‘मराठी टच’ पिक्सची धम्माल
‘भाऊ, पोरांना बोलाव, राडा झालाय’. असं हल्क म्हणतोय किंवा ‘कुणाला सांगू नको, आज मी डब्यात पाव-भाजी आणलेय’. हॅरी पॉटरच्या तोंडी हे वाक्य कसं वाटतंय? ही आणि अशा तऱ्हेची टिपिकल मराठी वाक्यं हॉलीवूड अॅक्टर्सच्या तोंडी असतील तर ही अशक्य वाटणारी गोष्ट फोटोंच्या माध्यमांतून करून ठाण्याच्या दोन तरुणांनी धमाल उडवून दिली. ‘मराठी टच’ या पेजवर त्यांनी गाजलेल्या हॉलीवूड पटांमधली दृश्य टाकली आणि त्याला असे अस्सल मराठी डायलॉग चिकटवले. हॉलीवूड स्टार्सच्या तोंडी आपल्या रोजच्या वापरातली वाक्यं टाकून त्यात धम्माल आणली गेल्येय. फेसबुकवर या पेजनं चिक्कार धुमाकूळ घातलाय. गेल्या महिन्याभरात या पेजला वीस हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत आणि आता तीच पोस्टर्स आणि फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेत.
# ट्विटर@९
एके काळी केवळ ‘टिवटिवाट’ अशा थोडय़ाशा उपहासात्मक पद्धतीनं उल्लेखलं जाणारं ट्विटर नऊ वर्षांचं झालंय. ‘ट्विटर’चे संस्थापक जॅक डोर्सी यांनी २१ मार्च २००६ रोजी ‘जस्ट सेटिंग अप माय ट्विटर’ असं ट्वीट केलं होतं. १४० ही ट्विटरवरची शब्दमर्यादा काही जणांना अभिव्यक्तीसाठी अडथळा ठरेल, असं वाटत असतानाही तसं न होता, तेच ट्विटरचं जणू वैशिष्टय़ ठरतंय. फेसबुकपाठोपाठ ट्विटरची लोकप्रियता वाढतेय. अधिकाधिक युजर्स ट्विटरवर लॉग इन होताहेत. जगभरातील असंख्य सेलेब्जचं ट्विटरवर अकाऊंट आहे.
गुढीपाडवा स्पेशल
धरम संकट में
परेश रावल, नसीरुद्दीन शहा नि अनू कपूर असं दमदार त्रिकूट प्रथमच ‘धरम संकट में’ या सामाजिक उपहासात्मक सिनेमात एकत्र येणारेय. धरम पाल असे परेश रावलच्या व्यक्तिरेखेचे नाव असून नसीरुद्दीन शहा एका हिंदू बाबाची भूमिका साकारणार आहेत, तर अनू कपूर एका मुस्लीम बाबाच्या भूमिकेत असतील. एक विषय सुपरहिट ठरून तो प्रेक्षकांनी उचलून धरल्यावर बॉलीवूडमध्ये त्याच विषयावरचा चित्रपट कथानकात थोडाफार फेरफार करून आणला जातो. धर्म-ईश्वरविषयक मुद्दय़ांमुळंच ‘ओ माय गॉड’ आणि ‘पीके’सारखे चित्रपट सुपरहिट ठरले होते. ‘धरम संकट में’मध्ये धरमच्या भूमिकेत परेश रावल आहेत्
. तेव्हा ‘धरम संकटात आहे’ की ‘धर्म संकटात आहे’ याचा शोध सध्या तरी ट्रेलरमधूनच घ्यावा लागेल. त्याची ही लिंक –
https://www.youtube.com/watch?v=dmwnzE14bZs
‘हॉटेल ट्रान्सील्व्हानिया २’ ही अमेरिकन थ्रीडी कॉम्प्युटर अॅनिमेटेड फॅण्टसी कॉमेडी फिल्म आहे. ‘हॉटेल ट्रान्सील्व्हानिया’चा हा सीक्वेल अर्थात दुसरा भाग असून आपल्या आवडत्या मॉन्स्टर्स नि ह्य़ुमन कॅरॅक्टर्सची एक झलक पाहायची संधी या चित्रपटाच्या टीजर ट्रेलरमुळं मिळेल. त्याची ही लिंक – https://www.youtube.com/watch?v=smcHKYUs4RE
‘टाइमपास २’चा ट्रेलर
‘बॉम्बे वेल्वेट’चा ट्रेलर
क्रिकेट वर्ल्ड कपच्या धामधुमीत भारत-बांगलादेशची मॅच चालू असताना रणबीर कपूर नि अनुष्का शर्माच्या बहुचर्चित ‘बॉम्बे वेल्वेट’चा ट्रेलर रीलीज करण्यात आला. यात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या केमिस्ट्रीसोबतच करण जोहरची खलनायकी भूमिका दिसेल. १९६०च्या दशकातल्या मुंबईचं प्रतिबिंब या ट्रेलरमधून दिसतंय. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट रणबीरच्या लुक्समुळं, सिनेमाच्या कथानकाच्या पाश्र्वभूमीमुळं, करणच्या पहिल्याच खलनायकी भूमिकेसह विविध कारणांनी चर्चेचा विषय झाल्यानं ट्रेण्डमध्ये राहिलाय. त्याची ही लिंक
https://www.youtube.com/watch?v=AmMIQZ1TAig
राधिका कुंटे- viva.loksatta@gmail.com