गप्पाटप्पा, फाइट अ‍ॅण्ड फन, जॉय अ‍ॅण्ड जोक नि आपले फ्रेण्डस् हे सगळं मिळून तयार होतो कट्टा. मग तो कॉलेजचा असतो किंवा सोसायटीतलाही. कॉलेज असो वा सुट्टी कट्टय़ाला जाग असते ती कट्टेकऱ्यांमुळं. कशी? त्याचीच ही प्रातिनिधिक झलक.

विनय चितळे
एस. वाय. बीकॉम,
डी. जी. रुपारेल कॉलेज.
सोसायटीतल्या कट्टय़ाला आम्ही ‘कोर्ट’ म्हणतो. एखादा दिवस या ‘कोर्टा’त गेलं नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. ‘कोर्टा’त सगळ्या एज ग्रुपचे मेंबर्स आहेत. त्यामुळं मोठय़ांकडून आम्हाला गाईडन्स मिळतो, तसेच आम्ही लहानांशी अनेक गोष्टी शेअर करतो. मजेतलं चिडवणं असतं तसाच मदतीचा हातही दिला जातो. सोसायटीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं, शॉिपगचं, फिरण्याचं प्लॅिनग या ‘कोर्टा’त ठरतं. करिअर, स्पोर्टस्, पॉलिटिक्स आणि बऱ्याचशा करंट टॉपिक्सवर चर्चा होते. दरवर्षीप्रमाणं यंदाही आम्ही सगळ्यांनी मिळून मोठ्ठा कंदील तयार केलाय. त्याच्या प्रकाशात ‘कोर्टा’त बसून गप्पा मारताना मजा येतेय.

ऐश्वर्या पटवर्धन
एस. वाय. बी. ए.,
रुईया कॉलेज.
मी दोन कट्टय़ांची मेंबर आहे. रुईयाचा कट्टा आणि शिवाजी पार्कचा कट्टा. दोन्हीवर युथ इंटरेस्टेड टॉपिक्सवर आमच्या गप्पा रंगतात. चांगला पिक्चर, विद्यार्थ्यांशी निगडित असणारं राजकारण, करिअर असे अनेक विषय त्यात असतात. सध्या दिवाळीचा माहोल असल्यानं एकमेकांकडचा फराळ, कुणी त्यात किती मदत केली, शॉपिंग काय केलं, आऊटिंग, रिझल्ट, सेकंड टर्म कशी असेल यावर बोलणं होतंय.

संजना राणे
एस.वाय.बीएस्सी,
रुईया कॉलेज.
‘कट्टा’ म्हणजे गप्पांची मफल. ताणतणाव विसरण्याची मस्त जागा. ‘कट्टय़ा’च्याच भाषेत सांगायचं झालं तर लेक्चर बंक करून एकमेकांची टेर खेचण्याची जागा. कधी तिथं बसून जनर्ल्स कंम्लिट केली जातात, गेम नि गाण्यांची मफलही मस्त रंगते. गप्पांची गाडी करिअर, फ्युचर आणि कधीतरी राजकारणावरही घसरते. आम्ही मरिन लाइन्सला जाऊन धमाल करणार आहोत. ग्रुपमध्ये दोन-तीन फोटोग्राफर असल्यानं सगळ्यांचं मिळून झकास फोटोसेशन करायचा बेत आहे.

अवधूत भागवत
एआयएसएसएमएस आयओआयटी,
पुणे.
पदव्युत्तर शिक्षणासाठी ठिकठिकाणी विखुरलेला आमचा ग्रुप एकत्र यायला मोठ्ठं निमित्त मिळतं ते दिवाळीच्या सुट्टीचं. सगळे मित्र भेटतो ते कॉलेज कट्टय़ावर. लांब असलो तरी फोनमुळं अपडेटस् मिळतात. पण प्रत्यक्ष भेटण्यातली मजा औरच असते. मग नवीन खरेदी बघता बघता जुन्या आठवणी रंगतात. नुकतीच संपलेली परीक्षा आणि प्रॅक्टिकल्स ते ओबामांचं जिंकणं अशा खूप टॉपिक्सवर गप्पा होतात. एवढं सारं केल्यावर पेटपूजा हवीच. पोटभर गप्पा आणि खादाडी झाल्यावर लवकरच भेटण्याचे बेत आखत एकमेकांचा निरोप घेतो.

सुनीता शाहू
एफ.वाय.बीकॉम,
रिझवी कॉलेज.
कॉलेजमधल्या मत्रिणीसोबत मी कार्टर रोडवरच्या जॉगर्स पार्कमध्ये फिरत गप्पा मारते. त्या गप्पांत सुट्टीनंतर लागणाऱ्या रिझल्टचा विषय असतो. अकाऊंटस्च्या पेपरला खरं तर मी आजारी पडले होते. पण तरी पेपर दिला. पहिल्या फटक्यात बॅलन्सशीट टॅली झाली होती. त्यामुळं अकाऊंटस्मध्ये किती मार्क मिळणारेत, याची उत्सुकता लागल्येय. सध्या मी ‘माहीम सार्वजनिक वाचनालया’त पार्टटाइम जॉब करत्येय. कामासोबतच मराठी भाषा शिकत्येय. मराठी शिकताना घडणाऱ्या  गमतीजमती आणि वाचनालयातल्या सगळ्यांच्या सपोर्टविषयीही मी मत्रिणीला सांगते.

निखिल धुरी
एफ.वाय. बीएससी,
कीर्ती कॉलेज.
‘कीर्ती’चा कट्टा फेमस असला तरी मला जास्त आवडतो तो आमच्या सोसायटीतला कट्टा! सुट्टीतलं मनसोक्त झोपणं झाल्यावर आम्ही या कट्टय़ावर जमतो ते थेट सूर्य डोक्यावर येईपर्यंत आमच्या गप्पा आणि टीपी चालू असतो. सोसायटीतल्या साईउत्सवाचं रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यानं आम्ही त्यासाठीची तयारी करतो आहोत. ‘कीर्ती’च्या कट्टय़ावरही आम्ही कधीतरी बंक करून बसतो. हा कट्टा म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रिममधले मित्र हमखास भेटण्याची जागा. दोन्ही कट्टय़ावरच्या गप्पांत कितीतरी विषयांवर चर्चा होते. एकावरून दुसरा विषय निघत राहतो. कॉलेज लाइफमध्ये कट्टा ही ‘आयएमपी गोष्ट’ आहे. तो नसता तर मुलांनी काय केलं असतं ?

Story img Loader