गेल्या अनेक महिन्यांची पावसाची प्रतीक्षा आता फळाला आली आहे. उन्हाची काहिली सहन केल्यानंतर पावसाचा पहिला शिडकावा मन प्रसन्न करतो. आपल्यापकी बहुसंख्य लोकांना पावसाळा आवडतो आणि पावसात रस्त्याच्या कडेला मिळणारी गरमागरम भजी आणि समोसे या अशा पदार्थाचा मोह आपल्याला आवरत नाही. अशावेळी आपल्या जिभेवर आपला ताबा राहत नाही आणि त्याच्या परिणामांकडेही आपण कानाडोळा करतो. पावसाचं स्वागत म्हणजे असंख्य हवेतून आणि पाण्यातून पसरणाऱ्या संसर्ग आणि रोगांनाही आमंत्रण असतं. या काळात आद्र्रतेची पातळी वाढत असल्याने आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे अपचन, अन्नातून विषबाधा, पोटाचे विकार असे त्रास वारंवार उद्भवतात. असंख्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोगजंतू आणि जीवाणू आपल्या आसपास असल्याने सर्दी, फ्लू किंवा तापामुळे ऑफिस किंवा कॉलेजला वरचेवर दांडी लागण्याची शक्यता जास्त असते.
निरोगी जीवनशैलीचा अंगीकार केल्यास वरील परिस्थितींना समर्थपणे तोंड देणं शक्य आहे. निरोगी तसंच रोगमुक्त राहण्यामध्ये आहाराची महत्त्वाची भूमिका असते. खालील गोष्टींचा आवर्जून अंगीकार केल्यास पावसाळा सुखद आणि निरोगी जाईल.
^    गहू आणि मद्यापेक्षा ज्वारी, बाजरी, बार्ली अशा कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्सचा आहारात समावेश करावा. ही धान्यं पचायला तुलनेने हलकी असतात आणि ती आपल्या शरीरातले विषारी आणि टाकाऊ घटक काढून टाकण्यासही चांगली मदत करतात.
^    हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या भाज्या आणि फळं जसं, गाजर, सफरचंद, पपई, प्लम, डािळब आदींचं सेवन करावं. त्यात भरपूर फायबर असतं आणि ते शरीरातले अनावश्यक घटक काढून टाकण्यास मदत करतात. सर्वसामान्य परिस्थितीपेक्षा पावसाळ्यात रोगजंतूंचं प्रमाण दहापटीने वाढतं. त्यामुळे स्वयंपाकासाठी किंवा भाज्या धुण्यासाठी शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करावा. त्यापूर्वी त्यात मीठ घालावं. अशाने त्यातले रोगजंतू मरण्यास मदत होते.
^    आश्चर्याची बाब म्हणजे कारलं, कडुिनब, मुळा, मेथी अशा सर्व कडवट चवीच्या भाज्यांमध्ये अ‍ॅण्टि-ऑक्सिडण्टस असतात, जे शरीरात निर्माण होणाऱ्या सर्व गोष्टींसाठी घातक असतात. हळद ही उत्तम अ‍ॅण्टि-सेप्टिक असल्याने दररोज स्वयंपाकात छोटा चमचाभर हळद अवश्य वापरावी.
^    भरपूर ‘क’ जीवनसत्व असणारे अन्नघटक आहारात समाविष्ट केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे संत्रं, मोसंबं, भोपळी मिरच्या आदी फळं/भाज्या दररोज खाव्यात.
^    आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत पाणी पित राहणं आवश्यक आहे. पण नेहमी उकळलेलं पाणीच प्यावं. हर्बल टी, जस्मिन टी, ग्रीन टी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
^    नेहमी व्यायाम करावा. पावसाळ्यात बाहेर व्यायाम करणं कदाचित शक्य नसेल, पण घरच्या घरी योग, पायलेट्स, साधे स्ट्रेचेस, सूर्यनमस्कार आदी वॉर्मअप प्रकारातील व्यायाम करावेत.
^    घसा खराब झाल्यास मीठ घातलेल्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. तसंच सर्दी झाल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी. विषाणूंमुळे ताप आल्यास किंवा जंतुसंसर्ग झाल्यास आलं हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. कपभर आल्याचा चहा किंवा सुंठ घातलेलं उकळलेलं पाणी प्यावं. त्याने बराच फायदा होईल.
^    शेवटचं, पण महत्त्वाचं. दिवसातून दोनदा अ‍ॅण्टि-सेप्टिक साबणाने आंघोळ करून स्वतची काळजी घ्यावी. तसंच घरातही स्वच्छता ठेवावी. त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येईल.
^    गरमागरम वडापाव, भज्या किंवा चहाची कितीही भुरळ पडली तरी ते टाळणं उत्तम. त्यामुळे जंतुसंसर्ग होणार नाही. कधीतरी एकदा असं खाणं ठीक आहे. पण त्याची सवय वाईट.
^    बर्फाचा गोळा, ज्यूस, कुल्फी अशा माध्यमांतून बाहेरचं पाणी अजिबात पिऊ नये.  कारण पावसाळ्यात सर्वाधिक आजार पाण्यामुळे होतात. त्यातला सर्वात गंभीर आजार म्हणजे कॉलरा.
^    कच्च्या भाज्या आणि पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात जंतू असतात. त्यामुळे अशा भाज्या पावसाळ्यात अजिबात खाऊ नयेत. तरीही त्या खायच्या झाल्यास ब्लांचिंगसारखे उपाय योजावेत.
^    तळलेल्या पदार्थामधून सर्वाधिक संसर्गाचा धोका असल्याने त्यांचं सेवन टाळावं.
^    चहा आणि कॉफीच्या अतिरिक्त सेवनाने शरीरातलं पाण्याचं प्रमाण खालावून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे ग्रीन टीसारखा पर्याय निवडावा.
^    पावसाळा हा वर्षांतला सर्वात उत्साहवर्धक ऋतू आहे. त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा, पण त्याच जोडीला स्वतची शक्य तेवढी काळजीही घ्यावी. आहार आणि एकंदरीत जीवनशैलीवर लक्ष ठेवल्यास अनेक संसर्गापासून दूर राहू शकाल. त्यामुळे पावसाची मजा दुप्पट होईल.

Story img Loader