मितेश जोशी

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत राघवची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता कश्यप परुळेकरचा चाहता वर्ग मालिकेमुळे चांगलाच वाढला आहे. फिट राहण्याबरोबरच चमचमीत खाबूगिरी करायलाही आवडते, असं सांगणारा कश्यप आज एक इंटरेस्टिंग मटणाची कथा ‘फुडी आत्मा’मध्ये सांगणार आहे.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
Changes in traffic on national and state highways on occasion of Jijau Jayanti
जिजाऊ जयंतीनिमित्त ‘या’ राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल

‘जे ग्रहण केलं जातं ते द्रव्य म्हणजे आहार’ अशी आहाराची व्यापक व्याख्या आयुर्वेदाने सांगितली आहे. नेत्र, जिव्हा, नाक, त्वचा व कर्ण या पंचेंद्रियांनी आपण रूप, रस, गंध, स्पर्श व शब्द हे विषय ग्रहण करत असतो. त्याचबरोबर अन्न, पाणी, हवा हेही ग्रहण करत असतो. त्यामुळे आनंद, भूक, तहान, झोप, मल मूत्र विसर्जन या नैसर्गिक जाणिवा उत्पन्न होत असतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत या नैसर्गिक जाणिवा जागृत ठेवायच्या असतील तर आहाराबाबतच्या संकल्पना समजून घ्यायला हव्यात. कश्यपही याबाबतीत आग्रही आहे.

कश्यपच्या खाद्यचर्येची सुरुवात सकाळच्या चहा-पोळीने होते. लहानपणापासूनच सकाळी उठल्यावर चहा-पोळी खातोय त्यामुळे आताही तेच खातो, असं सांगणारा कश्यप ‘माझीच नव्हे तर भारतातील अनेकांची सकाळ चहाच्या वाफाळत्या पेल्याशिवाय अशक्य आहे’ हे आवर्जून नमूद करतो. ‘चहाच्या जोडीला काही तरी हवंच. मी चहा आणि पोळीच्या जोडगोळीच्या वादात अडकणार नाही. मला चहा-पोळी खाऊन समाधान मिळतं. माझ्या आरोग्याला कोणताही त्रास होत नाही. मला जी माहिती मिळाली त्यानुसार शिळी पोळी ही आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. गरमागरम पोळी खाल्ल्याने आपल्याला जेवढे फायदे होतात, त्याहून जास्त फायदे शिळी पोळी खाल्ल्याने होतात. याचा अर्थ असा नाही की शिळीच पोळी खायला हवी. केव्हा तरी शिळंही खावं. शिळी पोळी बीपीच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील, तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर शिळी पोळी खा. शिळय़ा पोळीत मोठय़ा प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे पोटासंबंधित समस्या दूर होतात. बरेच फिटनेसतज्ज्ञ आणि जिम सेंटर त्यांच्या क्लाएंट्सना शिळी पोळी खाण्याचा सल्ला देतात’, असं कश्यप सांगतो. थंड असलेली शिळी पोळी खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही, असा काही तज्ज्ञांचा विश्वास आहे. अर्थात, आहाराबाबतच्या उलटसुलट मतांमुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आपण या वादात न पडता आपला आहार हा आपल्या आरोग्याच्या व्याख्येत बसतो आहे ना हे पाहणं गरजेचं आहे. आरोग्यवान असाल तर आपला आहार योग्य आहे असं समजायला हरकत नाही, असं तो सांगतो.

कश्यपच्या खाद्यचर्येत दुपारच्या जेवणात भाकरी आणि आंबेमोहोर तांदळाचा भात हा फिक्स असतो. त्याच्या जोडीला सेटवर जी असेल ती भाजी, चिकन, कोशिंबीर वगैरे असतेच. संध्याकाळी सेटवर स्नॅक्स असतं. दिवसभरात भूक लागली तर प्रोटिन शेक घेण्याकडे त्याचा कल असतो. सूर्य मावळल्यानंतर काही खायचं नाही हा नियम त्याने स्वत:ला लावून घेतला आहे. त्यामुळे कश्यपच्या रात्रीच्या जेवणाला सुट्टी असते. रोज नॉनव्हेज खायला त्याला आवडत नाही. कधी तरी नॉनव्हेज ठीक.. असं म्हणणाऱ्या कश्यपला आईच्या हातचे मासे व चिकनचे पदार्थ आवडतात. त्याचबरोबर व्हेज कुर्मा व फ्लॉवर-बटाटय़ाची भाजी आवडते. बायकोच्या हातचं मटण जगात भारी असतं असंही तो सांगतो. ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या सेटवरची खाबूगिरी खूप हेल्दी आहे असं सांगणारा कश्यप पुढे म्हणाला, ‘पल्लवी खिचडी खूप छान बनवते. तिची खिचडी बनवण्याची पद्धतही खूप छान आहे. त्यात भरपूर साजूक तुपाचा मारा असतो. अनिताच्या हातचं थालीपीठ आणि वरण मला आवडतं. माझ्या आईच्या हातच्या दाण्याच्या चटणीचे सेटवर अनेक चाहते आहेत. त्यातलीच एक अनिता आहे. तिच्यासाठी आई कायम दाण्याची चटणी पाठवत असते. सेटवरचं जेवणही सुंदर असतं. सेटवरचं जेवण अधिक प्रत्येकाच्या घरचा पदार्थ असं करत संपूर्ण ताट भरून जातं. वेगवेगळय़ा रंगांनी ते सजतं. त्यामुळे दुपारचं जेवण मी पोटभर पण प्रमाणात घेतो. नाही तर अति खाऊन पेंग येते’ असं तो गमतीने सांगतो.

शाळेत असताना कश्यपला धावायची आवड होती. शाळा-कॉलेजमध्ये तो धावपटू होता. स्पोर्ट्समध्ये तो कायम पुढे असायचा. त्यामुळे पीटीच्या सरांनी गोड जास्त खायचं नाही हा सल्ला तेव्हा दिला होता. तेव्हापासून गोडाविषयी विशेष प्रेम राहिलंच नाही, असं तो म्हणतो. मला मनापासून गोड खायला आवडत नाही. कधी तरीच चॉकलेट आईस्क्रीम वगैरे असं गोड खाणं होतं. सेटवर रोज काही ना काही तरी गोड पदार्थ हा असतोच.पण मी कायम त्याच्यापासून चार हात दूर असतो, असं तो म्हणतो. शाळेत असताना अंगाने शिडशिडीत पण खाणंपिणं मजबूत असलेल्या कश्यपला चिकन खाण्याची अधिक सवय होती. कॉलेजमधली खाबूगिरी अधिक रम्य झाली ती नाटकांच्या तालमीच्या वेळी! याविषयी तो सांगतो, एकांकिकेची तालीम म्हटली तर ती साधारण महिनाभर चालते. माझं कॉलेज सकाळचं असायचं. त्यात ते घरापासून जवळ होतं. त्यामुळे मी कॉलेजमध्ये कधी डबा घेऊन गेलो नाही. नाटकाच्या तालमीच्या वेळी डबा घेऊन जायची सवय मला लागली. सकाळपासून रात्रीपर्यंत तालीम चालायची. तेव्हा सगळे कलाकार मंडळी एकत्र बसून जेवण्याची पद्धत होती. सगळय़ांच्या डब्यातले पदार्थ चाखायला मिळायचे. दिवसभर डबा काही पुरायचा नाही. तेव्हा वडापाव, भजी, समोसासारखे पदार्थ खाण्याची सवय मला लागली. तेव्हा शिस्तबद्ध खाण्याकडे काहीसं दुर्लक्ष व्हायला लागलं, असं तो म्हणाला.

२०१२ साली कश्यपने ‘तप्तपदी’ हा सिनेमा केला होता. या सिनेमाचा दिग्दर्शक सचिन नागरगोझेने कश्यपला मटण खायची सवय लावली. हा किस्सा सांगताना कश्यप म्हणाला, माझ्यासारख्या खाण्याविषयी जिज्ञासा असणाऱ्या फुडी व्यक्तींच्या ज्ञानात भर घालणारा हा प्रसंग होता. त्याचं झालं असं की पुण्याजवळ रावेतला कामाच्या निमित्ताने आम्हा दोघांचं जाणं झालं होतं. रात्री जेवायची वेळ झाली. मला प्रचंड भूक लागली होती. तेव्हा मी रात्रीसुद्धा जेवायचो. आतासारखं सूर्य मावळल्यानंतर न खाण्याचा माझा नियम तेव्हा नव्हता. मी मनोजला जेवणाविषयी विचारल्यावर तो म्हणाला, आज मी तुला स्पेशल डिश खायला घालणार आहे. तयार राहा! त्या स्पेशल डिशसाठी अनेक किलोमीटरची रात्री साडेनऊपर्यंत वारी करावी लागली. एका झोपडीवजा हॉटेलजवळ त्याने गाडी थांबवली. तिकडे बोल्हाई मटण होतं. बोल्हाई म्हणजे मेंढीचं मटण होय. सुरुवातीला त्यांनी मटण सूप सव्र्ह केलं. नंतर ड्राय मटण फ्राय दिलं. आणि त्यानंतर पद्धतशीर इंद्रायणी भात व मटण समोर पेश केलं. ते मटण खाऊन मी अक्षरश: तृप्त झालो. तेव्हापासून मला मटण खायची अधिक सवय लागली. या बोल्हाई मटणाची ख्यातीदेखील अजब आहे. पुण्याजवळ वाघोलीच्या पुढे वाडेबोल्हाई हे गाव आहे. तिथे बोल्हाई देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्याजवळच्या गावांतील काही कुटुंबांना या देवीचे काही नियम लागू होतात. ज्या घराची बोल्हाई देवी कुलदेवता आहे, त्यांना बोकडाचं मटण चालत नाही. त्यांना मेंढीचं मटण लागतं. इतक्यावर हा विषय संपत नाही, तर बोकडाचं मटण ज्या भांडय़ात केलं असेल, अशी भांडीदेखील सदर व्यक्ती वापरत नाहीत. एखाद्या हॉटेलमध्ये बोकडाचं मटण आणि मेंढींचं मटण एकत्रित मिळत असेल तर अशा हॉटेलमध्येदेखील या व्यक्ती जात नाहीत. शेळीच्या मटणाचं खरकटं पाणीदेखील ओलांडत नाहीत. जर शेळीचं मटण खाण्यात आलं तर शरीरावर काही तरी पुरळ, खाज या स्वरूपात प्रतिक्रिया उठतात. या मंदिराच्या आवारात पांडवकालीन तळं असून यात हातपाय धुतल्यानंतर त्वचेचे विकार बरे होतात अशी श्रद्धा आहे. चुकून एखाद्याने बोकडाचं मटण खाल्लं व अंगावर चट्टे उठले तर त्याने या पाण्याने हातपाय धुतल्यानंतर मनोभावे माफी मागितल्यानंतरच हे चट्टे दूर होतात अशीदेखील श्रद्धा आहे. थोडक्यात काय, तर बोकडाचं मटण हा विषय फक्त न खाण्यापुरता मर्यादित नसतो तर अगदी शिवाशिवसारखा प्रकार बोकडाच्या मटणाबद्दल पाळण्यात येतो, हे मला तेव्हा कळलं, असं कश्यप सांगतो.

प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात आनुवंशिक जीन्स तयार होतात. त्या त्या भागातील वातावरणामुळे परिसरातील व्यक्तींना एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असू शकते. तिथल्या वातावरणामुळे सर्वच लोकांच्या जीन्समध्ये असे बदल घडून येतात. बोकडाचं मटण खाण्यामुळे या परिसरातील लोकांच्या अंगावर चट्टे उठतात. त्यामागेदेखील असंच कारण असावं, पण हीदेखील शक्यताच झाली. याचं ठोस कारण मात्र कुणालाच माहीत नाही, असं तो म्हणतो. आपल्या बऱ्याचशा आहाराच्या संकल्पना देवाधर्माशी जोडल्या गेल्या आहेत. ज्यांचं खंडोबा कुलदैवत आहे अशा बऱ्याच जणांकडे आषाढी एकादशी ते चंपाषष्ठीपर्यंत वांगं खाल्लं जात नाही. चंपाषष्ठीला प्रत्येक पदार्थात वांगं घालून तो नैवेद्य मल्हारी मरतडाला अर्पण करून मगच वांगं खाल्लं जातं. महाशिवरात्रीशिवाय किलगड खायचं नाही. महादेवाला पहिल्यांदा किलगड अर्पण करून मगच त्याचा आहारात समावेश करायचा. अक्षय्य तृतीयेशिवाय आंबा खायचा नाही, वगैरे अनेक धार्मिक चालीरीती आजही पाळल्या जातात, असं तो म्हणतो. पण या सगळय़ामधून अधोरेखित होत असतं ते म्हणजे ‘अन्न’. आपलं आयुष्य, चालीरीती सगळं काही सरतेशेवटी या अन्नब्रह्माभोवतीच घुटमळत असतं.

Story img Loader