विपाली पदे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वसामान्य माणसाला कुठल्याही गोष्टीतले रहस्य जाणून घ्यायची इच्छा असते. एखाद्या गोष्टीमागचं इंगित शोधून काढायला त्याला नेहमीच आवडतं.  त्याचप्रमाणे आपल्या पौराणिक कथांमध्ये अशा अनेक घटना आहेत. ज्या सत्य आहेत की नाहीत हे जाणण्यासाठी जगभरात अनेक प्रकारे त्यावर फिक्शन लिहिले गेले आहेत. अगदी अन्य संस्कृतीतसुद्धा निर्माण झालेल्या ‘दा विंची कोड’सारख्या कथानकांनी वाचकांना वेड लावले. अशातच भारतीय पौराणिक कथांमध्ये सत्य शोधताना अनेक भारतीय नवीन लेखकांनी प्रयोग करायचे ठरवले. भारतात मोठय़ा प्रमाणात आजही मायथॉलॉजी म्हणजे पौराणिक कथांना आणि त्यातील वेगवेगळ्या देवदेवतांना, कथेतील पात्रांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. अगदी पूर्वीपासूनच आपल्या देशातील संस्कृतीमध्ये ते बीज रोवलेले असल्यामुळे अनेक नवीन कथानकं त्यावर रचली गेली आहेत आणि अशाच कथा रचणाऱ्यांमधील एक नाव म्हणजे अश्विन सांघी. लेखक अश्विन यांनीसुद्धा पौराणिक कथानकं घेऊन त्यावर प्रयोग करत नव्या शैलीत कथा रचायला सुरुवात केली.

अश्विन सांघी हे कल्पित-थ्रिलर शैलीतील एक भारतीय लेखक आहेत. ‘रोजाबाल लाइन’, ‘चाणक्याज चान्ट्स’ आणि ‘द क्रिष्णा की’ या तीन सर्वाधिक खप झालेल्या कादंबऱ्यांचे ते लेखक आहेत. त्यांची सर्व पुस्तकं पौराणिक ब्रह्मज्ञानविषयक आणि पौराणिक संकल्पनेवर आधारित आहेत. ते भारतातील सर्वाधिक खपाची थ्रिलर कथा-कादंबरी लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक आहेत आणि भारतीय इतिहास किंवा पुराणकथांना समकालीन संदर्भात पुनर्विचार करणाऱ्या नवीन युगाचे ते लेखक आहेत. ‘फोर्ब्स इंडिया’ने त्यांच्या सेलेब्रिटी १०० यादीमध्ये अश्विन यांचा समावेश केला आहे. ‘द व्होल्ट ऑफ विष्णू’ ही त्यांची नवीन कादंबरी २७ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध झाली होती.

‘द क्रिष्णा की’ ही त्यांची कादंबरीही याच शैलीतील.. पाच हजार वर्षांपूर्वी ‘महाभारत’ नावाचे एक मोठे वाङ्मयीन साहित्य अस्तित्वात आले ज्यात कृष्ण नावाचे एक जादूई पर्व होते. सारथ्याचे काम पार पाडत त्याने महाभारतातील अनेक घटनांना चांगले वळण दिले. त्याने मानवजातीच्या भल्यासाठी असंख्य चमत्कार या पृथ्वीवर घडवले. जेव्हा कृष्णाने स्वत:चा अवतार संपवला तेव्हा त्याचे परमभक्त निराश झाले, परंतु त्याला खात्री होती की, शेवटच्या या येणाऱ्या कलियुगामध्ये आवश्यकतेनुसार त्याला परत नव्या अवतारात पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. या सगळ्या पाश्र्वभूमीवर कादंबरीत एक नायक उदयास येतो ज्याचं नाव आहे प्रोफेसर रवि मोहन सैनी. हे सेंट स्टीफन कॉलेजचे प्राध्यापक आहेत. त्यांचे जीवन हे केवळ पौराणिक कथांमध्ये न अडकता कृष्ण हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वदेखील आहे हे सिद्ध करण्याचे ध्येय ठेवून पुढे आले आहे. त्यांच्या मित्राची वाष्र्णेची हत्या झाल्याचे समजते. सैनी हे त्याला जिवंत पाहणारी शेवटची व्यक्ती असल्याचेही लक्षात येते आणि त्यामुळे हत्येच्या संशयाची सुईही सैनीवरच येते. सैनी हा भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे. वाष्र्णेला मारणारा कोणी एक माथेफिरू आहे हे लक्षात आल्यावर त्या एका वेडय़ा माणसाच्या तावडीतून जगाला वाचविण्याचे प्रयत्न करण्याचे काम हे सैनीवरच आले आहे, ज्याला असा विश्वास वाटू लागला आहे की, तो विष्णूचा दहावा आणि अंतिम अवतार आहे. या कथेचा उर्वरित भाग हा अनेकविध घटनांनी भरलेला असल्यामुळे कथेला वेगळ्याच प्रकारचे वळण येते. यात सैनीने आपल्या जिवलग मित्रांचे खून केल्याचा खोटा आरोपसुद्धा त्याच्यावर लावला जातो आणि नंतर त्याला त्यासंबंधीच्या एका जाळ्यात अडकवले जाते. याची जाणीव सैनीला उशिरा होते. जेव्हा तो त्याच्याच एक मित्राचा खून होताना स्वत:हून पाहतो. नंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्या रहस्यातील महत्त्वाचे शिक्के शोधण्याचा आणि त्याच्या मित्रांच्या मृत्यूभोवतालचे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करतो. जसजसे त्याला निरनिराळे संकेत सापडतात, तसतसे सैनीला बऱ्याच गोष्टी उलगडू लागतात. तो सर्व काही हाताळतो आणि सत्याकडे पोहोचतो.

‘द क्रिष्णा की’ ही एक थ्रिलर कथा आहे जी आपल्याला वाचताना व्यग्र ठेवते आणि षड्यंत्र किंवा काही तरी गमक असणाऱ्या कथा ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी उत्तम आहे. या पुस्तकात कृष्णाचा मोठा वारसा मागे सोडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. नीट विचार केला तर हे पुस्तक म्हणजे वाचकांसाठी एक प्रकारे ‘पौराणिक संदर्भा’ंची खाण आहे. विशेषत: जेव्हा लेखक कृष्ण आणि त्याच्या अनुयायांच्या हालचालींचा मागोवा घेतात तेव्हा त्या पौराणिक कथेला नक्कीच थ्रिलरचे स्वरूप मिळते. इतकेच नाही तर त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकामुळे आजकालच्या तरुणांना महाभारत कळावे, त्यातला मुख्य कृष्ण कळावा हा हेतू साध्य झालेला दिसतो. तसेच त्यांनी यात मॅथेमॅटिक्स आणि सायन्स या दोन्ही विषयांचा वापर केला आहे ज्यामुळे तरुणवर्गाला हेदेखील समजेल की, अशा कथा या केवळ पौराणिक आणि सांस्कृतिक संदर्भापुरत्याच मर्यादित नसतात. तर त्यापलीकडेसुद्धा अशा कथांचा उलगडा होऊ  शकतो.

‘द क्रिष्णा की’ या कादंबरीची शैली पाहता लेखक अश्विन सांघी  यांना आपल्या देशातील डॅन ब्राऊनचा अवतार का म्हटले जाते हे सहज लक्षात येईल. त्यांची ‘रोजाबाल लाइन’ आणि ‘द क्रिष्णा की’ ही दोन्ही पुस्तकं ‘दा व्हिन्सी कोड’ आणि  ‘द लॉस्ट सिम्बॉल’ची आठवण करून देतात, असे सांगितले जाते. ते का हे शोधण्यासाठी ‘द क्रिष्णा की’चा माग घ्यायला काहीच हरकत नाही.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The krishna key book review abn