|| अनुजा भिडे

अनेकदा असं होतं की, संधी चालून येते आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. माझं तसंच काहीसं झालं. मी ‘वाटुमल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर दोन र्वष ‘एल अ‍ॅण्ड टी’मध्ये नोकरी केली. दरम्यान, रुटिनचा कंटाळा आल्याने काही तरी वेगळं केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, असं वाटायला लागलं. पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं तर मॅनेजमेंट किंवा टेक्नॉलॉजी हे पर्याय होते. मला तंत्रज्ञानाचा पर्याय अधिक चांगला वाटला. त्यासाठी उत्तम देश म्हणजे अमेरिका. तिथल्या टेकहबमध्ये चांगली संधी मिळाली असती. विद्यापीठांमध्ये संशोधनाला खूप वाव असून त्यावर बरीच गुंतवणूक केली जाते. हा सगळा विचार करून मी अर्ज करायला सुरुवात केली. त्या वेळी माझ्या आवडीच्या विषयांचे अभ्यासक्रम आहेत का ते पाहिलं, प्राध्यापक आणि त्यांच्या संशोधनाची माहिती काढली. शिष्यवृत्ती वगैरे गोष्टींची चाचपणी केली. ही सगळी शोधाशोध माझी मीच केली. फक्त एका एजन्सीकडून माझा अर्ज योग्य आहे ना, हे पारखून घेतलं होतं. घरच्यांनी माझ्या या निर्णयाला कायमच सर्वतोपरी पाठिंबा दिला. कायमच प्रोत्साहन दिलं. भारतातल्या प्रवेश परीक्षांच्या वेळी नोकरी आणि अभ्यास ही तारेवरची ठरू शकणारी कसरत त्यांच्यामुळे तुलनेने सोपी झाली.

Viral video of elder man driving cycle rikshaw with passanger in it went viral on social media
वयोवृद्धाचा संघर्ष पाहून डोळ्यात येईल पाणी! दिव्यांग आजोबांनी एका पायाने चालवली सायकल रिक्षा, VIDEO झाला व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Pune's Favourite Bappa Long Queues at Shrimant Dagdusheth Temple in Pune Viral Video
पुणेकरांचा लाडका बाप्पा! श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची भली मोठी रांग, Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Loksatta anyartha Confusion in MPSC Result MPSC Affected Maharashtra State Public Service Commission Exam Recruitment
अन्यथा: तात्यांचा ठोकळा…!
Puneri pati viral poster boy on Diwali funny message goes viral on social media
दिवाळीआधी ‘ही’ गोष्ट केली नसेल तर लगेच करून घ्या, तरुणाची पुणेरी पाटी होतेय व्हायरल
small boy did while bursting firecrackers
‘बाळा, आयुष्य खूप लहान आहे…’ फटाके फोडताना चिमुकल्याने केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही संतापले
navi Mumbai police commissioner
पनवेल: भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयुक्तांचे बदलीशस्त्र
Viral video of a man launched rockets before diwali
“आमच्याकडे रॉकेट उडवून मिळतील”, काकांची दिवाळीआधीच जय्यत तयारी, VIDEO एकदा पाहाच

माझा अर्ज न्यूयॉर्कमधल्या दोन विद्यापीठांमध्ये आणि एकेक अर्ज न्यूजर्सी, सिनसिनाटी आणि टेक्सास या विद्यापीठांमध्ये मंजूर झाला होता. त्यापैकी मला सगळ्यात जास्ती अभ्यासक्रम आवडला तो बिंघमटन युनिव्हर्सिटीचा! न्यूयॉर्कमध्ये असणाऱ्या या विद्यापीठात ‘मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स’ला प्रवेश घेतला. प्रवेशप्रक्रिया अगदी पद्धतशीर असल्याने त्यात कोणतीही अडीअडचण आली नाही. मास्टर्सची दोन र्वष आता संपत आली आहेत. तरीही सुरुवातीचे काही दिवस अजूनही आठवतात. याआधीच्या परदेश प्रवासात कुटुंबीय सोबत होते. इथं येताना मी आणि माझी रूममेट एकत्र आलो. दोघीही पहिल्यांदाच अमेरिकेत येत होतो. एअरपोर्टहून विद्यापीठ लांब असलं तरी विद्यापीठातर्फे पिकअपची सोय असल्याने काही त्रास झाला नाही.

हे विद्यापीठ अनेक सोयीसुविधांनी युक्त आहे. इथली ग्रंथालयं खूपच मोठी असतात. पुस्तकं आणि पेपर्स आदी अभ्यास साहित्याला तोडच नसते. काही वेळा ग्रंथालयात अभ्यास करायला जागाच मिळत नाही. अशा वेळी अभ्यासासाठी एखादी रूम असेल तर तिथं जाता येतं. तेव्हा स्टडी कॅरल्सची मोफत सोय उपयुक्त ठरते. ग्रंथालयात स्कॅनिंग- प्रिंटिंगची सोय असून त्यासाठीची रक्कम फीमध्ये समाविष्ट केलेली असते. काही वेळा काही कारणांमुळे ग्रुप स्टडी करणं आवश्यक ठरतं. त्यासाठी मोफत ग्रुप स्टडी रूम्सची सोय असते. फक्त त्या रूमची आधीच ऑनलाइन नोंदणी करावी लागते. ऑनलाइन लायब्ररी कॅ टलॉगची सोय आहे. म्हणजे संदर्भासाठी काही रिसर्च पेपर्स हवे असतील तर ते वाचायला मिळू शकतात. इथल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या ‘आयजीएसओ’ या गटातर्फे विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. आम्ही ऑफ कॅम्पस राहतो. भारतातूनच आमचं घर बुक केलं होतं. मात्र पहिल्यांदा विद्यार्थी येतो, तेव्हा घरात काहीच सेटअप नसतो. त्यामुळे किमान दोन-चार दिवस तरी राहायची सोय हवी असते. म्हणून आधी आलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी नवीन विद्यार्थ्यांची राहायची सोय ‘आयजीएसओ’तर्फे केली जाते. घराची नोंदणी आधी केली नसेल तर त्यासाठीही मदत करण्यात येते. योगायोगाने माझ्या मैत्रिणीच्या बहिणीकडे आमची राहायची सोय झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या इंडक्शनमध्ये नवीन विद्यार्थ्यांना इथल्या कायदा-सुव्यवस्थेची माहिती वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होता. नंतर आमच्या विभागाचं इंडक्शन झालं. तेव्हा कॉफी-कुकीज वगैरे सव्‍‌र्ह करण्यात आल्या होत्या. तेव्हा न्यूयॉर्कमधल्या कायद्यांची माहिती देण्यात येते. त्याखेरीज आमच्या अभ्यासक्रमाच्या ओरिएंटेशनमध्ये अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली जाते. दर महिन्याच्या एका शुक्रवारी इंटरनॅशनल कॉफी अवर होतो. तिथं विद्यार्थी असेच रमतगमत फिरू शकतात किंवा गप्पाटप्पा मारत स्नॅक्स आणि कुकीजचा आस्वाद घेऊ  शकतात.

विद्यार्थ्यांचा जीपीए (ग्रेड पॉइंट अ‍ॅव्हरेज) आणि अकॅडमिक रेकॉर्ड चांगला असेल तर टीचिंग असिस्टंट म्हणून किंवा प्राध्यापकांचा रिसर्च असिस्टंट म्हणून काम करायची संधी मिळते. शिवाय ग्रॅज्युएट रिसर्च असोसिएट म्हणूनही संधी मिळते. मला सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करायची संधी मिळाली. अशा तऱ्हेचं काम मिळाल्यामुळे टय़ूशन फी कमी होते, स्टायपेंड मिळतो. त्यामुळे शैक्षणिक कर्ज काढून आलेल्या विद्यार्थ्यांना थोडासा मदतीचा हात मिळतो. आधी ‘एल अ‍ॅण्ड टी’मध्ये काम केल्याने कॉर्पोरेट कल्चरशी ओळख झाली होती. त्यामुळे इथं काही संधी मिळाल्यावर मुलाखती देताना तो अनुभव उपयोगी पडतो. अमेरिकनांचं इंग्रजी थोडं वेगळं आहे. त्यांचे काही शब्द आपल्या माहितीहून वेगळे आहेत, त्यामुळे सुरुवातीच्या काळात थोडासा गोंधळ उडाला होता. पण आपण इंग्रजी मालिका बघत असल्याने अगदी महिन्याभरात सगळं गाडं रुळावर आलं. इथं आपल्या संकल्पना अधिक सुस्पष्ट होतील. आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडलात तर त्याचा पुढच्या करिअरमध्ये तितकाच फायदा होऊ  शकेल. सध्या एका कंपनीत आम्ही काही विद्यार्थी वेगवेगळ्या टीम्समध्ये काम करतो आहोत. उदाहरणार्थ, मी सॉफ्टवेअरमध्ये आहे. आमची कंपनी औषध वितरण करते. त्यांच्याकडचे रोबो औषधं बाटलीत भरणं, बाटलीला झाकण लावणं ही सगळी प्रक्रिया करतात. ती स्वयंचलित असते. त्याचा एक ठरावीक क्रम असतो. फक्त प्रिस्क्रिप्शन भरावं लागतं. त्याच्या सॉफ्टवेअरचं काम मी करते. आमची टीम मे महिन्यात होणाऱ्या एका मोबाइल अ‍ॅपच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

वर्गात प्राध्यापक- विद्यार्थ्यांची भरपूर चर्चा होते, कारण फक्त शिकवणं आणि ऐकणं अपेक्षित नसतं. अर्थात काही वेळा नियमाला अपवाद असतातच. आमच्या बॅचमध्ये जवळपास ७० टक्के भारतीय विद्यार्थी आहेत. त्याखेरीज चीन, तुर्की, जॉर्डन, श्रीलंका, पाकिस्तान आणि स्थानिक आदी देशांतले विद्यार्थी आहेत. काही प्रोजेक्टमध्ये आम्ही इतर देशांतील विद्यार्थ्यांसोबत काम केलं होतं. तो अनुभव चांगला होता. तुर्कीमधल्या विद्यार्थ्यांसोबतच्या प्रोजेक्टला यश मिळालं. हे यश साजरं करायला आम्ही बाहेर गेलो होतो. अन्य देशांतल्या मित्रमंडळींशी बोलण्याचे विषय हे बहुतांशी भविष्यातले शिक्षण-नोकरीच्या संदर्भातले बेत, प्रत्येकाचा आधीचा करिअर ग्राफ वगैरे असतात. तंत्रज्ञानातल्या घडामोडी हा सगळ्यांच्या आवडीचा विषय कायम गप्पांत असतोच. बऱ्याच जणांना भारतीय पदार्थ आवडत असल्याने आम्हाला हमखास चांगलं रेस्तराँ आणि पदार्थाविषयी सल्ला विचारला जातो. इतकंच काय, सगळ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी आणि जागतिक स्तरावरील घटनांची माहिती असते. क्वचित काही वेळा आपल्याला त्यांच्याकडून भारतातली एखादी घटनाही कळते.

विद्यापीठात दिवाळी आणि होळी मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. ‘आयजीएसओ’तर्फे गणपती, नवरात्र आदी उत्सव साजरे होतात. विविध विषयांशी निगडित खूप प्रकारचे क्लब आहेत, मात्र त्यात जायला मला वेळ मिळत नाही. इथल्या स्टीम रूममध्ये आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टसाठी लागणारं साहित्य ठेवलं जातं. त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला खूपच वाव मिळू शकतो. माझ्या मित्रमंडळींपैकी काही जणांनी तिथं पेंटिंग वगैरे केलं आहे. मला मात्र तिथं जायला अजिबात वेळ मिळालेला नाही. इथं चालायला- फिरायला भरपूर मोकळी आणि चांगली जागा आहे. त्यामुळे वॉक किंवा जॉगिंगला जाणं होतं. शिवाय विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधाही आहेत. त्यामुळे थोडासा फावला वेळ मिळालाच तर मी खेळते. आम्ही चौघी रूममेट एकत्र स्वयंपाक करतो. वाणसामानाची वगैरे एकदमच खरेदी करतो. आम्ही मुंबई-पुण्याच्या असल्याने आमच्या खाण्याच्या आवडीनिवडी पुष्कळशा सारख्या आहेत. आम्ही आमचेही सणवार साजरे करतो. दिवाळीला घरून आलेल्या पार्सलमधल्या कंदील-पणत्या लावून दिवाळी साजरी करतो. मधल्या काळात मी दोनदा भारतात येऊन गेले असले तरी घरच्यांना आणि आपल्या सणवारांना थोडीशी मिस करते.

आम्ही तिघी मैत्रिणी न्यूयॉर्क शहरात फिरायला गेलो होतो. टाइम्स स्क्वेअरमध्ये खूप वेळ फिरत होतो. खरं तर आमची रात्री ११ची बस होती, पण आम्हाला वाटत होतं की ११.४०ची बस आहे. आम्ही खूप वेळ तिथं फिरतच बसलो. नंतर येऊन पाहिलं तर ११ची बस निघून गेली होती. ती शेवटची बस होती. एकीकडे काय करावं, या विचारात पडलो आणि दुसरीकडे असं घडलंय याची थोडीशी मज्जाही वाटत होती. रात्रभर फिरायचं म्हटलं तरी आम्ही आधीच फिरून जाम दमलो होतो. त्यामुळे बसमध्ये ताणून द्यायची आणि आरामात घरी पोहोचायच्या बेतावर अगदी पाणी पडलं होतं. मग न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीला फोन करून सगळी कथा ऐकवली. तिने दिलासा देत तिच्याकडे जाणारी बस पकडायला सांगितली. तिच्याकडे राहिलो आणि थोडं न्यूजर्सीही फिरून झालं. आता अभ्यासक्रम संपत आला असून नोकरीसाठी अर्ज करणं सुरू आहे. आधी अनुभव घेऊन त्यानंतर पुढे पीएचडीचा विचार करायचा बेत आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संधी तर मिळाली आहे, बघू या पुढे काय होतं ते..

कानमंत्र

येताना काळजी करायचं कारण नाही. नियमांच्या चौकटी पाळल्यात तर खूप चांगला अनुभव मिळू शकेल. संकुचित विचार आणि पूर्वग्रह, भ्रामक कल्पनांमध्ये राहणं टाळा. वस्तुस्थितीला सामोरं जा. कुणाच्याही प्रभावाखाली वावरणं टाळा.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com