एकामागोमाग एक सणाचे दिवस सुरू झाले आहेत. मस्त  प्रफुल्लित वातावरण, आप्तेष्टांच्या भेटी, नवनवीन कपडे आणि मस्त मिठाया यांनी सजलेले हे दिवस. आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या मिठायांची चंगळ दिसते. पण सणाला एखादी मिठाई स्वत: बनवून पाहुण्यांना किंवा घरच्यांना खाऊ घालण्याची मजा काय सांगावी. तर या आठवडय़ात करू या मस्त काही मिठाया. ज्या झटपट होतील, टिकतील पण आणि टेस्टी असतील. करायची का मग सुरुवात?

चॉकलेट कोकोनट बर्फी
साहित्य :सुक्या नारळाची पावडर (डेसीकेटेड कोकोनट), चॉकलेट – १०० ग्रॅम, साखर – २५० ग्रॅम,  मावा – १५० ग्रॅम, साजूक तूप – २ चमचे
कृती : एका कढईत साखरेचा पाक बनवावा त्याकरिता २५० ग्रॅम साखरेमध्ये १५० मिली पाणी घालावे व जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत त्याला ढवळत राहावे. ते मिश्रण एकजीव झाल्यावर त्याच्यामध्ये डेसीकेटड कोकोनट घालावे व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे. नंतर त्याच्यामध्ये चॉकलेटचे बारीक तुकडे घालावेत व ते चांगले मिक्स करावे व गॅस बंद करावा. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर ट्रे घ्यावा त्यावर थोडे तूप घालावे व हे मिश्रण ट्रेमध्ये टाकावे. साधारण दोन तासांनी ही बर्फी घट्ट होईल त्याचे चौकोनी पिस करावेत व नारळाच्या पावडरने त्याला गाíनश करावे.
टीप :- डेसीकेटेड कोकोनट अथवा कोकोनट पावडर बाजारामध्ये उपलब्ध असते.

केसरी बेसन कतली !
साहित्य : बेसन – ५०० ग्रॅम,  तूप – ३०० ग्रॅम, साखर – ३०० ग्रॅम, काजू – १०० ग्रॅम, सजावटीकरिता केसर.
कृती : प्रथम साखरेचा पाक बनवण्याकरिता ३०० ग्रॅम साखरेमध्ये साधारण २०० मिली पाणी घालावे , केसर घालावे व त्याला ढवळत राहावे. साखर पूर्ण विरघळली पाहिजे. एक कढई घ्यावी तिला मंद आचेवर ठेवावे व त्यामध्ये तूप टाकावे. तूप चांगले तापल्यावर त्यामध्ये बेसन घालावे व चांगले ढवळत राहावे. जेव्हा बेसन चांगले ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये काजू पावडर घालावी व त्याला चांगले मिक्स करून घ्यावे. जेव्हा हे मिश्रण कढई सोडू लागेल तेव्हा गॅस बंद करावा व आपण तयार केलेला साखरेचा पाक त्यात ओतावा. साखरेचा पाक घालून झाल्यावर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे व त्याला थंड होऊ द्यावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याला ट्रेमध्ये काढावे व त्याला चांगल्या प्रकारे सजवावे.

अंजीर मावा बर्फी
साहित्य : अंजीर – पाव किलो, साखर – १०० ग्रॅम, मावा – ५० ग्रॅम,  काजू- १०० ग्रॅम, बदाम – २ (सजावटीकरिता)
कृती : प्रथम अंजीर धुऊन घ्यावे व त्याला कोमट पाण्यामध्ये १० मिनिटे भिजवावे. अंजीर चांगले मऊ झाल्यावर त्याला सुरीने ओबडधोबड कापावे. साखरेचा पाक बनवण्याकरिता १०० ग्रॅम साखरेमध्ये ५० मिली पाणी घालावे व त्याला साखर विरघळेपर्यंत ढवळावे. साखर विरघळल्यावर त्यात मावा घालावा व त्याला एक जीव करावे. साधारणपणे १० मिनिटांनी मिश्रण कढईच्या तळाला चिकटण्याचे बंद होईल. नंतर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालावे. त्यामध्ये ओबडधोबड कापलेले अंजीर घालावे व त्याला अशा प्रकारे हलवावे जेणेकरून हे मिश्रण कढईला खाली चिकटणार नाही. जेव्हा अंजीर चांगला शिजल्यावर त्याच्यामध्ये काजू पावडर घालावी व व्यवस्थित एक जीव करून घ्यावे. गॅस बंद करावा हे मिश्रण एका ताटामध्ये काढावे व त्याला थंड होऊ द्यावे. मिश्रण हलके थंड झाल्यावर टेबलावर पसरावे/ ट्रेमध्ये घालावे व त्याला चौकोनी आकारात कापावे. प्रत्येक चौकोनी बर्फीवरती आपण त्याला बदामाने सजवू शकतो. जेणेकरून त्या बर्फीची शोभा वाढेल.

Story img Loader