मिठाई हा आपल्या समाजजीवनाचा, संस्कृतीचा  ठेवा आहे. आपल्याकडे तर मिठाईच्या इतक्या तऱ्हा की, सण कमी पडतील अशी अवस्था. त्यात आजकाल चॉकलेटने भर घातली आहे. पण चॉकलेट आलंय ते मिठाईला सोडून नाही, तर तिचा स्वाद पोटात घेऊन! हो, काही चॉकलेट निर्मात्यांनी मिठाईचा स्वाद असलेली चॉकलेट बनविण्यास सुरुवात केली आहे.. आणि का करू नये? कारण मिठाईचा सच्चा भक्त खूश झाला पाहिजे आणि चॉकलेटप्रेमीला त्याचा आवडता ब्रॅण्ड आणि चॉकलेटी चव मिळाली पाहिजे, हा त्यामागील उद्देश. म्हणजे सचिन तेंडुलकरला शतकासाठी सहा धावा हव्या आहेत आणि त्याने त्यासाठी षटकार लगावला, तर या दोन्ही गोष्टींचा जो आनंद मिळेल तो चॉकलेट आणि मिठाईच्या संगमातून मिळेल, असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक सणाचा एक स्वाद आहे. तो कुटुंबासोबत घेणे तर अधिक आनंददायी. पूर्वी ही मजा असायची. शहरात वा शहराबाहेर विखुरलेले आपले कुटुंबीय त्यानिमित्ताने एकत्र यायचे आणि खमंग खाद्यपदार्थ आणि नानाविध गोड पदार्थावर अक्षरश: ताव मारायचे. आजकाल हे सारे हरवत चालले आहे हा झाला त्यातील कडू भाग! पण गोड भाग, एकमेकांना मिठाई देण्याचा.. तो अजून सुरू आहे. ‘यूटय़ूब’वर ‘बॉम्बे शेफ’मधील माझ्या एका व्हिडीओमध्ये मी राजस्थानी पारंपरिक घेवरची रेसिपी समजावून सांगितली आहे. विशेष म्हणजे या माझ्या निर्मितीच्या दोन प्रतिक्रिया उमटल्या. त्यातील एक ‘पॉझिटिव्ह’ तर दुसरी अर्थातच ‘निगेटिव्ह’ होती. ज्यांनी ही रेसिपी आजमावून पाहिली त्यांनी तिचं कौतुक केलं, तर काहींना तळणासाठी अतीच तूप वापरणं फार काही भावलं नाही. मिठाईत तर हा त्रिवेणी संगमच असतो.

चॉकलेटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कॅलरी काउंट बदलत नाही कदाचित पण चॉकलेट निर्मात्यांनी नात्यां-नात्यांमधील प्रेमासहित आपल्या उत्पादनाची दिशा ठरवली आहे. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक सणाला जशी वेगळी मिठाई बनवली जाते, तसे हल्ली प्रत्येक सणाला वेगळं चॉकलेट कलेक्शन बाहेर येतं. ‘कॅडबरी’ने रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी आपली आगळी पद्धती अमलात आणली. म्हणजे संपूर्ण भारतातील बहिणींसाठी त्यांनी चॉकलेटस्च्या बॉक्समध्ये सोनेरी रंगाच्या दोन राख्या ठेवल्या. म्हणजे सणाचे प्रतीकही आणि चॉकलेटही असा तो ‘फंडा’ होता, बहुतेक काळाची गरजही म्हणा हवं तर. ‘फेरेरो रॉशर’ यांची तऱ्हा याहून न्यारी. त्यांनी आपल्या ‘गोल्डन पॅक’मध्ये मोतीचूर लाडूसारखे दिसणारे २४ चॉकलेट्स लड्डू भरलेले होते. ‘सिल्क’मध्ये खास मिनिएचर पॅक बनवून सणासुदीच्या दिवसात सादर करण्यात आला. त्याममध्ये बटरस्कॉच, सी सॉल्ट, आमंड आणि मिल्क चॉकलेट यासह २० विविध स्वादांचा समावेश होता. ‘कॅडबरी’ने नुकतंच बाजारात आणलेलं ‘माव्‍‌र्हलस क्रिएशन’. हे उत्पादन दोन स्वादांमध्ये आणलं गेलंय. यातील मिल्क चॉकलेट फ्रुटी हे माझं सर्वात आवडतं. यात पॉपिंग कॅण्डी, जेम्स आणि फ्रूट जेली, तर दुसऱ्यात कुकीज आणि क्रंची नटस्.

‘चॉकलेट बुके’ हा अलीकडचा नवा आविष्कार म्हणावा लागेल. म्हणजे सणाची भेट देताना चॉकलेट सोबत फुलं वेगळी आणायला नकोत. फुलांच्या बुकेच्या ऐवजी चॉकलेटचा बुके. टू इन वन! पण बऱ्याचदा या चॉकलेट बुकेसाठी दर्जेदार चॉकलेट्स वापरली जातातच असं नाही. बुके  दिसतो चांगला, पण माझ्यासारख्या चॉकलेटियरला चॉकलेटच्या दिसण्यापेक्षा अर्थात पॅकेजिंगपेक्षा त्याच्या स्वादाला महत्त्व आहे.

गणेश चतुर्थी १० दिवसांवर येऊन ठेपलीय. माझ्या घरीही दीड दिवसाचा गणपती येतो. कुठल्याही कलाकाराला कलेसाठी शुभाशीर्वाद देणारी ही देवता. माझ्यातल्या कलाकारावरही ही देवता प्रसन्न झाली, असं मी मानतो. एका नॅशनल चॅनलसाठी काही काळापूर्वी चॉकलेटपासून गणेशमूर्ती बनविण्याचा माझा ‘शो’ झाला होता. तो बराच गाजला. भारतात चॉकलेटपासून बनवलेला पहिली गणेशमूर्ती माझ्या हातून साकार झाली. पुढे तशी कलाकारी अनेकांनी सुरू ठेवली. अशी ही चॉकलेटची सणांशी असलेली घनिष्ठता येत्या काळात अधिक वाढण्याचीच चिन्हे आहेत. पण जाता जाता मला एक सांगावंसं वाटतं की, गणपती बुद्धीची देवता आहे, तिच्याकडे आपल्या मनातून सवरेत्कृष्ट काही तरी निर्माण करण्याची प्रार्थना करू या, जेणेकरून त्यातून सर्वाना आनंदच मिळेल.

वरुण इनामदार

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)

 

Story img Loader