मितेश जोशी
सुप्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार, दिग्दर्शक अशा एकापेक्षा एक भूमिका लीलया पार पाडणारी दिलखुलास व्यक्ती म्हणजे वन अॅण्ड ओन्ली अवधूत गुप्ते. अवधूत जितकं मनापासून गाण्यावर प्रेम करतो तितकंच प्रेम तो खाबूगिरीवरही करतो. अवधूत हा चहाचा ‘चाहता’ आहे. त्यामुळे अवधूतचं ‘चहा आख्यान’ वाचू या आजच्या ‘फुडी आत्मा’मध्ये..
अवधूतच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. सर्वसामान्य मराठी माणूस जसा चहा पितो तसा चहा न पिता त्याची स्वत:ची चहा बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. याविषयी बोलताना तो थेट चहाचा इतिहासच उलगडून सांगू लागतो. ‘आपण चहाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, चहाचा शोध साधारणपणे ख्रिस्तपूर्व १५०० ते १०४६ या काळात लागला. चीनमध्ये शेंग राजघराण्याने औषधी पेय म्हणून चहा वापरायला सुरुवात केली आणि चहाचा शोध लागला. चीनमधून चहाची लोकप्रियता जगभर पसरत गेली. चहाच्या क्षेत्रातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली आणि भारतीयांना खऱ्या अर्थाने चहाचा परिचय झाला. ब्रिटिशांनी आसामच्या खोऱ्यात आणि दार्जिलिंगच्या डोंगरांमध्ये चहाची लागवड सुरू केली. १४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतात चहाचं उत्पादन जोर धरू लागलं. हळूहळू चीनइतकाच चहा भारतात तयार होऊ लागला. आज भारत चीननंतरचा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे,’ हा इतिहास सांगताना त्यातलं महत्त्वाचं काय लक्षात घ्यायला हवं हेही तो आपल्या शैलीत सांगतो. या इतिहासावरून लक्षात येतं, पाण्यामध्ये चहाची पानं घालून ती उकळवून ते पाणी प्यायल जायचं. इथं कुठंच दुधाचा वापर नव्हता. त्यामुळे मलाही चहात दुधाचा तिटकारा आहे, असं त्याने सांगितलं. काहींच्या मते भांडय़ात कोरा चहा उकळवला, त्यात दूध नाही घातलं तर त्या भांडय़ांना तडे जातात. माझ्या दृष्टीने तडे गेले तरी चालतील, पण मला दुधाचा चहा नको या मतावर मी ठाम आहे. मी खूप वेगवेगळय़ा प्रकारचे चहा मनापासून पितो आणि इतरांनाही प्यायला लावतो, हेही तो आवर्जून सांगतो.
तुझी चहा पिण्याची पद्धत नेमकी कशी असते? असा प्रश्न त्याला विचारला असता तो म्हणाला, ‘भौगोलिक वातावरणानुसार दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये ताजा चहा येतो. सर्वसाधारण मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या चहाची किंमत जर आठशे रुपये किलो असेल तर ‘दार्जिलिंग फस्र्ट फ्लश टी’ हा सोळा हजार रुपये किलो असतो. मी हा चहा पिण्यासाठी आसुसलेला असतो, माझ्या घरी माझा स्वत:चा टी बार आहे. जिथं वेगवेगळय़ा देशांतील चहा आहेत. आमच्या घरचा किराणा मालाचा महिन्याचा खर्च जेवढा होतो तेवढाच माझ्या चहाचा खर्च होत असल्याने माझी बायको माझ्यावर प्रचंड चिडते,’ असंही तो गमतीने सांगतो.
अवधूतला वेगवेगळय़ा देशांतला चहा प्यायला आवडतो. ‘मला चहाच्या बाबतीतलं अज्ञान भयंकर टोचतं. मला स्वत:ला दार्जिलिंग टी प्यायला आवडत असल्याने मी बाहेर जाताना किंवा सेटवर जातानासुद्धा माझ्या टी बॅग्ज बरोबर घेऊन फिरतो. जर कोणी मित्र बाहेर देशात भ्रमंतीला जातोय हे मला कळलं तर त्याला त्या देशातला चहा मला आणून द्यावाच लागतो. तैवानमध्ये जपान आणि चीन या दोन्ही देशांच्या पारंपरिक मिश्रणातून तयार झालेला ‘ओलांग टी’ मिळतो. या चहाची एक दंतकथाही आहे. एका चहा मळेवाल्याचं पाळलेलं माकड दोरखंड तोडून जंगलात पळून गेलं, खूप शोध घेऊनही ते सापडत नव्हतं. पुढे पाच दिवसांनी ते माकड आपल्या मालकाकडे परत आलं, कारण त्या चहा मळेवाल्याने बनवलेल्या विशिष्ट चहाची त्या माकडाला एवढी सवय झालेली होती की ते चहाशिवाय राहूच शकलं नाही.’ या दंतकथेबरोबरच त्याला सगळय़ात जास्त चहा कुठला आवडतो याविषयीही त्याने खुलून सांगितलं. तो म्हणतो, ‘मला मॉरिशस आणि थायलंडमधला चहादेखील आवडतो, पण सगळय़ात जगात भारी कुठे चहा मिळत असेल तर तो भारतातच मिळतो. ईशान्येकडील सिक्कीम हे भारताचे अनमोल रत्न आहे. सिक्कीम, आसाम आणि दार्जिलिंग इथल्या चहाचा घाऊक व्यापार सिलिगुडीला चालतो. गेली वीस वर्ष मी सिलिगुडीवरूनच चहा मागवतो. माझा कुरियरचा खर्च हा चहाच्या बिलापेक्षा जास्त होतो खरा.. शेवटी चहासाठी कायपण!’
महाराष्ट्रात पुदिना, आलं घातलेला, दालचिनी चहा, लवंग घातलेला चहा, मसाला चहा, वेलदोडे घातलेला चहा, स्पेशल गवती चहा, गुळाचा चहा अशा वेगवेगळय़ा स्वरूपात चहा आपल्यासमोर येतो. अगदी उकाळा, कुल्हड चहा, केशरी, मलाई मारके, रजवाडी, बासुंदी चहा, तंदुरी चहादेखील भारतात मिळतो. चहामध्ये दूध घातलेलं अवधूतला जरी आवडत नसलं तरी ब्रिटिशांनी याची सुरुवात कशी केली याचा गमतीशीर किस्सा ऐकवल्याशिवाय त्याला राहवत नाही. ‘पोर्सेलीनची नाजूक भांडी त्या काळात राजघराण्यात प्रसिद्ध होती. चहाच्या तापमानामुळे या नाजूक भांडय़ांना तडे जाऊ लागले. त्या काळातील ब्रिटिश सुगरणींनी त्यावर उपाय म्हणून चहामध्ये थोडंसं दूध घालायला सुरुवात केली, ज्यायोगे ते तापमान नियंत्रित होऊन नाजूक भांडय़ांना तडे जाणार नाहीत. त्यांची ही युक्ती सफल झाली आणि दुध घातलेल्या चहाचा जन्म झाला,’ असा किस्सा त्याने सांगितला.
चहाची एवढी आवड कशी निर्माण झाली? याबद्दल बोलताना अवधूत सांगतो, ‘१९९९ साली सागरिका म्युझिकबरोबर काम करण्याचा योग आला. इथं काम करणाऱ्यांमध्ये बव्हंशी बंगाली मंडळी होती. भारतामध्ये त्यातल्या त्यात बंगाली माणसांचं चहापान रॉयल आहे. चहाची आवड मला या बंगाली माणसांनी दिली, अर्थात ती चव वाढवण्याचा व अभ्यास करण्याचा प्रयत्न मी स्वत: केला. ‘कभी कबार चेला गुरू से आगे निकल जाता है’.. तसं काहीसं माझ्या बाबतीत घडलं.’ अवधूतचं चहापुराण इथंच थांबत नाही. ‘वेगवेगळय़ा फुलांचे चहादेखील असतात. मला जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यायला आवडतो. या चहासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जातो, या चहाचा रंगही लाल असतो. काहीशी आंबटसर चव असलेल्या या चहामध्ये अँटी ऑक्सिडंट्स, क आणि अ जीवनसत्त्व, पोटॅशियम असल्याने फिटनेस शौकिनांसाठी या चहाचं सेवन लाभदायक ठरतं. हा चहा बनवण्यासाठी खास जास्वंदीच्या चहाच्या टी बॅग्ज बाजारामध्ये मिळतात. शिवाय, घरच्या घरी चार ते पाच ताजी जास्वंदीची फुलं किंवा अर्धा कप सुकवलेल्या जास्वंदीच्या फुलांची पावडर, आठ कप पाणी, पाव कप मध, तीन मोठे चमचे लिंबाचा रस इतक्या साहित्यात हा चहा बनवता येतो. ताज्या फुलांचा चहा बनवताना फुलातील मधला तुरा काढून टाकून मग ही फुलं धुऊन आठ कप पाण्यामध्ये घालत पाणी उकळायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाण्याच्या भांडय़ावर झाकण ठेवावं. पंधरा मिनिटांनी झाकण काढून या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून चांगलं मिसळायचं आणि मग हा चहा गाळून घ्यायचा. हा चहा गरम किंवा थंड अशा दोन्ही स्वरूपात पिता येतो’ अशी या चहाची कृतीही त्याने सांगितली.
अवधूतच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या दार्जिलिंग टीने होते. ब्रेकफास्टला अंडय़ाचे किंवा डोशाचे प्रकार तो खातो. त्याच्या डाएटनुसार तो भात आणि मैदा खात नाही. दुपारच्या जेवणात वेगवेगळय़ा प्रकारच्या कोशिंबिरी, वेगवेगळय़ा प्रकारचं वरण, भाज्या खायला त्याला आवडतात. वाटीभर वरण आणि पोळीपेक्षा भाजीचं प्रमाण त्याच्या आहारात अधिक असतं. जेवण झाल्यानंतर तो अर्ध्या तासाने ताक पितो. संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यानची किंचित भूक फळाने किंवा ड्रायफ्रूटने शमवली जाते, तर संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान तो वेगवेगळय़ा प्रकारचे सॅलड खाऊन भोजन संपवतो. खूप उशिरा रात्री जेवायचं नाही हा त्याचा नियम आहे. चीट डेच्या दिवशी वेगवेगळय़ा प्रकारचे चाट, टर्की फूड, थाय फूड किंवा जपानी सुशी खायला त्याला आवडतं, असं तो सांगतो.
अवधूतच्या परदेश वाऱ्याही खूप होत असतात. महाराष्ट्रातही रोड ट्रिप करणं त्याला आवडतं. ‘मुंबईतून गाडी बाहेर काढली आणि पुण्याच्या दिशेने कूच केलं की माझा पहिला विश्राम दत्त स्नॅक्समध्ये असतो. तिथला साबुदाणा वडा आणि पीयूषचा मी फॅन आहे. पुढे पुण्यात बाणेरजवळ रानजाई ढाबा आहे. तिथं मटण भाकरीवर ताव मारल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. साताऱ्यातील क्षीरसागर यांच्या मानस हॉटेलमध्ये मिळणाऱ्या जत्रा मटणावर हल्ला करून मी पुढे कोल्हापूरला माझ्या मित्राच्या देहाती हॉटेलला आवर्जून भेट देतो. बेळगावला मिळणाऱ्या नियाज बिर्याणीचा मी चाहता आहे. अहमदनगरमध्ये संदीप हॉटेलमध्ये मिळणारं अळणी मटणदेखील मला जिव्हातृप्ती देतं. अळणी म्हणजे बिगरतिखटाचं, पिवळसर असणारं हे ‘अळणी मटण’ जगात भारी लागतं. ऐकल्यावर नवल वाटेल पण नागपूरमध्ये मोठय़ा प्रमाणावर कोळंबीची शेती केली जाते. तिथे गावाबाहेर असणाऱ्या ढाब्यांवर वेगवेगळय़ा चवीतली ताजी कोळंबी मिळते. नागपूरला येऊन सावजी सगळेच खातात, पण कोळंबी खाऊन बघा, वेडे व्हाल..’ असं सांगत खाबूगिरीच्या आठवणींमध्ये अवधूत रमतो.
अवधूतच्या घरी तीन वेगवेगळय़ा ज्ञातींची खाद्यसंस्कृती नांदते. अवधूत सीकेपी असल्याने समृद्ध असे सीकेपी खाद्यपदार्थ, बायको कऱ्हाडे ब्राह्मण असल्याने सात्त्विक शाकाहार एकीकडे तर आई माहेरची कुडाळ देशकर असल्याने सारस्वत पद्धतीचे पदार्थही ताटात असतात. ‘माझ्या घरी तिन्ही पद्धतीचं जेवण अत्यंत उत्तम बनतं. मी स्वत: उत्तम सीकेपी मटण बनवतो. त्या मटणाचे अनेक चाहते आहेत. बोंबील कालवण, सुकी मासळी, कडव्या वालाचं बिरडं, त्याची खिचडी असे टिपिकल सीकेपी पदार्थ घरी होतच असतात. त्याचबरोबर मातुल घराण्याचं सारस्वती पद्धतीचं तिखलं, वेगवेगळय़ा भाज्या असे पदार्थही आम्ही चवीचवीने खातो. ही वैविध्यपूर्ण, श्रीमंत खाद्यसंस्कृती घरात असल्याने जर मी घरी मुलांना म्हटलं की आज घरी मटण बनणार आहे तर ते पहिल्यांदा विचारतात सारस्वत पद्धतीने की सीकेपी पद्धतीने? खाण्यातला ज्ञातीयवाद हा असा मुलांपर्यंतदेखील पोहोचला आहे, असं अवधूत गमतीने सांगतो. केवळ गाणंच नव्हे तर अष्टपैलू असं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या गुप्तेंचं खाद्यप्रेम हाही तितकाच विषय खोल आहे हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
viva@expressindia.com