देशी विदेशी चॉकलेटचा मनापासून आस्वाद घेणाऱ्या प्रसिद्ध चॉकलेटिअर आणि शेफनं केलेलं हे चॉकलेटी रसग्रहण..
आजचा लेख लिहिण्याआधी महाराष्ट्रातील तमाम चॉकलेट रसिकांना माझा मानाचा मुजरा! गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या प्रत्येक लेखाबाबत आस्था राखत तुम्ही मला पत्र, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक संदेश पाठवलेत. तुमच्या या प्रेमामुळे लेखक म्हणून मला वेगळी अनुभूती मिळते आहे. या स्तंभाच्या माध्यमातून मी तुमच्याशी जोडला गेलो याचा मला खूपच आनंद वाटतोय आणि मी त्यासाठी मला भाग्यवान समजतो. चॉकलेटवरच्या अनेक नावीन्यपूर्ण प्रयोगांबाबत या सदरातील उल्लेख वाचून वाचक माझ्याकडे बोलते-लिहिते झाले, याचं अप्रूप माझ्यासाठी कायम राहील. खरं तर आता मी एका वेगळ्या वळणाविषयी बोलणार आहे. ते म्हणजे ‘लिक्यूअर चॉकलेट’विषयी. मी हा लेख लिहिताना ऑलरेडी छोटय़ा बाटलीच्या आकारातील एक लिक्यूअर चॉकलेट तोंडात घातलंय. देशातील मोठी हायपर स्टोअर्स आणि विमानतळांवर हल्ली हे माझ्या आवडीचं लिक्यूअर चॉकलेट मिळायला लागलंय. अॅन्थन बर्ग हे या बाटलीच्या आकाराच्या चॉकलेटचं ब्रॅण्डनेम.
लिक्यूअर चॉकलेट्सबद्दल बोलण्यापूर्वी एक गोष्ट सांगावीशी वाटते. हा चॉकलेटचा प्रकार अनेक कारणांसाठी – चांगल्या आणि वाईट – सध्या सतत चर्चेत आहे, कारण सरकार आणि अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची (एफएसएसएआय) निगराणी आणि र्निबध. काही महिन्यांपूर्वी लिक्यूअर चॉकलेट्सचे निर्माते प्रचंड तणावाखाली होते. खरं तर ही चॉकलेट्स दिवाळीसाठी कॉर्पोरेट गिफ्टिंगचा सगळ्यात आवडता पर्याय ठरलेली आहेत. हा तर त्यांच्या व्यवसायाचा सीझन. पण योग्य परवाना नसल्याकारणाने ‘लिक्यूअर चॉकलेट्स’ची विक्री करणाऱ्या दुकानांवर सरकारची वक्रदृष्टी पडली. आपल्या देशात दारूविक्रीचा परवाना असल्याखेरीज अल्कोहोलमिश्रित चॉकलेट विकायला मनाई आहे. अशा परवाना नसणाऱ्या दुकानांमधील उत्पादने मागे घेण्याविषयी ‘एफएसएसएआय’ने सांगितले आहे. जर ती मागे घेण्यात आली नाहीत तर सरकार स्वत:हून त्यावर कारवाईसाठी पुढाकार घेईल, असे सांगण्यात येत आहे. परवाना नसताना अल्कोहोलमिश्रित चॉकलेट्स विकणे, तसा व्यापार करणे भारतीय कायद्यानुसार अवैध आहे. अशा उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्राधिकरणाने चॉकलेटचे काही नमुने तपासण्यासाठी हाती घेतले. त्यात अल्कोहोलचा अंश मिळाल्यास संबंधित निर्मात्यांवर आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. यातील काही जणांना अटकही करण्यात आली. त्यामुळे देशातील कोको व्यावसायिक आणि विक्रेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
खरं तर दिवाळी आणि पाठोपाठ येणारे ख्रिसमस, न्यू इअर या उत्सवाच्या काळात देशातील अनेक शहरांमधली विशेषकरून महानगरांतील मोठी दुकाने अशा ‘लिक्यूअर चॉकलेट्स’नी भरून जातात. या चॉकलेट्सचा खप दुपटीने- तिपटीने वाढलेला असतो. पण गेल्या वर्षीपासून राज्याच्या अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी लिक्यूअर चॉकलेट्स किंवा अल्कोहोलमिश्रित चॉकलेट विकणाऱ्या दुकानदारांना तसा परवाना बाळगणे बंधनकारक केले आहे; परंतु विभागाने इथवरच न थांबता अशी चॉकलेट्स विकत घेणाऱ्यांवरही अल्कोहोल सेवनाचा परवाना आवश्यक केला आहे. यातील कोणताही परवाना एखाद्याकडे नसल्यास त्याला मुंबई प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६५(इ) नुसार आर्थिक दंड आणि अटक होऊ शकते.
आता हे सगळं सांगितल्यानंतर, थोडं या चॉकलेटविषयी बोलायला हरकत नाही. हल्ली आपल्याकडे अनेक विदेशी लिक्यूअर चॉकलेट्स मिळू लागली आहेत. त्यातील काही माझ्या अगदी आवडीची आहेत. ती कुठेही दिसली तरी मी उचलतोच. म्हणजे विकत घेतो. अशा ब्रॅण्ड्सपैकी एक आहे- वर उल्लेखलेला अँथन बर्ग. ६४ स्वादांच्या लिक्यूअरची चॉकलेट्स मिनिएचर बॉटलच्या आकारात असतात. गोड आणि सिरपी लिक्यूअर्सचा अवतार अँथन बर्गमध्ये चाखायला मिळतो. तुम्हाला यापेक्षाही काही अधिक ‘कडक’ आवृत्ती हवी असल्यास फिनलंड येथे निर्माण झालेल्या कार्ल फेझरच्या व्होडकामिश्रित चोको बॉम्बचा विचार करायला काहीच हरकत नाही. आणि हो, शुद्ध व्होडकानिर्मितीसाठी फिनलंड जगात प्रसिद्ध आहे, हेही लक्षात असू द्या.
यातील घसीटाराम हा एक नवा गडी अलीकडे लिक्यूअर चॉकलेटनिर्मितीत उतरलाय असं म्हणावं लागेल. म्हणजे यांची खासियत अशी की ते रम-मिश्रित चॉकलेट बनवितात. यात ते अस्सल रम वापरण्याऐवजी रम इसेन्स वापरत असावेत. त्यामुळे माझ्या पसंतीस उतरणारे हे चॉकलेट खचितच नाही. मला नुकतेच बंगळुरूला तिथल्या सॅमसंगने एका व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. कंपनीतील अभियंत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यातूनच चौकटीबाहेरचा विचार कसा करायचा, हे मला त्यांना सांगायचं होतं. म्हणजे त्यांना क्रियाशील आणि निर्मितीक्षम कसं राहता येईल, याची काही उदाहरणं आणि प्रयोग मला त्यांना समजावून सांगायचे होते. माझ्या एका चाहत्याने तिथेच मला ‘इंडल्डन्स जेरी मामाज’च्या लिक्यूअर चॉकलेट्सचा बॉक्स हातात सोपवला. ही लिक्यूअर चॉकलेट्स मी याआधी कधी खाल्लेली नव्हती. पण त्याचा दर्जा नक्कीच वरचा होता. मनातल्या मनात मी त्यांच्या निर्मितीला दाद दिली. दिल्लीतील पितमपुरा येथील एका छोटय़ाशा चॉकलेटिअरने बनवलेली लिक्यूअर चॉकलेट्स अशीच मला प्रचंड भावली. कोकोलाड चॉकलेटियर हे या छोटय़ा कंपनीचं नाव. जगातील अशा अनेक चॉकलेटिअर्सनी आपल्या निसर्गदत्त प्रतिभेच्या जोरावर चॉकलेटची निर्मिती केली. त्या निर्मितीने अनेकांना वेगळी अनुभूती दिली. यातील रशियाचा सॉलिदार्नो लिक्यूर्सचा अॅण्ड व्होडकाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांनी लक्झरी प्रालीन या प्रकारच्या चॉकलेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. आता भारतातील विमानतळांवरील डय़ुटी फ्री दुकानांमधून आणि ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून हा ब्रॅण्ड उपलब्ध आहे आणि असे इतर अनेक विदेशी ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत.
लिक्यूअर चॉकलेट्स आस्वाद घेण्यात एक वेगळी मजा असते. हे चॉकलेट तोंडात घातल्याबरोबर विरघळतं. त्या कुरकुरीत आवरणाआडची ती उबदार लिक्यूअर बाहेर पडली की, जिभेला स्वाद लागतोच पण घसा शेकत हे चवदार मिश्रण खाली जाताना एक वेगळी अनुभूती मिळते. लिक्यूअर चॉकलेट्सची खरी मजा भारतीय वातावरण मिळणं मुश्कील आहे, असंच म्हणावं लागेल. एक तर इथलं हवामान आणि दुसरं आपल्या देशातील वितरण पद्धती. त्यातून आता हे परवानाराज. एकंदरच लिक्यूअर चॉकलेट्स ही चॉकलेट विक्रीच्या दालनातली सगळ्याच महागडी चॉकलेट्स असतात. त्यातून या दहा भानगडी असल्याने याची किंमत आणखी वाढते. अक्षरश: वाढते.
(अनुवाद – गोविंद डेगवेकर)
वरुण इनामदार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा