नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
आजचा आघाडीचा गायक अरिजित सिंग याचा शनिवारी (२५ एप्रिल) वाढदिवस. केवळ २८ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या अरिजितने एवढय़ा कमी वयात एवढा आवाका गाठलाय, की त्याच्याकडे कौतुकाने पाहावे की ईर्षेने हेच कळत नाहीये. गाण्यातल्या भावना इतक्या सहजरीत्या आणि इतक्या प्रभावीपणे पोहोचवण्याची कला त्याने कशी अवगत केली असेल, त्याचे तोच जाणे. अजून एक म्हणजे त्याने आजच्या काळातल्या प्रत्येक गायकाकडून काही ना काही घेतले आहे; शिकले आहे. अगदी अतीफ अस्लमलासुद्धा त्याने सोडले नाहीये! पण त्यामुळे झालेय असे, की मोहित चौहान, अतीफ अस्लमसारख्या अनेक गायकांची दुकाने बंद होण्यात आहेत. सगळ्यांना केवळ आणि केवळ अरिजितच हवाय! सादर आहे आजची अरिजित स्पेशल प्ले लिस्ट :
अरिजितने सगळ्या संगीतप्रेमींचे लक्ष वेधले ते मर्डर 2 च्या ‘दिल सम्भल जा जरा’ गाण्याद्वारे आणि मग आलेल्या ‘एजंट विनोद’मधल्या ‘राबता’मुळे त्याचा श्रोत्यांबरोबर जो राबता तयार झाला तो आजही कायम आहे. या आणि अशा गाण्यांमुळे रोमँटिक गाणी गाणारा अशी ओळख निर्माण झालेल्या अरिजितने मला ‘फिर ले आया’ ऐकवून तर चाटच केले. बापरे! काय अभ्यास, काय रियाझ करत असेल हा इसम! ‘बर्फी’ चित्रपटातल्या ‘फिर ले आया दिल’मध्ये याने भल्या भल्या गजल गायकांना लाजवेल अशी गायकी पेश ए खिदमत केली आहे.
मग आला २०१३ मधला आशिकी-2. माझ्या मते ‘आशिकी-2’ हा चित्रपट आणि अल्बम हिट करण्यात ९० टक्के वाटा हा अरिजितचा आहे. ज्या पद्धतीने त्याने साध्यासुध्या चालीच्या ‘तुम ही हो’ला कुठच्या कुठे नेऊन ठेवले, ते कुठल्याच गायकाला शक्य नाही. ‘चाहू म या ना’ या गाण्याबद्दलपण हेच म्हणता येईल. ‘आशिकी-2’ मधल्या अरिजितच्या गायकीवर अतीफ अस्लमचा प्रभाव नक्कीच जाणवतो. विशेष करून आवाजातील कंपने ही त्याने अतीफचा खास अभ्यास केल्याचे दर्शवतात.
मला खरा धक्का तर ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ या गाण्याने दिला होता. हे गाणे अरिजितने गायले आहे, यावर माझा श्रेयनामावली वाचेपर्यंत विश्वासच नव्हता बसला! किती वेगळा बाज, ढंग, टोन त्याने या गाण्यासाठी काढलाय! बस्स.. वो दिन है और आज का दिन है.
अरिजितचे आलेले कुठलेच गाणे मी ऐकायचे सोडत नाही. त्यातूनही ‘इलाही मेरा जी आए’, ‘कबीरा’, रामलीलामधले ‘लाल इश्क़’, ‘आर..राजकुमार’मधले ‘धोखाढडी..’, ‘हॅपी न्यू इयर’मधले ‘मनवा लागे..’, ‘यारिया’मधले ‘लव मी थोडा और’, ‘2 स्टेट्स’मधले ‘मस्त मगन’, ‘हॉलिडे’मधले ‘शायराना’, ‘किल दिल’मधले ‘सजदे..’, ‘हॅपी एंिडग’मधले ‘जैसे मेरा तू..’ आणि माझे सर्वात आवडते ‘हैदर’ मधले ‘गुलों मे रंग भरे..’ ही गाणी मी अभ्यास म्हणून सारखी सारखी ऐकत असतो. अवघ्या चार-पाच वर्षांत यशाची उंच शिखरे सर करणाऱ्या, हसतमुख गायकीच्या, मेहनती गळ्याच्या अष्टपलू आवाजाच्या अरिजित सिंगला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
हे ऐकाच.. : अरिजित अनप्लग्ड
अरिजित हा सध्या सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत आहे. त्यामुळे त्याचे काहीच तुम्ही चुकवत नसाल अशी मला खात्री आहे. तरीही बघायचे वा ऐकायचे राहूनच गेले असेल, तर टळश् अनप्लग्डच्या सीझन २ आणि ३ मधले अरिजितचे परफॉर्मन्सेस आवर्जून अनुभवावे असेच आहेत. आपलीच गाणी लाइव्ह गाताना त्याने त्या गाण्यांमधे जे बदल केले आहेत ते कमाल आहेत. तसेच सीझन २ मधला एकदम शहाण्या मुलासारखा अरिजित आणि सीझन ३ मधला अनुभवी, पोक्त अरिजित असा झालेला फरक पाहूनही गंमत वाटते. अरिजित हा अनेक वर्षांपूर्वी फेम गुरुकुल नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये होता. तो वयाने लहान तरीही स्मार्ट, कॉन्फिडंट अरिजित पाहून गंमत तर वाटतेच, पण तेव्हाच्या अरिजितपासून आजच्या ‘द अरिजित सिंग’पर्यंत त्याने केलेला प्रवास पाहून नतमस्तक व्हायला होते.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com