प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफ वरुण इनामदार यांनी देश-विदेशातील चॉकलेट्सची चव घेत केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण! आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त एनर्जी बार किंवा न्यूट्रिशन बारविषयी आजच्या लेखात..

असं म्हटलं जातं की काही माणसं खाण्यासाठी जगतात, तर काही जगण्यासाठी खातात; परंतु हाच विचार जर आमच्या मुंबईपुरता करायचा झालाच तर या दोन्हीही वाक्यांमध्ये तसा फारसा फरक उरणार नाही. आजच्या धावत्या जगात, नाही.. धावत्या मुंबईत, घरापासून मिनिटागणिक दूर जाणाऱ्या माणसाला भूक जवळ करू लागते, तेव्हा जगण्यासाठी तर खावं लागतंच, पण खाण्यासाठीही जगावं लागतं. का? कशासाठी? ते सांगतो.. स्टेशन, बसस्टॉप वा कुठे नाक्यावर काहीही खा, ही मनोवृत्ती ‘खाण्यासाठी जगा’साठी योग्य असली तरी ‘(चांगलं) जगण्यासाठी (चांगलं) खा’साठी योग्य नाही, असं माझं ठाम मत आहे. कामाच्या धावपळीत आपण शांतपणे, आरामात जेवणं, त्यानंतरची शतपावली, दुपारची वामकुक्षी अशा अनेक गोष्टी हरवून बसलोत. असो.. हा कधी नंतर चर्चा करण्याचा विषय. पण तंदुरुस्तीसाठी चांगलं खाणं महत्त्वाचं असतं. ‘कन्फेक्शनरी’ उद्योगाचा हल्लीचा महत्त्वाचा ‘फंडा’ मी जवळून पाहत आलो आहे. तो म्हणजे एकाच ‘बाइट’मध्ये आरोग्यदायी घटक द्यायचे. याच तत्त्वावर अनेक कंपन्या स्पर्धेत जीव तोडून उतरत असतात. धावपळीच्या जीवनात पोषणाचा समतोल बिघडू नये अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी कन्फेक्शनरी उद्योगाने एनर्जी बार किंवा न्यूट्रिशन बार निर्माण केले. आता भारतातही ‘एनर्जी बार’ किंवा ‘न्यूट्रिशन बार’ मिळू लागले आहेत.

एनर्जी बार म्हणजे ड्राय फ्रूट, चॉकलेट, नट्स, बिया आणि पौष्टिक धान्यांचे प्रकार एकत्र करून तयार केलेला स्वादिष्ट बार. खास करून प्रवासात किंवा जाता जाता खाणाऱ्यांसाठी या बारचं महत्त्व अधिक ठळक होते. कुठेच थांबायचे नाही. प्रवास महत्त्वाचा आहे. वेळेत पोहोचायचे आहे. वाटेत खाण्याचे काही दिसत नाहीये. अशा वेळी बारच्या पोटात दडलेल्या विविध पोषणतत्त्वांचा लाभ होऊ शकतो. आता हा एनर्जी बार तुमच्या नेहमीच्या चौरस आहाराशी समांतर नसला तरी, आरोग्यदायी आहाराच्या कोणत्या तरी तत्त्वाशी तो मिळताजुळता आहे, एवढं मात्र नक्की. म्हणूनच भारतात उपलब्ध असलेले काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या एनर्जी बारची ओळख येथे करून देणे योग्य ठरेल. पोषण आणि चव या दोहोंचा मिलाफ झालेल्या चॉकलेटपासून बनवलेल्या सडसडीत बांध्याच्या ‘राइट-बाइट मॅक्स प्रोटिन – चोको स्लिम बार’विषयी पहिल्यांदा बोलू. हा बार हल्ली ऑनलाइन बाजारात उपलब्ध असतो. सकस आहाराची तत्त्वे हा बार तंतोतंत पाळतो. व्हिटामिन, फायबर, प्रोटिन आणि काबरेहायड्रेट्सचं सुयोग्य प्रमाण यातल्या घटकांनी साधतं. बारमधील मखमली चॉकलेटमध्ये गुंडाळलेले बदाम, काजू आणि पिस्ता यांचं मिश्रण म्हणजे जिभेवरचा ताबा जवळजवळ सुटलेलाच असतो. यातील आणखी एक निर्मिती म्हणजे ‘चॉकलेट बर्फी’. अर्थात चॉकलेट फज फ्लेवरचा बार. चॉकलेट प्रेमींसाठी हा मोहाचा दुसरा टप्पा. म्हणजे जिभेचे लाड पुरवणाऱ्यांसाठी हा बार अगदी जवळचा आणि हेल्दी पोषणतत्त्वांनी परिपूर्ण.

साखरेचे खाणार त्याला देव देणार! हे तत्त्व आजच्या युगात जरा बदलून घ्यावं लागतंय. आता थेट देवच देणार अशी जरी संकल्पना असली तरी साखरेचं खाणारे कमी होत चालले आहेत. याला कारणं बरीच आहेत. मधुमेह, अतिरक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा ही आजच्या संस्कृतीची देणगी असल्याने साखरेचे खाण्यावर अनेकांनी नियंत्रण आणले आहे वा त्यांना आणण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी ‘कन्फेक्शनरी’ क्षेत्राने सकस काहीतरी देण्याचे चंग बांधला आहे. म्हणून मग नटस्, चॉकलेट आणि कॉफी यांच्या मिलाफातून ‘एचवायपी-लीन’ कंपनीने साखरमुक्त ‘चॉकलेट एस्प्रेसो प्रोटीन बार’ बाजारात आणला आहे. म्हणजे चॉकलेट सोबत कॉफीचा मोहक आस्वाद देणारा एनर्जी बार.

बहुतांश केमिस्टांकडे मिळणारे इतरही काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे एनर्जी बार आता आपल्या परिचयाचे झाले आहेत. विशेषत जी मंडळी जिमिंग करतात, त्यांना याचा परिचय अधिक आहे. हाय इंटेन्सिटी वर्कआऊट करणाऱ्यांना इतर प्रोटीन सप्लिमेंटबरोबर हे बारदेखील सुचवले जातात. म्हणून ते केमिस्ट स्टोअर्समध्ये मिळतात. या बारचं असं आहे की, साखरेला टाळून प्रोटीन शरीराला पुरवायचे. अशा एनर्जी बारवर अनेकांच्या उडय़ा पडतात. यात ‘ऑलमॅक्स आयसोफ्लेक्स ट्रीपल लेयर प्रोटिन आयसोलेच बार’चा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. प्रोटिन आयसोलेट (वे प्रोटिन आणि सोया यांच्या रुपातील)हा यातला प्रमुख घटक. यांमध्ये चॉकलेट कॅरमल क्रंच, चॉकलेट पीनट बटर फज आदी फ्लेवर्स मिळतात. डॉ. कार्बराइटचे जगभर प्रसिद्ध असलेले युनिव्हर्सल न्यूट्रिशन बार पोषणतत्त्वांनी भरलेले आहेत आणि अनेकांना जेवणाइतकाच आधार ठरलेले आहेत. यम्मी चॉकलेटचा थर असलेला एनर्जी बार तर परमावधीच. क्वेस्ट बार चॉकलेट चीप कुकी फ्लेवरविषयी तर मला अधिक काही सांगण्याची गरज भासू नये. इतकी याची चव सगळं सांगणारी आहे.

चवीने क्षुधाशांती करणाऱ्या या साऱ्या ताऱ्यांमध्ये आणखी एका भारताच्या तेजस्वी ताऱ्याचा उल्लेख करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. भारतात नव्याने प्रसिद्ध झालेल्या एनर्जी बारच्या क्षेत्रात ‘सन हायजिन’चा नॅचरल एनर्जी बार हा अस्सल देसी ब्रँड आपली स्वतंत्र ओळख ठेवण्यात यशस्वी झालाय. इतर फ्लेवर बरोबरच याचा चोको- क्रॅनबेरी फ्लेवर तर विशेष. विविध प्रकारच्या फ्लेवर्सनी नटलेल्या एनर्जी बारची निर्मिती ही सन हायजिन या भारतीय कंपनीचे वैशिष्टय़. त्यामुळेच तर या क्षेत्रात ही कंपनी देशातील आघाडीची कंपनी आहे. आता एवढं असूनही चवीनं खाणाऱ्यांना आणि प्रयोगशील असणाऱ्यांना यातलं काहीच रुचलं नसेल, तर स्वतच एनर्जी बार बनवावेत. स्वत:ला हवा तसा, हव्या त्या फ्लेवरमध्ये एनर्जी बार बनविण्यासाठीच्या रेसिपी इंटरनेटवर जागोजागी आहेत. आता त्यात कोणती चव आणि पौष्टिक तत्त्व मिसळायची आणि त्यासाठी किती वेळ द्यायचा, याचा निर्णय चोखंदळ खवय्यांचा आहे.

जाताजाता एक सांगावसं वाटतंय. – कोणताही एनर्जी बार जेव्हा तुम्ही निवडाल, तेव्हा त्यात सामावलेल्या घटकांचा काळजीपूर्वक विचार करा. त्यात विविध प्रकारचा सुकामेवा, चॉकलेट, नटस् यांच्यावर अधिक भर असायला हवा. कृत्रिम प्रीझर्वेटिव्ह्ज आणि साखर असणारे एनर्जी बार दूरच ठेवले पाहिजेत. कारण शेवटी हेल्दी स्नॅक म्हणून तुम्ही एनर्जी बारकडे वळताय.. ते हेल्दी नसतील तर काय उपयोग? कारण शेवटी चव आणि आरोग्य जेथे हातात हात घालून येतं. तिथेच तंदुरुस्त शरीर उत्तरोत्तर मजबूत होत असतं.
(अनुवाद – गोविंद डेगवेकर)

Story img Loader