देशीविदेशी चॉकलेटचा मनापासून आस्वाद घेणाऱ्या चॉकलेटिअर आणि शेफनं केलेले चॉकलेटी रसग्रहण.

आजच्या लेखात चॉकलेट चिप्स कुकीजबद्दल..

दिवाळी संपून आता पंधरवडा झाला तरी अजून तो सुट्टय़ांचा माहोल कायम आहे. दिवाळी म्हणजे कुटुंबानं एकत्र येऊन साजरा करण्याचा दिवस. लहानपणी सुट्टीच्या काळात आम्ही सगळी नातवंडं आजीच्या भोवती जमा व्हायचो आणि आजीकडून राम-सीतेच्या गोष्टी ऐकायचो. सोबतीला केशरी दूध प्यायचो. आता एवढय़ा उशिरा मी दिवाळीच्या आठवणी का जागवतोय असं तुम्ही विचाराल तर कारण आहे- फराळ. नेहमीच्या पारंपरिक फराळाव्यतिरिक्त काही तरी वेगळं करायचं असं वाटणारे काही थोडे असतात, त्यापैकी मी एक आहे. नेहमीच्या पदार्थाना माझा स्वतचा टच देऊन त्यातून काही कल्पक नवीन डिश बनवणं मला आवडतं. या दिवाळीत मी बेक्ड चॉकलेट चिप शंकरपाळी केली. ही आमच्या घरच्या फराळाची खास डिश ठरली. अगदी युनिक. कलर्स मराठीवरच्या मेजवानी परिपूर्ण किचन या कार्यक्रमात मी बनवलेली पान ब्राउनी, शेव बर्फी आणि इन्स्टंट चॉकलेट फज तुम्ही पाहिलं असेल. अशा वेगळ्या पदार्थानी तुमच्या कल्पकतेला आव्हान मिळतं आणि नवीन काही केल्याचं समाधानही. घरच्या फराळात मी बनवलेली बेक्ड चॉकलेट चिप शंकरपाळी म्हणजे तशी माझी नेहमीची फेव्हरेट चॉकलेट चिप कुकीजची रेसिपी, पण मी या कुकीज छान शंकरपाळ्यांच्या आकारात कापली. आमच्याकडची ही कुकीजची शंकरपाळी घरात आवडलीच, शिवाय बाहेरून आलेल्या मित्रमंडळी आणि आप्तांनाही ती इतकी आवडली की, ती इन्स्टंट हिट झाली.

चॉकलेट चिप कुकी हा तसा जगभरात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. पण तो अस्तित्वात आला कसा?

बहुतेक सगळ्या पाककृतीविषयक पुस्तकांमध्ये किंवा बेकरी बुकमध्ये कुकी हा अपघाताने सापडलेला पदार्थ असल्याचे लिहिलेले आहे. असं म्हणतात की, १९३८ मध्ये रुथ ग्रेव्ह्ज वेकफील्ड यांनी किचनमध्ये दुसरं काही करीत असतानाच चुकून शोध लागलाय या चॉकलेट चिप कुकीचा. या महाशया तशा आळशी. त्यांच्या किचनमध्ये काम करीत असताना चुकून नेहमीच्या कुकीसाठी भिजवलेल्या पिठाच्या मिश्रणात चॉकलेट चिप्स पडल्या. वेकफील्डना वाटलं या चोकोचिप्स बेक करताना वितळून जातील आणि नेहमीसारख्याच कुकी दिसतील. त्यांनी त्या वेगळ्या काढल्या नाहीत. पण बेकिंग झाल्यानंतर पाहिलं तर त्या विरघळलेल्या किंवा वितळलेल्या नव्हत्याच. चॉकलेट चिप कुकीजचा शोध लागला तो असा. पण वेकफील्ड बाईंनी नंतर मीच हा शोध कसा मुद्दाम लावला याचे दावे केले. असो.. चुकून किंवा मुद्दामहून या चविष्ट पदार्थाचा शोध लागला हे महत्त्वाचं. वेकफील्ड यांची ही रेसिपी अमेरिकेच्या प्रसिद्ध कुकु बुकमध्ये नोंदली गेली आणि अमेरिकन घराघरांमध्ये पोचली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी मॅसेच्युसेट्स स्टेटमधले अमेरिकन सैनिक बाहेरच्या देशांमध्ये लढायला गेले तेव्हा त्यांच्या घरून आलेल्या चॉकलेट चिप कुकीज तिकडे दूरदेशीदेखील हिट झाल्या. वीकफील्ड बाईंच्या चॉकलेट कुकीज अशा प्रकारे जगभरात पोचल्या आणि लोकप्रिय झाल्या.

भारतात या कुकीजची क्रेझ मात्र अलीकडच्या काळातच निर्माण झाली. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या चॉकलेट चिप कुकीजमध्ये सनफीस्ट डेलिशस गॉरमे कुकीज, एक्स्प्रेस फूड्स डॉमिनोज कुकी, सफायर, कॅडबरीज, चिप्स अहॉय, जेकबसन, युनिबिक आणि बॉब्ज रेड मिल ग्लुटेन फ्री चॉकलेट चिप कुकी मिक्स (घरच्या घरी कुकी बनवायचा पर्याय) हे ब्रॅण्ड्स प्रमुख आहेत. यातला सर्वोत्तम किंवा उत्कृष्ट असा कुठलाच नाही, खरं तर! कारण मला वाटतं किंमत आकर्षक ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे चॉकलेट या कुठल्याच कुकीमध्ये वापरत नाहीत. त्यामुळे कुकी म्हणून चांगल्या असल्या तरी चॉकलेट चिपची अस्सल चव त्यात नाही.

चॉकलेट चिप कुकी म्हणजे छान बेक केलेलं, कुरकुरीत आणि चॉकलेटी बिस्किट. या कुकी घरी बनवण्यातला आनंद वेगळाच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही घरी बनवलेल्या चॉकलेट चिप कुकीजची चव या बाजारू कुकीजना नक्की येणार नाही. बेकिंगची हौस असेल तर कुकीज बनवणं अजिबात अवघडोही. कशा करायच्या विचारताय? ही बाजूच्या चौकटीत दिलेली रेसिपी.. तुमच्यासाठी.. माझ्याकडून प्रेमाची भेट!

चॉकलेट चिप्स कुकी

घटक साहित्य : बारीक साखर – २५०, अंडी – ४, लोणी – १७५ ग्रॅ, मैदा – २५० ग्रॅ, कोको पावडर – ५० ग्रॅ, बेकिंग सोडा – ६ ग्रॅ, डार्क चॉकलेट (ब्लॉक असेल तर बारीक तुकडे करून घ्या) – २०० ग्रॅ, डार्क चॉकलेट (वितवळवलेले) – २०० ग्रॅ

कृती : बटर आधी रूम टेम्परेचरला येण्यासाठी फ्रीजमधून काढून ठेवा. त्यामध्ये साखर घालून भरपूर फेटून घ्या. बटर आणि साखरेचं स्मूथ मिक्श्चर तयार व्हायला हवं. त्यामध्ये अंडी घालून पुन्हा व्यवस्थित फेटून घ्या. आता हळूहळू मैदा, कोको पावडर, बेकिंग सोडा आणि डार्क चॉकलेटचे तुकडे या मिश्रणात घालून ढवळा. सगळ्यात शेवटी मेस्टेड डार्क चॉकलेट घालून मिश्रण नीट हलवून घ्या. हे मिश्रण चार तास फ्रीजमध्ये ठेवा (डीप फ्रीज नाही) बाहेर काढून त्याचे लिंबाच्या आकाराचे छोटे गोळे करा आणि ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानावर १० मिनिटं बेक करून घ्या. दहा मिनिटांनी ओव्हनमधून काढून बेकिंग ट्रे जरा थंड होऊ द्या. त्यावर तयार झालेल्या कुकीज एअर टाइट डब्यात घट्ट झाकण लावून ठेवा.

Story img Loader