फ्रूट अॅण्ड नट नावाचा चॉकलेट बार आपण अनेकदा खाल्ला असेल; पण त्यात नेमकी कोणती फळं असतात हो? चॉकलेट बरोबर फळांचा संगम होतो तेव्हा त्याची रसरशीत चव जिभेवर रेंगाळत राहते.. अशाच काही नव्या- जुन्या फ्रूट चॉकलेट बारचं रसग्रहण..
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या गोड फळांचा निर्माता निसर्गच. झाडावर पिकून पिवळ्या झालेल्या फळाचा आस्वाद हीसुद्धा मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती, पण त्या निसर्गानेच मानवाला चौसष्ट कला बहाल केल्या आहेत. म्हणून मग मानवाने एक पाऊल पुढे टाकलं आणि फळांवर प्रयोग सुरू केले. हे प्रयोग चॉकलेट क्षेत्रात कमालीचे यशस्वी ठरले. भारत मात्र अद्याप चॉकलेटच्या या प्रयोगांमध्ये अद्याप पिछाडीवर आहे. अस्सल देसी बनावटीच्या कलात्मक चॉकलेटचा ‘बारकोड’ हा चॉकलेट बारविषयी मी मनात कल्पना घोळवत होतो, तेव्हाच माझा अडीच वर्षांचा पुतण्या विवान हातात कॅडबरीचं फ्रूड अॅण्ड नट घेऊन धावत माझ्याकडे आला. कॅडबरी बारवरचं आवरण काढून देणं त्याला माझ्याकडून अपेक्षित होतं. तो सोनेरी कागद वेगळा करतानाच माझ्या मनात त्यामध्ये असलेल्या ‘फळांचा’ विचार आला. आपण आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी एक तरी फ्रूट अॅण्ड नट चॉकलेट बार खाल्ला असेल. त्यामध्ये कुठली फ्रूट आणि नट असतात याचा विचार कुणी केलाय का? हे वाचतानाच हा विचार मनात आला असल्याच उत्तर सांगतो. बहुतांश फ्रूट अॅण्ड नट चॉकलेट बारमध्ये केवळ मनुका-बेदाणे आणि बदाम असतात. तर हा विचार करत असतानाच ‘बारकोड’ची कल्पना आकाराला आली. चॉकलेटच्या क्षेत्रात भारताला वेगळी ओळख मिळवून द्यायची असेल तर चॉकलेटने नव्हे तर त्यात मिसळल्या जाणाऱ्या फळांनी ती मिळू शकेल. पंजाबचे किन्नू आणि ओवा चॉकलेटमध्ये आले. तर झारखंडचे आवळा, लिंबू आणि धणे मिसळून थोडे सॉल्टी स्वादाने चॉकलेटची कल्पनाच बदलली. या अशा विविधरंगी आणि स्वादांच्या ब्रँडविषयी मला सांगायचंय.. कॅडबरीचे फ्रुट आणि नट आहेतच. हा चॉकलेट बार हल्ली गावागावांत मिळतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्समध्ये ‘सफायर’च्या फ्रुट अॅण्ड नटचा समावेश होतो. यामध्ये आमंड, हेजलनट आणि मनुका मिल्क चॉकलेटमध्ये घोळवून ते बनवलं जातं. याची चव जिभेवर तासन्तास मुक्कामाला असते. मिल्क चॉकलेटमध्ये खोबऱ्याचा फ्लेवर मिसळून ‘मार्स’चं बाउंटी चॉकलेट तयार होतं. ‘यूएई डिलाइट्स’मध्ये खजूर आणि बदामाचा संगम आहे. हा संगम मिल्क चॉकलेटमध्ये अफलातून लागतो, हे वेगळं सांगायला नको. भारताबाहेर कुठेही गेलो की मला प्रिय असलेल्यांमध्ये ‘ब्रुकसाइड्स’चे डार्क चॉकलेट अॅण्ड पोमोग्रेनेट मी नेहमी घेतो. डाळिंबाचा रस ओतलेलं हे चॉकलेट केवळ अप्रतिम! ‘कर्कलँड’च्या ‘सिग्नेचर डार्क चॉकलेट सुप्रीम’च्या चवीला तर तोडच नाही! पुन्हा भारतातील उत्पादनांविषयी बोलायचं तर ‘अमूल’चं ‘ट्रॉपिकल ऑरेंज’.. यामध्ये संत्र आणि डार्क चॉकलेटचा अनोखा संगम जीभेवर रेंगाळत राहतो. ‘चोको ला’चा मँगो-पॅशन फ्रूट स्प्रेड, यात या दोन फळांची युती असते व्हाइट चॉकलेटबरोबर!
आपल्याला काय.. कुठल्याही फॉर्ममध्ये फळांचा आस्वाद घ्यायला मजाच येते.. हो ना ? चॉकलेट असो किंवा कॅण्डी.. त्यामध्ये फळांचा स्वाद असेल तर भारीच लागतं. ‘नॅचरो’चा मँगो लाइट बार, ‘पार्ले’चा कच्चा मँगो बाइट, ‘परफेटी’मेंटॉसचे नानाविध फ्लेवर्स तुमच्या जिभेचे चोचले पुरविण्यास सिद्ध आहेत. लिंबू, कलिंगड, हिरवी सफरचंद, स्ट्रॉबेरी अशी ही स्वादांची रांग उभीच आहे. याशिवाय ‘आल्पेन लिबे’ आणि ‘चिकोज’ची फ्रुट-ओ-लिशिअसची लज्जत अवर्णनीयच. खाण्याच्या तऱ्हा जशा आहेत, तसा शेफच्या हातातून चवीचा जन्म होतोच आणि त्यांच्या मेंदूत मग भारताच्या कानाकोपऱ्यात उमलत-फुलत असलेला रानमेवा पिंगा घालू लागतो.
‘प्रीमियम’ रेंज चॉकलेट्समध्ये ‘व्हिटकर’च्या पेअर अॅण्ड हनी चॉकलेटचा आस्वाद घ्यायलाच हवा. थोडं खर्चिक प्रकरण आहे हे.. पण प्रीमियम रेंजमधली चॉकलेट्स अशीच तर असतात. याच कंपनीचं दुसरं उत्पादन म्हणजे ‘बे ब्रॅबर्न अॅपल बार’ आणि व्हॅनिला यांचा मिल्क चॉकलेटमध्ये झालेला संगम. प्रीमियम फ्रूट चॉकलेटच्या क्षेत्रात ‘फ्रूटिलिशियस’ या कंपनीमुळे भारताचं नाव होतंय. रझा काझरुनी आणि सुफीयाँ सिद्दीकी यांच्या या ब्रॅण्ड अंतर्गत ते चॉकलेट आणि फलांचे बुके तयार करून देतात. ते चॉकलेट ट्रॉफीज हा प्रकारही करून विकतात. थोडक्यात, फ्रुट्स आणि नट्स हे चॉकलेट बारमध्ये एकत्रित येत असले तरी त्यांची चव एकमेकांपासून भिन्न आहे. वाळवलेली फळं आणि भाजलेला सुकामेवा यांचा चॉकलेटमध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आणि कलात्मकरितीने वापर होऊ शकतो. फक्त चवीचे प्रयोग करण्याची तयारी हवी. तो प्रत्येकाने चवीने अनुभवल्याशिवाय त्यातील श्रीमंती कळणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा