प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. हॉलीवूड सेलेब्रिटींसाठीही त्यांनी डिझायनिंग केलंय. ‘हॅपी जर्नी’सारख्या मराठी चित्रपटाची वेशभूषा त्यांनी केली आहे. पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.
हाय, मी आसावरी, मी ३३ वर्षांची असून, माझी उंची ५ फूट २ इंच आणि वजन ५२ किलो आहे. मी बारीक असले तरी इतर शरीराच्या मानाने माझे पोट मोठे आहे. खरं तर मला, टी-शर्ट्स, टय़ुनिक्स, स्कर्ट्स असे वेस्टर्न आउटफिट्स घालायला आवडतात, पण त्यात माझे पोट अगदी पुढे आल्यासारखे वाटते, तेव्हा पोट झाकले जाईल, अशा काही स्मार्ट ड्रेसिंग स्टाइल्स आपण मला सुचवू शकाल का?
हॅलो आसावरी, कशी आहेस? तू खूपच योग्य प्रश्न विचारला आहेस. खरं तर ही तुझ्या एकटीची समस्या नाही. बहुतांश भारतीय स्त्री-पुरुषांना ही मोठय़ा पोटाची अडचण सतावत असते. हरकत नाही. तुझी अडचण आपण स्मार्ट स्टायलिंग फंडाज वापरून सोडवू शकतो. तू टय़ुनिक्स, कॉज्युअल टॉप्स असे वेस्टर्न वेअर घालायचं म्हणत्येस त्याला काहीच हरकत नाही, मात्र कोणतेही ड्रेसिंग्ज निवडताना एक लक्षात घे की, पाहणाऱ्याचं लक्ष तुझ्या मोठय़ा पोटाऐवजी, दुसरीकडे वळवायचं आहे. यासाठी थोडी कल्पनाशक्ती वापरून, नेहमी छान, छान नेकलाइन्स असलेले ड्रेसेस निवडायचा प्रयत्न कर. सुंदर एम्ब्रॉयडरी, छोटय़ा छोटय़ा नॉट्स, फ्रिल्स किंवा कुंदन वर्क, नाजूक प्रिंट्स नाही तर कटवर्कची नेकलाइन.. अशा नेकलाइन्सच्या ड्रेसेसमध्ये लोकांचे लक्ष आपला गळा किंवा खांदे या भागापर्यंतच वेधले जाते. यासाठी आणखी एक करता येईल. गळ्याभोवती रंगीबेरंगी स्कार्फ, स्टायलिश प्रकारात गुंडाळता येईल किंवा एखादा ठळक, आकर्षक नेकलेसचा वापर करता येईल. अजून एक, कुर्ती किंवा टॉप वरील प्रिंट फार मोठे, ठळक नसतील एवढी काळजी घे. अशा मध्यम आकाराच्या प्रिंट्समुळे, आपल्या बांध्यातील उणिवा किंवा अवयवांचा बेढबपणा झाकला जाण्याची जादू करता येते. आता कपडय़ांच्या रंगाबद्दल बोलायचं तर, डार्ककलरमधील कपडे घालायला तुला नो हार्म, पण शक्यतो भडक रंगाचे, बटबटीत प्रिंटेड कपडे मात्र कटाक्षाने टाळायला हवेत. यामध्ये शरीर अजूनच बोजड भासतं. आता कपडय़ांच्या आकाराबद्दल बोलूया, कपडय़ांचा खालचा भाग अगदी आवळ, बारीक किंवा निमुळता नसेल याची काळजी घ्यायला हवी, नाही तर पोटाचा घेर नजरेत येण्याचा धोका संभवतो. खालच्या बाजूला रुंद असलेल्या ड्रेसिंग स्टाइल्स तुझ्यासाठी बेस्ट असतील. उदाहरणार्थ, सध्या ज्यांची चलती आहे अशा पलाझ्झो पँट किंवा स्ट्रेट पँट हे प्रकार तुला खूप छान सूट करतील. आणखी पर्याय म्हणजे गुढघ्यापर्यंतच्या लांबीचे स्केटर किंवा शिफ्ट ड्रेसेस ही तुला छान वाटतील, फक्त असे ड्रेस वापरताना रुंद बेल्ट वापरलास की पोटाचा आकार झाकायला मदत होईल. सर्वात शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपला रंग, उंची, शरीराचा आकार या सगळ्या पेक्षाही, आपल्या चेहऱ्यावर, चालण्या-वागण्यात दिसणारा आत्मविश्वास, आपल्याला स्टायलिश आणि स्मार्ट लुक देऊन जातो. सो आसावरी इतके सगळे ऑप्शन्स समोर असताना चिंतेच कारणच नाही. विश यू हॅप्पी स्टायलिंग.
अमित दिवेकर – viva.loksatta@gmail.com
अनुवाद – गीता सोनी