वेदवती चिपळूणकर परांजपे
सध्या एका चित्रपटाचा ट्रेलर सगळय़ांचे लक्ष वेधून घेतो आहे. एका अंध मुलाचा उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवणाऱ्या या चित्रपटात त्याचा एक संवाद आहे. ‘भागना नही आता.. सिर्फ लडना आता है’.. परिस्थितीला शरण न जाता तिच्याशी दोन हात करत मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण करणाऱ्या श्रीकांत बोल्ला या तरुणाची कथा सुपरहिरोच्या खोटय़ा गोष्टींना लाजवेल अशी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचा जन्म सीतारामपुरम नावाच्या आंध्र प्रदेशातल्या एका लहानशा गावात झाला. त्याचे आई – बाबा साधे गरीब शेतकरी होते. तो जन्माला आला तेव्हापासूनच त्याला दृष्टी नव्हती. असा मुलगा जन्माला येणं म्हणजे पाप, काहीतरी अपशकुन असा समज गावकऱ्यांनी करून घेतला. याच समजातून त्यांनी त्याच्या आई वडिलांनाही हा सल्ला दिला की या मुलाला मोठं करण्यात अर्थ नाही, याला जगू देऊ नये. मात्र त्याच्या आई वडिलांनी हा पर्याय चुकूनही मान्य केला नाही. आई वडिलांच्या या निर्णयामुळे भारताला दिसलेला यशस्वी उद्योजक आणि फोर्ब्स २०१७च्या यादीत झळकलेला हा मुलगा म्हणजे श्रीकांत बोल्ला.

शाळेत जाणाऱ्या श्रीकांतलाही सगळय़ांकडून चांगली वागणूक मिळाली नाही. शाळेतही त्याला सर्वात शेवटच्या बेंचवर बसवण्यात यायचं. कोणत्याही खेळांमध्ये किंवा क्रीडा प्रकारांमध्ये त्याला घेतलं जायचं नाही. मात्र या सगळय़ामुळे श्रीकांत खचला नाही. त्याने त्याचा अभ्यास सुरू ठेवला. दहावीत त्याने शाळेत पहिलं येण्याचा मान पटकावला. त्याला अकरावी – बारावीला सायन्स शाखेत अ‍ॅडमिशन घ्यायची होती, मात्र आंध्र प्रदेश बोर्डने त्याला सायन्सला अ‍ॅडमिशन देता येणार नाही म्हणून सांगितलं. केवळ कला शाखेतच अंध मुलांना प्रवेश देता येईल असं आंध्र प्रदेश बोर्डचं म्हणणं होतं, मात्र श्रीकांत आपल्या निर्णयावर आणि निवडीवर ठाम होता. त्यामुळे त्याने कोर्टात केस केली. समान हक्कासाठी कोर्टात सरकारशी भांडण्याचा निर्णय त्याने आणि त्याच्या पालकांनी घेतला. सहा महिन्यांच्या लढतीनंतर त्याला सायन्स शाखेत अ‍ॅडमिशन घेण्याची परवानगी मिळाली आणि आंध्र प्रदेश बोर्डला त्याला अ‍ॅडमिशन द्यावी लागली. बारावीत ९८ टक्के मिळवून श्रीकांतने त्याची योग्यता सिद्ध केली. बारावीनंतर त्याला इंजिनीअरिंग करण्याची इच्छा होती. आयआयटीमध्ये जाण्याचं त्याचं स्वप्न होतं, मात्र कोणत्याच कोचिंग इन्स्टिटय़ूटने त्याला अ‍ॅडमिशन दिली नाही. त्याला आयआयटीच्या प्रवेश परीक्षेचं हॉल तिकीट देण्यात आलं नाही, त्यामुळे त्याने आयआयटीचा विचार सोडून देऊन अमेरिकेत एमआयटीला अ‍ॅडमिशन घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. त्यात तो यशस्वी झाला आणि श्रीकांत एमआयटीमधला पहिला इंटरनॅशनल ब्लाइंड स्टुडंट ठरला. अर्थात, त्याचा हा प्रवासही फार सोपा नव्हता.

एमआयटीमधून पास होण्याआधीच श्रीकांतला अनेक चांगली चांगली पॅकेजेस मिळत होती, मात्र त्याने ती नाकारून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. भारतात येऊन त्याने ‘समन्वय’ नावाची संस्था सुरू केली. ही एक प्रकारची एनजीओ म्हणता येईल. या संस्थेद्वारे त्याने अंध आणि विविध शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी मदत सेवा सुरू केली. त्यांना काम मिळवून देण्यात मदत करणं, त्यांना काम देण्यासाठी जनजागृती करणं अशा अ‍ॅक्टिव्हिटी या संस्थेने सुरू केल्या. ब्रेल लिपीचा प्रसार, प्रचार करणं आणि ती जास्तीत जास्त वापरात येईल यासाठी प्रयत्न करणं हेदेखील या संस्थेचं काम होतं. श्रीकांतने या संस्थेमार्फत ब्रेल छपाई सुरू केली आणि त्यासाठी त्याने ब्रेल पिंट्रिंग प्रेस सुरू केली. त्याला कॉलेजमध्ये असताना जो त्रास झाला तो इतर कोणाला होऊ नये यासाठी त्याने कॉम्प्युटर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट सुरू केली. दहा कॉम्प्युटर आणि एक ट्रेनर यांच्यापासून सुरू झालेल्या या इन्स्टिटय़ूट आणि एनजीओने आतापर्यंत ३००० हून अधिक मुलांना सक्षम बनवले आहे.

श्रीकांतने ‘बोलंट इंडस्ट्रीज’ नावाने कंपनीदेखील सुरू केली. या कंपनीत त्याने अधिकाधिक डिसेबल्ड तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. नारळाच्या विविध जातींच्या झाडांपासून विविध उत्पादने बनवण्याचा त्याचा उद्योग आहे. सस्टेनेबल आणि पर्यावरण पूरक अशा गोष्टी बनवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पत्रावळीच्या प्लेट्स, कप, ट्रे, चमचे अशा गोष्टी त्याच्या फॅक्टरीमध्ये बनवल्या जातात. डिस्पोजेबल प्लेट्स, वाटय़ा, कप, चमचे अशा गोष्टी बनवणं ही त्याची खासियत आहे. या सगळय़ा कामांमध्ये श्रीकांतने अंध मुलांना समाविष्ट करून घेतलं आहे आणि तेही उत्तम काम करू शकतात, बरोबरीने मेहनत करू शकतात आणि अचूक काम निभावू शकतात हे दाखवून दिलं आहे.

आज श्रीकांत एकशे पन्नास करोडच्या या कंपनीचा सीईओ आहे. त्याच्या कंपनीला टाटा ग्रुपने सपोर्ट केला आहे आणि फंडिंगही केलं आहे. श्रीकांत बोल्लाचं नाव २०१७च्या फोर्ब्स ‘थर्टी अन्डर थर्टी’ मध्ये झळकलं आहे. ‘भारताचा पहिला अंध राष्ट्रपती होण्याची माझी इच्छा आहे’, असं हजरजबाबी उत्तर एपीजे अब्दुल कलाम यांना देणाऱ्या श्रीकांत बोल्लाची स्वप्नं खूप मोठी आहेत. कोणतीही अडचण तुम्हाला स्वप्न ‘बघण्यापासून’ आणि ती पूर्ण करण्यापासून थांबवू शकत नाही यावर श्रीकांतचा पूर्ण विश्वास आहे. हाच त्याचा विश्वास आणि त्यामागची त्याची मेहनत सर्वाना प्रेरणादायी आहे. त्याची ही प्रेरणादायी कथा लवकरच रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The phenom story a dream come true entrepreneur srikanth bolla amy
Show comments