भारतीय योगसाधनेचा जगभरात सगळीकडे ‘ट्रेंड’ निर्माण करणारी तारा स्टाईल्स ‘रिबॉक’ने योगासाठी खास डिझाइन केलेल्या कपडय़ांच्या लाँचिंगसाठी मुंबईत आली होती. त्या वेळी तिच्याशी केलेली बातचीत.
तारा स्टाइल्स – भारतीय योगसाधना जगभरात सगळीकडे ‘ट्रेंडी’ करणारं नाव. योगाची तिनं परदेशातही ‘क्रेझ’ निर्माण केलीय.  योगातून फिटनेस कसा राखता येतो, याचं तारा स्टाइल्स हे बोलकं उदाहरण. अमेरिकेत यशस्वी मॉडेल म्हणून नाव कमावल्यानंतर आता योगा इन्स्ट्रक्टर म्हणून तारा काम करतेय. ‘स्ट्राला योगा’ या नावानं तारानं नवा योगप्रकार तिकडे प्रचलित केलाय. तिच्या यूटय़ूबवरच्या योगा व्हिडीओजनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. जगभरातले हजारो फिटनेस फ्रीक सेलिब्रिटीज ‘स्ट्राला योगा’कडे वळलेत. रिबॉक कंपनीनं तिला योगाची ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनवलं. योगा वेअरच्या लाँचिंगच्या निमित्तानं तारा नुकतीच मुंबईत आली होती. त्या वेळी तिने खास ‘विवा’बरोबर संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तारा स्टाइल्स या नावाची आणि त्याबरोबर तुझ्या स्ट्राला योगाची जगभर क्रेझ आहे. या पारंपरिक भारतीय योगसाधनेची ‘ग्लोबल क्रेझ’ कशी झाली?
योगाचे अनेक प्रकार जगभर प्रचलित आहेत. काही लोक त्यातील ध्यानधारणा या भागावर भर देतात तर काही त्यातल्या अ‍ॅथलेटिक फॉर्मवर म्हणजे आसनांवर भर देतात. गेल्या तीस वर्षांत जगभरात ‘योगा कम्युनिटी’ खूप वाढलीय. पारंपरिक योगामध्ये आता नव्या स्टाइल्स आणि नवी तंत्रं येताहेत. स्ट्राला योगा सुरू करण्यामागे माझा उद्देश या ‘योगा कम्युनिटी’मध्ये नसलेल्या लोकांना याकडे वळवण्याचा होता. ‘आम्हाला योगसाधना करायची नाही. पण आम्हाला बरं वाटण्यासाठी काहीतरी करायचंय’ असं म्हणणारा वर्ग स्ट्राला योगाकडे वळलाय. तन आणि मन मोकळं करण्याच्या उद्देशानं हा योगप्रकार मी सुरू केला. लोकांना सोपं, सहजसाध्य आणि बरं वाटणारं काहीतरी सांगावं या हेतूनं स्ट्राला योगा सुरू केलं. लोक इथं असं मुक्त व्हायला, शरीर आणि मनाला आनंद द्यायला वळतात. योगाचे फायदे कुठल्याही अवघड आसनांशिवाय किंवा अवघड हालचालींशिवाय मिळवण्याचा मार्ग मी उपलब्ध करून दिला. लोकांना नैसर्गिकपणे आणि सहज हालचालीतून रिलॅक्सेशन द्यायचा यात प्रयत्न असतो. यातून आराम वाटतो, उत्साह येतो. म्हणूनच आता रिबॉकसारखी मोठी कंपनी ‘फिट फॉर लाइफ’ असं म्हणत जगभर योगा प्रसिद्ध करण्याचं काम करतीय.

आम्हा भारतीयांसाठी योग काही नवीन नाही. योगासनं पारंपरिक आहेत, पण तुझा स्ट्राला योगा आमच्या पारंपरिक योगापेक्षा कसा वेगळा आहे?
स्ट्राला हा हालचालींवर आधारित योगाचा प्रकार आहे. स्ट्राला योगामध्येदेखील पारंपरिक योगासारखी आसनं आहेत. वरकरणी दोनही प्रकार सारखेच वाटत असले तरीही स्ट्राला योगामध्ये सततच्या हालचालींना महत्त्व आहे. केवळ आसनांवर भर नाही. स्ट्राला योगा करणारी व्यक्ती एखाद्या आसनात किंवा पोझिशनमध्ये बसून राहिलेली दिसणार नाही. व्यक्तीचे सर्व शरीर या व्यायाम प्रकारात काम करत राहते. स्ट्राला योगामध्ये सगळ्या हालचाली श्वासाबरोबर नियंत्रित केल्या जातात हे विशेष आहे. स्ट्राला योगा शिकवत असताना आम्ही लोकांना सांगतो की, त्यांना ज्या  पद्धतीनं आसनं करायला सोयीचं वाटतं, शरीराला योग्य वाटतं त्याच पद्धतीनं हालचाली करा. त्यामुळे योगासनांमध्ये असणारं काठीण्य किंवा एखादं आसन करताना भीती वाटणं असं स्ट्राला योगाच्या बाबतीत घडू शकत नाही. कुठलीही शारिरीक इजा न होता आणि व्यायामाचा वेळ एन्जॉय करत स्ट्राला योगा करता येतं. स्ट्राला योगाबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर सोपा आणि साधा प्रकार असं मी म्हणेन. स्ट्राला या स्वीडिश शब्दाचा अर्थ आहे प्रकाश परावर्तन. योगसाधनेतून तुमच्या आतला प्रकाश प्रज्वलित होतो. मानव प्राणी म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या संयुगातून बनला आहे. त्यामुळे या सगळ्या भागांचा वेगवेगळा विचार न करता एकत्रितपणे एकमेकांसाठी काम केलं तर कुठलाही व्यायाम प्रकार, कुठलीही हालचाल अवघड वाटूच शकत नाही.

भारताबाहेर किंवा आमच्या देशातही बऱ्याच वेळा योगा धर्मसंस्कारांशी जोडला जातो. धार्मिक पूर्वग्रह मनात ठेवूनच योगाकडे बघितलं जातं. तू योगाला धर्मापासून वेगळं ठेवलंस का?
जगभरात अनेक ठिकाणी धार्मिक पूर्वग्रह असतातच. लोकांचे अनेक समज असतात. स्ट्राला योगाचा प्रसार करताना योगा हा  धर्माला जोडला आहे, हा ग्रह मी पुसण्याचा प्रयत्न केला. योगा म्हणजे तुमच्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला जोडणारा प्रकार आहे. या तथ्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मी प्रयत्न केला.

मॉडेल म्हणून यशस्वी करिअर सुरू असतानाच योगा इन्स्ट्रक्टर होण्याचा निर्णय कसा घेतलास? योगाचा तुझ्यावर एवढा प्रभाव कधी आणि कसा पडला ?
मी लहानपणापासूनच योगासनं करायचे. मला ते आवडायचं. लहान असताना मी झाडाखाली बसून ध्यान करायचे. मला ते छान वाटायचं. मी आसनंही करायचे. उलट मला प्रथम मॉडेलिंगची ऑफर आली, तेव्हाच मला आश्चर्य वाटलं होतं. कारण मॅगझिन्समधून मी जे सुपरमॉडेल्सचे फोटो तोवर बघितलेले होते, त्यापेक्षा मी खूपच वेगळी होते. पण संधी मिळाली होती, त्याचा मी फायदा घ्यायचं ठरवलं. मॉडेलिंगनं माझ्यात आत्मविश्वास वाढला. माझ्या अनेक लोकांशी ओळखी झाल्या. मी मॉडेलिंग करतानाही खूश होते. पण तरीही योगाकडे पुन्हा यायला एक मन सांगत होतं. मी तिथे काम करत असतानाही अनेक मॉडेल्सना योगा शिकवायचे. फोटोग्राफर्सना फोटोशूट झाल्यानंतर योगा करायला लावायचे. असं एकातून दुसरं सुचत गेलं आणि त्याच काळात मला माझा नवरा – मायकेल टेलर भेटला. २००८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये मन्रो इथल्या आनंद आश्रमात आमची भेट झाली. मी तेव्हा एका मॅगझिनसाठी लिहायला सुरुवात केली होती. लवकरच आम्ही दोघांनी योगाला आणखी सिरिअसली घ्यायचं ठरवलं आणि ‘न्यूयॉर्क सिटी योगा स्टुडिओ, स्ट्राला’चा जन्म झाला.

तुझ्या स्ट्राला योगामधून वेट लॉस करू इच्छिणाऱ्यांना काही फायदा होतो का?
योगासनांबाबत एक चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या शरिराला नक्की काय हवंय, कशानं त्याला बरं वाटणारे याची जाणीव होते. मन आणि शरीर यांच्या तारा जुळवण्याचं काम योगा करतं. योगाचा तुमच्या लाइफस्टाइलमध्ये तुम्ही समावेश करता त्या वेळी आपोआपच जंक फूड, प्रोसेस्ड फूडपासून तुम्ही दूर राहता, अल्कोहोल कमी घेता आणि अधिक आरोग्यपूर्ण आहार घ्यायला लागता. वजन वाढवणाऱ्या गोष्टींपासून कसं दूर राहायचं हे योगा शिकवतं. कारण तुमचं मनच शरीराला काय योग्य आणि काय अयोग्य ते सांगतं. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावेच लागत नाहीत.

स्ट्राला योगाचा प्रसार न्यू मीडियातून तू मोठय़ा प्रमाणावर केलास. तुझे अनेक ऑनलाइन व्हिडीओ प्रसिद्ध आहेत. सुरुवातीच्या काळात या माध्यमाला कसा प्रतिसाद मिळाला?
स्ट्राला योगा (stralayoga.com)आणि तारा स्टाइल्स (tarastiles.com) या माझ्या वेबसाइटवर योगाची प्रात्यक्षिकं उपलब्ध होती. याशिवाय यूटय़ूबवरून माझे अनेक योगा व्हिडीओज प्रसिद्ध झाले. ते मोफत डाऊनलोड होऊ शकणारे होते. माझे असे ऑनलाइन योगा क्लास अनेकांनी अटेंड केले. ते बघून योगा आत्मसात केलं. कुठेही असलात तरी ही साधनं उपलब्ध असतात. त्यामुळे योगा प्रकाराला अमेरिकेच्या नव्या पिढीनं स्वीकारलं. यूटय़ूबवर बघून सुरुवात केलेल्या अनेकांनी आता स्ट्राला योगाला आपल्या लाइफस्टाइलचा भाग बनवलंय.