वेदवती चिपळूणकर परांजपे
इंटरनेटवर एका रात्रीत विविध करामती करत लोकप्रिय झालेले अनेक तरुण चेहऱ्यांची एकच गर्दी आपल्याला सध्या दिसते. या गर्दीत खरोखरच आपल्या कलेच्या जोरावर मेहनतीने इतरांपेक्षा वेगळी वाट निवडणारे आणि त्यांची कला लोकांच्या पसंतीस उतरलेले चेहरे तसे दुर्मीळच. भक्तिसंगीत आणि लोकसंगीताची वेगळी आवड जोपासणारी आणि ते आपल्या भावांच्या बरोबरीने यूटय़ूब वाहिनीवरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून आलेली तरुण मैथिली ठाकूर म्हणूनच या सनसनाटी गर्दीतही लोकांचं मन जिंकून घेणारी खरी कलाकार ठरली आहे.
केवळ चोवीस वर्षांची असलेली मैथिली ठाकूर सध्या देशभरातल्या कलाप्रेमींच्या मनावर राज्य करते आहे. नॅशनल सेन्सेशन बनलेल्या मैथिली ठाकूरने आत्तापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. भक्तिसंगीत ही तिची खासियत आहे. अनेक भजनं तिने गायली आहेत. नवीन पिढीच्या इन्फ्लुएन्सरने रॅप किंवा बॉलीवूड संगीतात न रमता भक्तिसंगीताकडे अधिक लक्ष देणं ही तिच्या बाबतीत घडलेली नावीन्यपूर्ण गोष्ट आहे. केवळ भक्तिसंगीतच नव्हे तर लोकसंगीत हासुद्धा तिचा प्लस पॉइंट आहे. पारंपरिक लोकसंगीताला पुढे नेण्याचे तिचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी ती मनापासून काम करते आहे. नुकताच तिला ‘क्रिएटर्स अवॉर्ड’ हा पुरस्कारही मिळाला आहे.
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या बेनिपट्टी या लहानशा गावात जन्माला आलेली मैथिली, तिच्या नावाप्रमाणेच मैथिली ही भाषासुद्धा बोलते. किंबहुना सीतेपासून प्रेरित होऊन आणि तिच्या भाषेवरून तिच्या आईवडिलांनी मैथिली हे नाव ठेवलं. लहानपणापासूनच तिने स्वत:च्या वडिलांकडे संगीताचं शिक्षण घेतलं आहे. अवघ्या चार वर्षांची असल्यापासून तिने आपल्या आजोबांकडे संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. तिचे दोन्ही भाऊ ऋषव आणि अयाचीदेखील एकीकडे तिच्यासोबत शिक्षण घेत आहेत आणि दुसरीकडे तिच्या परफॉर्मन्समध्ये तिला साथही देतात. तिचा एक भाऊ तबला वाजवतो तर दुसरा भाऊ गाण्यात तिला साथ करतो. वयाच्या दहाव्या वर्षांपासून थेट जाहीर संगीत मैफिलींमधून गाणाऱ्या मैथिलीने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबरोबरच मैथिली लोकसंगीतही आत्मसात केलं आहे. हिंदी, बंगाली, उर्दू, मैथिली, मराठी, भोजपुरी, तमिल अशा कित्येक भाषांमध्ये लहान वयात गाणी गाऊन तिने लोकांना अचंबित केलं आहे.
घरातून मिळालेलं संगीताचं बाळकडू आणि सातत्याने गाण्यावर घेतलेली मेहनत या सगळय़ाचं खऱ्या अर्थाने चीज करण्याची संधी मैथिलीला मिळाली ती रिअॅलिटी शोजच्या माध्यमातून.. आत्तापर्यंत वेगवेगळय़ा रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेऊन तिने स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. सुरुवातीला २०११ मध्ये मैथिलीने पहिल्यांदा लिटिल चॅम्प्समध्ये भाग घेतला होता, मात्र तिला त्यात यश मिळालं नाही. २०१५ मध्ये ‘जिनियस यंग सिंगिंग स्टार २’ या शोचा किताब तिने पटकावला होता. त्यानंतर तिने ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर २’ मध्ये भाग घेतला. त्यात टॉप २० पर्यंत ती पोहोचली, मात्र त्या पुढे काही तिला जाता आलं नाही. वेगवेगळय़ा रिअॅलिटी शोजमध्ये तिने प्रयत्न केले, मात्र कोणत्याच ठिकाणी तिला फारसं पुढे जाता आलं नाही. तरीही तिने प्रयत्न सोडले नाहीत, रियाज सोडला नाही. तिने तिचं संगीताचं शिक्षण चालू ठेवलं. पुन:पुन्हा प्रयत्न करत राहून तिने २०२१ या वर्षी ‘सिंगिंग स्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये केवळ भागच घेतला नाही तर त्याच्या फायनलमध्येदेखील मजल मारली. मैथिलीने पाच वेळा दिल्लीची राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत स्पर्धा जिंकलेली आहे. इयत्ता अकरावीत असताना तिने ‘थारपा’ या अल्बमची निर्मिती करत तिच्या करिअरची सुरुवात केली.
२०१८ पासून तिने स्वत:चं यूटय़ूब चॅनेल सुरू केलं होतं. त्याचे आताच्या घडीला ४४ लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. तिने यूटय़ूबवर एक हजारांहून अधिक व्हिडीओज पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे चाळीस लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या गाण्यांची तारीफ खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केली. नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्समध्ये तिला ‘अॅम्बॅसेडर ऑफ द इयर’ हा सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते याच वर्षी दिला गेला. आकाशवाणीने मैथिलीच्या गाण्यासाठी तिच्यासोबत करार करून तिला जोडून घेतलं आहे. तिच्या शास्त्रीय गायनासाठी ती आकाशवाणीसोबत जोडली गेली आहे. इतक्या लहान वयात आकाशवाणीसोबत करारबद्ध होणं ही खूप दुर्मीळ गोष्ट आहे, जी मैथिलीने साध्य केली आहे.
मैथिली ठाकूरच्या रूपाने नवीन पिढीतील गायकांना पुन्हा भक्तिसंगीत आणि लोकसंगीताकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळणं सोपं झालं आहे. लोकसंगीत आणि भक्तिसंगीत असे तरुणाईत साधारणत: पॉप्युलर न होणारे प्रकार आता ट्रेण्डमध्ये येत आहेत, ते मैथिलीसारख्या तरुण गायक आाणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच.. त्यामुळे वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध कलागुणांच्या जोरावर इन्स्टा स्टार झालेले अनेक कलाकार आज आपल्या आजूबाजूला असले तरी आपल्या मुळांकडे नेणारे, आपली संस्कृती जपणारे पारंपरिक लोकसंगीत, भक्तिसंगीत यूटय़ूबसारख्या नवीन माध्यमातून लोकांपर्यंत सहजतेने पोहोचवणारी मैथिलीसारख्या सुरेल कलाकाराचे प्रयत्न या गर्दीतही उठून दिसतात.