चॉकलेटचा मनापासून आस्वाद कसा घ्यायचा यासाठी प्रसिद्ध चॉकलेटिअरने केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण.. चॉकलेटच्या चवीत कुठला स्वाद बहार आणतो हे ठरवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. चॉकलेट आणि लिंबू हे भन्नाट कॉम्बिनेशन आहे. अनेक लक्झरी चॉकलेट्समध्ये हे वापरलं जातं. या दोन स्वादांची एकत्रित चव कुठल्याही पदार्थाची लज्जत वाढवते. या स्वर्गीय स्वादाच्या कॉम्बिनेशनचा मागोवा..
इतके दिवस माझ्याबरोबर चॉकलेट विश्वाची सफर केलेल्यांना आता काही वेगळं, थोडं हटके सांगायची वेळ आली आहे. चॉकलेटचं रसग्रहण करताना वर्षांनुवर्षे चाखलेली तीच चॉकलेटी टेस्ट आवडून चालत नाही. तुमची जीभ वेगवेगळे आस्वाद घेण्यासाठी तयार करावी लागते. चॉकलेटबरोबर काही पदार्थ असे काही मिळून जातात की, या मिलाफातून एक अफलातून चव निर्माण होते. भन्नाट कॉम्बिनेशन. आर्टिझन चॉकलेट्स अशा विविध कॉम्बिनेशननं बनवली जातात. चॉकलेटिअरची कलात्मकता आणि कल्पनाशक्ती इथेच तर पणाला लागते. असा एक चॉकलेटबरोबर भन्नाट लागणारा घटक पदार्थ म्हणजे लिंबू. हो.. आपल्या स्वयंपाकघरातलं साधं लिंबू, चॉकलेटबरोबर येतं तेव्हा अशी काही चव जमते की, जणू ही जोडी स्वर्गात बांधलेली असावी. चॉकलेटच्या गोड चवीत आंबट लिंबू कुठे, असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी ही चव नाहीच. ज्यांना चवीचे प्रयोग आवडतात आणि त्याचं रसग्रहण जे मनापासून करतात, त्यांच्यासाठीच अशी कॉम्बिनेशन्स असतात.
चॉकलेट आणि लिंबू हे माझ्या वैयक्तिक आवडीचं कॉम्बिनेशन आहे. जगभरातल्या प्रतिष्ठित व्यक्तींसाठी जेव्हा मेन्यू डिझाइन करायची संधी मला मिळते, तेव्हा मी आवर्जून या कॉम्बिनेशनचा वापर करतो. २०१० मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर आले होते, तेव्हा त्यांच्यासाठी योजलेल्या भल्याथोरल्या मेन्यूमध्ये सहभागी व्हायची संधी मला मिळाली होती. तेव्हा मी त्यांच्यासाठी सॉफ्ट लेमन सेंटर्ड असलेली चॉकलेट्स बनवली होती. जॉर्डनची राणी रानिया यांच्यासाठी अशीच एक डेलिकसी बनवायची संधी मला मिळाली. त्यांच्यासाठी मी मिक्स बेरीज टार्ट बनवले होते. रोझ क्रीम त्यासाठी वापरलं होतं आणि टार्ट सजवण्यासाठी डार्क चॉकलेट आणि लेमन झेस्ट वापरलं होतं. टार्टच्या वर अलगद डार्क चॉकलेट आणि लिंबू किसून घातल्यामुळे टार्ट्सना एक वेगळी चव मिळाली होती. अगदी थोडय़ा प्रमाणात लिंबू आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशनदेखील पदार्थाला सर्वस्वी वेगळी, भन्नाट चव प्रदान करू शकतं.
खरं तर गेली कित्येक र्वष जगभरातले चॉकलेटियर संत्र आणि चॉकलेट हे क्लासिक कॉम्बिनेशन मानायचे. तेही उत्तमच लागतं. पण अलीकडच्या काळात संत्र्याची जागा लिंबाने घेतली आहे. जगभरातले अनेक चॉकलेटियर लेमन अॅण्ड चॉकलेट्सच्या कॉम्बिनेशनवर गांभीर्याने प्रयोग करत आहेत. आता या भन्नाट कॉम्बिनेशनचे बाजारात उपलब्ध असलेले पर्याय बघू या. आधी म्हटलं तसं, हे असं कॉम्बिनेशन आर्टिझन चॉकलेट्समध्येच बघायला मिळतं. ‘पॅसकॅटी’चा ‘इंडल्जन्स बार- लेमन अॅण्ड जिंजर’ एकदा नक्की ट्राय करा. शिवाय ‘हायदी’चं डार्क मिंट अॅण्ड लेमन चॉकलेट, बेल्जियन्स मिल्क चॉकलेट विथ लेमन, ‘डार्क आयव्हरी’चं लेमन चॉकलेट हे प्रकार चाखून बघायला हवेत. खरं तर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे चॉकलेट बार आता भारतात मिळायला लागले आहेत. पण या विदेशी चॉकलेट बारमध्येही अशी लेमन चॉकलेट्स मिळणं अजूनही आपल्याकडे तसं दुर्मीळ आहे. चॉकलेट्स नसली तरी आपल्या देशात लेमन फ्लेवर्ड कॅण्डीज मात्र चिक्कार दिसतात. व्हिटॅमिन सी आणि खूप सारी इन्संट एनर्जी देणाऱ्या या च्युइज आणि कॅण्डीज अगदी पूर्वीपासून वाण्याच्या बरणीतदेखील स्थान टिकवून आहेत. ‘रावळगाव’ची लेमन कॅण्डी, ‘स्काय लॉफ्ट’ची खट्टा मीठा जेली, ‘नेसले’ची फॉक्स ही लेमन फ्लेवर्ड कॅण्डी, ‘ट्र जॉय’ची ऑरगॅनिक फ्रूट च्युइज आणि इतर अनेक लहान मोठे ब्रॅण्ड्स लेमन कॅण्डी बनवण्यात आघाडीवर आहेत.
कॅण्डीजमध्ये लिंबू आहे, पण चॉकलेटबरोबर का नाही, याचा विचार माझ्या मनात कायम येत असे. ‘बारकोड’ नावाखाली मी आर्टिझन चॉकलेट्सचा ब्रॅण्ड निर्माण केला, तेव्हाही हा विचार मनात होता. या लिंबाचा चॉकलेटबरोबर वापर करताना मी आणखी थोडी कल्पना चालवली. झारखंड राज्याचं बारकोड चॉकलेट तयार करताना मी लिंबू आणि चॉकलेटसह कांचन आवळा आणि कोरिएण्डर सॉल्ट वापरलं. इतर भारतीय चॉकलेटियरदेखील चॉकलेटची चव लिंबानं वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या चवीची भारतीय जिभांना सवय करत आहेत. ‘शिबानीज् शोकोलाट्झ’नं लेमन फ्लेवर्ड चॉकलेट स्प्रेड बनवला आहे, तर ‘सॅमशॉप’ने लेमन फ्लेवर्ड मिल्क चॉकलेट बाजारात आणलं आहे. आणखीही काही देसी ब्रॅण्ड्स चॉकलेट- लेमन हे भन्नाट कॉम्बिनेशन आपल्या विविध प्रॉडक्ट्समध्ये वापरू लागले आहेत. माझं देशातील अन्य चॉकलेटियर्सना आवाहन आहे की, तेच ते घिसेपिटे चॉकलेट बनवण्याऐवजी हे कॉम्बिनेशन वापरून बघावं. या निमित्ताने तुमच्यासारख्या चॉकलेटप्रेमींनाही एक आवाहन की, चॉकलेटच्या त्याच त्या चवीबरोबर अशी काही वेगळी चव चाखून बघण्याची तयारी ठेवा. चॉकलेटची चव एका उंचीवर नेणारं हे लेमन- चॉकलेटचं कॉम्बिनेशन स्वर्गीय स्वाद नाही वाटला तर सांगा.
– वरुण इनामदार
(अनुवाद : अरुंधती जोशी)