबर बाहेर फिरायला जातात. या गोष्टीची त्यांची तयारी असते. किंबहुना भटकंती या समान उद्देशानेच एकत्र आलेली ती तरुणाई असते. एका सायन्स कॉन्फरन्सनिमित्त जर्मनीला जायची संधी मिळालेली अक्षता सांगते, ‘मी आठ दिवसांसाठी जर्मनीला गेले होते. त्या ऐतिहासिक देशात माझ्या इंटरेस्टची अनेक ठिकाणं होती. मी आधीच प्लॅन करून तिथल्या एका कलीगला सांगून सगळी तयारी करून ठेवली होती. कॉन्फरन्स संपल्यानंतर मिळालेल्या चार दिवसांत आम्ही मस्त फिरून आलो.’
टॅलेंट हेड म्हणून काम करणारी माधवी यादव म्हणाली, ‘माझं काम हे टॅलेंट रिसर्च असल्या मुळे आम्हाला शूट करता कामानिमीत्त वेगवेगळ्या ठिकाणांवर जावं लागतं आणि शूट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी  माझंकामासोबत फावल्या वेळात फिरुन एंजॉय करणं पण सुरू असतं. मी माझं काम  सांभाळून बरीच ठिकाणं आत्तापर्यंत बघीतली आहेत. दिल्ली, जयपूर, उदयपूर, कलकत्ता, लखनऊ, गुवाहाटी, राजकोट, अमृतसर, नागपूर, पुणे, गुजराथ, नैनीताल अशा अनेक ठिकाणी मी फिरलेय. अमृतसरला आम्ही कामानिमित्त गेलो की, मी वेळात वेळ काढून गोल्डन टेंपल आणि जालीयनवाला बाग या दोन ठिकाणांना आवर्जून भेट देते.’
एका विमान कंपनीत असिस्टंट सिक्युरिटी मॅनेजर म्हणून काम करणारी प्रीती रानडे म्हणते, ‘मी चार महिन्यांसाठी काठमांडूला गेले होते. तिथे भरपूर फिरले. पशुपतीनाथाचं मंदीर मला फार आवडलं. संध्याकाळी साडेपाच वाजता ऑफिसचं काम संपल्यावर मी साईटसीइंगला बाहेर पडायचे. काठमांडूचे कॅसिनो प्रसिद्ध आहेत. तिथेही जावून मजा केली.’
काही वेळा मुली एकटय़ानेही प्रवास करतात. हल्ली इंटरनेटवरून सगळं बुकिंग होतं आणि बरीच माहितीही मिळत असते. त्याचा वापर करून मुली आपल्या भटकंतीचा प्लॅन स्वत:च तयार करतात असं दिसतं. तीन महिन्यांसाठी ऑफिसतर्फे लंडनला जायची संधी मिळालेली रुपाली सांगते, ‘तिथल्या प्रत्येक वीकएंडला मी फिरले. कधी एकटीच तर कधी सोबत शोधून. पण मला युरोपही बघायचा होता. कुणी सोबतही नव्हतं. मग एकटीनंच जाण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवरून माहिती घेऊन, फिरून आलेल्या मित्रांना विचारून युरोपचा प्लॅन केला आणि मनसोक्त हिंडून आले.’