डर वह नहीं होता जब लोग हमें डरते हैं
असली डर वह होता है जब हम सोच मैं डर
जाते हैं
स्पॉटीफायवर प्रसारित होणाऱ्या ‘पन्नोके झरोके’ या पॉडकास्टमध्ये आर. जे. नेहा पराशर जगभरातील प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या काळातील कथा श्रोत्यांना ऐकवते. मूळ वेगवेगळय़ा भाषांमध्ये लिहिलेल्या या कथा हिंदूीत अनुवादित करून सादर केल्या जातात. या कथा आणि त्यातील पात्रे श्रोत्यांना वेगवेगळय़ा प्रदेशांची सफर घडवतात. त्यामुळे कथेबरोबरच लेखक आणि ते राहात असलेल्या प्रांताची, संस्कृतीची माहितीही कथेच्या ओघात मिळते. या पॉडकास्टच्या ‘खुली खिडकी’ नामक भागात विरा या महाविद्यालयातील मुलीची कथा ऐकवण्यात आली होती. एके दिवशी फ्रेंटन नावाचा गृहस्थ विराच्या घरी पाहुणा म्हणून राहण्यासाठी येतो. घरचे येईपर्यंत विरा फ्रेंटनचा पाहुणचार करते. संध्याकाळची वेळ उलटली तरी घरातील मोठी खिडकी उघडी का? असा प्रश्न फ्रेंटन तिला कुतूहलाने विचारतो. त्यावर ती सांगते, माझ्या आत्याचा नवरा, त्याचा भाऊ आणि कुत्रा तिघेही एका संध्याकाळी या खिडकीतून बाहेर गेले, ते अजून परतले नाहीत. लोक म्हणतात, दलदलीत अडकून त्यांचा मृत्यू झाला, पण आत्याचा या गोष्टीवर विश्वास नाही. म्हणून ती नेहमी ही खिडकी उघडी ठेवते. थोडय़ा वेळाने विराची आत्या त्या गृहस्थाला भेटते आणि तिच्यासोबत बोलत असताना त्याचं लक्ष त्या खिडकीकडे जातं. कालांतराने त्या खिडकीतून लांबून कोणी तरी येताना दिसतं. सरळ घराच्या दिशेने येणारी आकृती नक्की कोणाची आहे, या नुसत्या विचारानेच भयभीत झालेला फ्रेंटन तिथून पळून जातो. फ्रेंटनची मनस्थिती वर्णन करताना, ‘डर वह नहीं होता जब लोग हमें डरते हैं , असली डर वह होता है जब हम सोच मैं डर जाते है’ हा शेर आर. जे. नेहाने ऐकवला आहे.
मी हा पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केल्यापासून मला जगभरातील अनेक लेखकांनी लिहिलेल्या गोष्टी ऐकता आल्या आहेत. या पॉडकास्टमधल्या सगळय़ाच गोष्टी खूप रंजक आहेत, पण मला ‘खुली खिडकी’ हा भाग जास्त आवडला. सुरुवातीला हा भाग एक भयकथा आहे असं वाटतं, पण जोपर्यंत या भागाचा शेवट होत नाही तोपर्यंत काय सुरू आहे ते समजत नाही. कोणाला येताना बघितलं असेल त्याने हा प्रश्न आपल्याला छळतो. याचं उत्तरं अखेर विरापाशीच दडलेलं असतं. ते कसं हे पॉडकास्ट ऐकल्यावरच कळेल. मनोरंजनात्मक असा हा पॉडकास्ट असल्यामुळे मला जसा वेळ मिळेल तसा मी हा पॉडकास्ट ऐकते.
– ज्ञानेश्वरी कासरे (विधि शाखेची विद्यार्थिनी)
शब्दांकन: श्रुती कदम