मान्सून ट्रेकिंगचा आनंद लुटत डोंगर-दऱ्यांमध्ये अनवट वाटा शोधत फिरणारे अनेकजण असतात. असं निसर्गाला साद घालत फिरणं अ‍ॅडव्हेंचरस आणि थ्रिलिंग आहे खरं. पण कधी कधी काही मित्रांचा अतिउत्साह अक्षरश जीवाशी येतो. धुक्यात वाट हरवते तेव्हा आणि सह्याद्रीचा चकवा भुलवतो तेव्हा अन्नपाण्याविना भरकटत राहावं लागतं. मग पोलिसांना, रेस्क्यू टीम्सना पाचारण करावं लागतं. रेस्क्यू टीम्सना मार्गदर्शन करणारे इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनचे सदस्य आणि सेल्फ क्लाइंबिंग इनिशिएटिव्हचे सल्लागार श्रीकृष्ण कडूसकर यांचे अनुभव आणि त्यांनी यंग ट्रेकर्सना दिलेल्या काही टिप्स..
संध्याकाळी आवराआवर करून ऑफिसमधून बाहेर पडण्याची तयारी करत होतो. छान डिनरला जायचा बेत होता, इतक्यात आमचे स्नेही सतीश मराठे यांचा सुरेंद्रला फोन आला. तोरण्याला ट्रेकसाठी गेलेली दोन मुलं सापडत नाहीत आणि या मुलांच्या नातेवाईकांनी त्यांच्या शोधासाठी मदत मागितली आहे. ताबडतोब ग्रुपमधल्या सर्व मुलांना फोन केले आणि कोण कोण उपलब्ध आहे हे पाहायला सुरुवात केली. सुरेंद्रनी या वेळात या मुलांच्या नातेवाईकांना फोन करून नेमकं काय घडलंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इतर सहकाऱ्यांनी या शोध मोहिमेसाठी लागणारी इक्विपमेंट जमवायला सुरुवात केली. ही मुलं दोन दिवस बेपत्ता होती आणि त्यांची गाडी वेल्हा गावात सापडली यावरून ही मुले तोरण्याला ट्रेकला गेली आहेत हे नक्की कळलं होतं. पण गावातल्या लोकांनी घेतलेल्या शोधाला यश आलं नव्हतं, अशी माहिती मिळाली. आता रात्री शोध घेण्यात मर्यादा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ३ वाजता पुण्यातून निघायचं ठरलं.
तोरण्याला सकाळी पोहोचून शोधाला सुरुवात केली. तोरणा किल्ला खूपच मोठा आहे आणि त्यात ही मुलं नेमकी कुठे बेपत्ता झाली आहेत हे माहीत नसल्यामुळे दोन तुकडय़ा बनवून दोन बाजूनं शोध सुरू केला. सायंकाळपर्यंत या शोधमोहिमेला यश आलं नाही. दुसऱ्या दिवशी या मुलांच्या नातेवाईकांनी हेलिकॉप्टरनं शोध घेण्याचादेखील प्रयत्न केला, पण या प्रयत्नालादेखील यश आलं नाही. शेवटी चौथ्या दिवशी लष्कराची तुकडी पाचारण करण्यात आली व सर्वाचे संयुक्त प्रयत्न चालू झाले. सलग ५ दिवस शोध घेतल्यानंतर सर्व प्रयत्न अयशस्वी झाले व शोधकार्य थंडावलं. पुढील दोन दिवसांत काहीच प्रगती झाली नाही व ही शोधमोहीम थांबवायचं ठरलं व आम्ही पुण्यास पोहोचलो. दुसऱ्या दिवशी बातमी येऊन थडकली की, तोरणा किल्ल्याच्या मागील बाजूस लांब अंतरावरती एका सोंडेवर या मुलांचे मृतदेह सापडले आहेत. लगेचच निघालो व त्या ठिकाणी पोहोचून मृतदेह खाली आणले व रात्री पुण्यास परतलो. मन अतिशय विषण्ण झालं. या आणि अशा अनेक घटना सह्य़ाद्रीच्या डोंगरकुशीत दरवर्षी घडत राहतात.
चकवा भुलवतो कुठ़े?
राजमाची, विसापूर, तुंग, तिकोना, जिवधन, तोरणा, राजगड, लिंगाणा या ठिकाणच्या अनवट अवघड वाटांवर अनेक अपघात होत राहतात व गिर्यारोहकांना या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्ससाठी जावं लागतं. अपघात होण्याची प्रमुख कारणं पाहिली असता अपूर्ण माहिती, अनुभव नसणं व अतिआत्मविश्वास व अतिउत्साह हीच आहेत. माहिती नसलेल्या ठिकाणी नको ते साहस करणं, तसंच एन्जॉय करण्याच्या नादात ट्रेकला जाऊन दारू पिऊन बेधुंद होणं या आणि अशा अनेक कारणांमुळे हे अपघात होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्रेकर्ससाठी काही टिप्स
महाराष्ट्रात जवळपास ४०० किल्ले आहेत यापैकी निम्म्याहून अधिक किल्ले हे डोंगरी किल्ले आहेत. तरुणाईला या किल्ल्यांची भुरळ न पडेल तर नवलच. सध्या वीकएंड एन्जॉय करण्याचा तरुणाईचा आवडता फंडा ट्रेकला जाणं हा आहे. ट्रेकला जाताना थोडी काळजी घेतली तर अपघात नक्कीच टाळता येतील.
(१) ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणची सर्व माहिती गोळा करावी. या ट्रेकला पूर्वी कोणी गेलेल्यांपैरकी कोणाची सोबत मिळाली तर उत्तमच.
(२) ट्रेकला जाताना आपला कार्यक्रम आपल्या घरच्यांना तसंच मित्र-मैत्रिणींना सांगावा. आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांची नावं व मोबाइल नंबर देऊन ठेवावे. परत येण्याचा दिवस व वेळ सांगून ठेवावी म्हणजे त्या वेळात आपण न आल्यास आपले स्नेही संपर्क साधून विचारणा करू शकतील.
(३) जर आपण व्यावसायिक कंपनी अथवा संस्थेबरोबर ट्रेकला जात असाल तर त्या संस्थेकडे अनुभवी इन्स्ट्रक्टर आहेत की नाही याची चौकशी करावी.
(४) ज्या गावातून आपण किल्ल्यावर चढाई करता त्या गावातदेखील आपण ट्रेकसाठी आल्याचं व गडावर जात असल्याचं सांगावं, जेणेकरून याबाबतची माहिती स्थानिक लोकांना असेल व अडचणीच्या प्रसंगी त्यांची मदत आपल्याला मिळेल.
(५) जर ग्रुपमधल्या कोणीच हा ट्रेक केला नसेल तर गावातून वाटाडय़ा अवश्य घ्यावा. त्याची आपल्याला मदतच होईल.
(६) ट्रेकला जाताना सोबत पुरेसं पाणी आणि खाऊ घ्यावा. हेड टॉर्च (जास्तीच्या सेलसह), स्लिपिंग बॅग, कमरेला बांधायला रोप स्लिंग इत्यादी वस्तू असणं गरजेचं आहे. तसंच सर्व ग्रुपसाठी म्हणून जरुरीची, प्रथमोपचारास उपयोगी औषधं,  रोप आदी साहित्य बाळगलं तर खूपच चांगले.
(७) आजकाल बाजारात अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी खूप वस्तू मिळतात. यामध्ये सव्‍‌र्हायवल किटदेखील मिळते. शक्य असेल तर असं किट आपण जरूर बरोबर ठेवावं. या किटमध्ये डिस्ट्रेस व्हिसल, आरसा, थरमल ब्लँॅकेट, सूपचं पाकीट इत्यादी अनेक गोष्टी असतात.
ओळखीच्या खुणा
ट्रेकरूटवर जात असताना आपण भरकटलो तर नाही ना, वाट बरोबर आहे की नाही, हे तपासत राहणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी बाण अथवा दगडगोटय़ांच्या कॅरन आपल्याला वाट दाखविण्यासाठी असतात. बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी आम्हा गिर्यारोहकांना बोलावणं येतं ते अशा कारणासाठी की, ट्रेकला गेलेले लोक वाट चुकून अशा ठिकाणी पोहोचतात की त्यांना पुढे जाता येत नाही, तसंच भीतीमुळे मागेदेखील येता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस खूप आल्यास ओढय़ांना अचानक खूप पाणी येतं. मग असे ओढे पार करणंदेखील खूप धोक्याचं असतं. जर आपल्याजवळ रोप असेल तर असे ओढे पार करणं सोयीचं जाईल.
अपघात झाल्यास काय?
ट्रेकला गेल्यावर जर काही अपघात झालाच तर सर्वप्रथम आपण स्वत: आधी सुरक्षित आहात का हे पाहावं व नंतरच दुसऱ्यास मदत करावी. सुरक्षित असलेल्यांनी पोलीस तसंच आपल्या स्नेह्य़ांना झालेल्या अपघाताबाबत व आपल्याला आवश्यक असलेल्या मदतीबाबत माहिती द्यावी. ही माहिती देण्याचं काम कोणीतरी एकानेच करावं म्हणजे गोंधळ होणार नाही. अनेक वेळा एकाच अपघातासंदर्भात अनेक गिर्यारोहण संस्थांना कळविले जातं व गरज नसताना अनेक गिर्यारोहक सगळी कामं सोडून या ठिकाणी रेस्क्यूसाठी जातात. या गोष्टी होऊ नयेत म्हणूनदेखील माहिती एकानेच द्यावी. आपण योग्य ती माहिती दिली तर आपल्याला मदत मिळणं सोपं जाईल. जर आपण एखाद्या गिर्यारोहण संस्थेला मदतीसाठी फोन केला तर आपण आणखी कोणाला मदतीसाठी सांगितलं आहे ते सांगावं.
 थोडक्यात काय ट्रेकचा आनंद उपभोगायचा असल्यास थोडी काळजी घेणे गरजेचं आहे. सध्या अनेक गिर्यारोहण संस्था ३ ते ४ दिवसांचे बेसिक रॉक क्लाइंबिंगची शिबिरं घेतात. अशा शिबिरातलं प्रशिक्षणदेखील फायदेशीर ठरू शकेल. एन्जॉय मान्सून ट्रेकिंग !