vn18हाय फ्रेण्ड्स! यूटय़ूबवर काय ट्रेण्डिंग आहे, ट्विटरवर आणि फेसबुकवर काय गाजतंय याची माहिती आम्ही  तुमच्यापर्यंत पोहचवतो आहोतच. त्यासोबत तुम्हीही तुमच्या आवडीच्या पोस्ट किंवा व्हिडीओज् आमच्याशी viva.loksatta@gmail.com वर नक्की शेअर करा. ईमेल करताना तुमचं पूर्ण नाव, कॉलेजचं नाव-वर्ष, तुमचा फोटो हे डिटेल्सही असणं आवश्यक आहे. सब्जेक्ट लाइनमध्ये ‘सोशल न्यूज डायजेस्ट’ असं आठवणीनं लिहा.  
क्रिकेटनंतर आता ‘माय चॉइस’चा धुमाकूळ
गेल्या आठवडय़ात क्रिकेट वल्र्ड कप फायनलमुळे सोशल मीडिया नेटवर्किंगवरदेखील त्याचेच पडसाद उमटत होते. रविवारनंतर मात्र दीपिका पदुकोणचा होमी अडजानीयानं केलेल्या माय चॉइस व्हिडिओची चर्चा होती.
.. गमते उदास
सलग सात वेळा विजयाची माळ गळ्यात पडल्यावर टीम इंडियाकडून सेमी फायनल जिंकण्याच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यासाठी सगळ्या प्लेअर्सची नावं गुंफून विजयी भव टीम इंडिया म्हणत केलेली कवनं असोत किंवा टॉस हरण्यापासूनच मॅचला सुरुवात झाल्यावर देवाकडं केल्या गेलेल्या प्रार्थना असोत.. गेल्या गुरुवारी देशप्रेम उफाळून येत होतं खरं. ‘तुम्ही आम्हाला दिलेत आनंदाचे क्षण,’ असा टीम इंडियाला सपोर्ट करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली दिसत होती. दुसरीकडं टीमविरुद्ध परखडपणं बोलणारे होते, तिसरीकडं तटस्थपणं आपली मतं मांडणारेही होते. अब ऑस्ट्रेलिया देखेगी इंडिया के तेवर, जब उनको दिखाएंगे अनुष्का के १० देवर असे मेसेज पाठवणाऱ्या क्रिकेटफॅन्सनी विराट आऊट झाल्यावर अनुष्काच्या विरोधात तडाखेदार जोक्सची बॅटिंग केली. कर्णधार धोनीने विराटला सांगितलं जास्तीत जास्त वेळ ‘शर्मा’सोबत राहण्याचा प्रयत्न कर. पण थोडी मिस अंडरस्टॅिण्डग झाली अन् त्याला वेगळीच शर्मा वाटली, अशा तऱ्हेच्या या जोक्सचा विरोध करण्याचाही प्रयत्न झाला. का म्हणून अनुष्काच्या माथी खापर फोडायचं? असाही दावा केला गेला. तर काही नेटकरांनी काही खासगी टीव्ही चॅनेल्सवरच्या चर्चेवरही जोरदार आक्षेप नोंदवला. यूटय़ूबवरून व्हायरल होणारी मौका मौकाची लाट आता स्थिरावलेय, हे  Da Fudge च्या पॅरेडी व्हिडीओतून सिद्ध झालंय. या व्हिडीओला एका दिवसात १३,७५५ व्हय़ूज मिळालेत. त्याची ही लिंक. https://www.youtube.com/watch?v=4cVzR5pw6dc
ऑसी एक नंबर..
ऑसी.. ऑसी.. एक नंबर अशी परिस्थिती वर्ल्डकपच्या फायनलला झाली होती. टीम ऑस्ट्रेलियानं पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकला. त्यामुळं साहाजिकच गेले दीडएक महिना वर्ल्डकप रिलेटेड ट्रेण्डिंगमधला सर्वाधिक ट्रेण्ड #cwc15finalहाच होता. पाठोपाठ टीम ऑस्ट्रेलिया, आस्क कॅप्टन, सचिन तेंडुलकर, श्रीनिवासन आदी ट्रेण्डही होतेच.
दरम्यान आयसीसीच्या सर्वोत्तम संघाच्या घोषणात एकही भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आलेलं नाहीये. या टीमचा कॅप्टन न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रेंडन मॅकलम असेल. विश्वकरंडकातील कामगिरीच्या आधारावर आयसीसीनं ब्रेंडन मॅकलम, मार्टिन गप्टिल, कुमार संगकारा, स्टिव्ह स्मिथ, एबी डिव्हिलिअर्स, ग्लेन मॅक्सवेल, कोरे अँडरसन, डॅनिएल व्हिटोरी, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मॉर्ने मॉर्केल, ब्रेंडन टेलर हा संघ निवडलाय.
मात्र यामुळं निराश व्हायचं कारण नाही. कारण ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद सायना नेहवालनं तर पुरुष गटाचं विजेतेपद के. श्रीकांतनं पटकावलंय. त्यामुळं  क्रिडाप्रेमींच्या गोटात आनंदाचं वातारण आहे. त्याचीच झलक सोशल मिडियावरच्या ट्रेण्डिंगमध्येही दिसतेय. विशेषत: सायनाचं अधिक कौतुक होतंय.
मराठीची बाजी
‘६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारां’मध्ये मराठी चित्रपटांनी एकदम फूल टू बाजी मारलेय. ‘कोर्ट’ देशभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय. ‘एलिझाबेथ एकादशी’  सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, ‘किल्ला’ विशेष उल्लेखनीय चित्रपट नि रवी जाधवच्या ‘मित्रा’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झालाय. या सगळ्याच पुरस्कार विजेत्यांचं सोशल साइट्सवरून भरभरून कौतुक करण्यात आलं. िहदीत ‘क्वीन’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय. ‘मेरी कोम’ला लोकप्रिय चित्रपट पुरस्कार, ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ला विशेष उल्लेखनीय पुरस्कार नि विशाल भारद्वाजना ‘हैदर’साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार घोषित करण्यात आलाय.
या पुरस्कारप्राप्त चित्रपटांपकी ‘कोर्ट’चा ट्रेलर प्रसिद्ध झालाय. एप्रिलमध्ये प्रदíशत होणाऱ्या ‘कोर्ट’ला अनेक ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’सह अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानसन्मान मिळालेत. त्याच्या ट्रेलरची ही लिंक – https://www.youtube.com/watch?v=yhuQr4ZvZ9A&fb_action_ids=10202636636997046&fb_action_types=og.shares
कलम ६६ अ
सोशल मीडिया ट्रेिण्डगमध्ये वरचढ होता 66अ. सोशल मीडियावरील अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भातील आयटी अ‍ॅक्टचं कलम ६६अ न्यायालयानं रद्द ठरवलंय. ही याचिका दाखल करणाऱ्या श्रेया सिंघलचं नावही ट्रेण्डमध्ये दिसत होतं. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ विषयीचा न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतोय. मीडियावरील अ‍ॅक्टिव्ह नेटकरांनी या निर्णयाचं मनापासून स्वागत केलंय. तर काहींनी या कलमाबद्दल आक्षेपही नोंदवलेत.
पदुकोण नि पिकू
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा घडवली आहे. तिचा ‘माय चॉइस’ हा व्हिडिओ गाजतोय. शिवाय गेल्या आठवडय़ात तिची एक मुलाखत झाली होती. तीसुद्धा सोशल मीडियावर गाजतेय. ‘मी एके काळी डिप्रेशनमध्ये होते, पण अतिशय प्रयत्नपूर्वक मी त्यातून बाहेर पडलेय,’ असं दीपिकानं म्हटलंय. फिजिकल हेल्थप्रमाणंच मेंटल हेल्थही तितकीच महत्त्वाची आहे, हे स्वानुभवानं पटल्यानं ती आता या संदर्भात जागृती करणारेय. आता या जनजागृतीमध्ये आणि माय चॉइसच्या व्हिडिओच्या वेळीच नेमका पिकूचा ट्रेलर रिलिज झालाय. नेटकरांमध्ये या ‘योगायोगा’संदर्भातही सॉलिड चर्चा आहे.
अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या ‘पिकू’चा ट्रेलर रिलिज झालाय. बाप-लेकीच्या कायमच जिव्हाळ्याचा विषय ठरणाऱ्या विषयाचे कंगोरे यात दाखवले गेलेत. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण नि इरफान खान अशी तगडी स्टारकास्ट असणारा पिकू मे महिन्यात रिलीज होतोय. या ट्रेलरला एका दिवसात तब्बल साडेअकरा लाख हय़ूज मिळालेत. त्याची ही लिंक.   
https://www.youtube.com/watch?v=oeiKUlUUNQ8
फाळके टू कपूर
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते, निर्माते-दिग्दर्शक शशी कपूर यांना जाहीर झालाय. शशी कपूर या पुरस्काराचे ४६वे मानकरी आहेत. यापूर्वी शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे भाऊ राज कपूरना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. शशी कपूर यांचं अभिनंदन करतानाच सोशल मीडियावर त्यांच्या ‘तुम्हारे पास क्या है?.. मेरे पास माँ है’ या गाजलेल्या डायलॉगवर आधारित ‘मेरे पास माँ और दादा साहब हैं’ असा फोटो व्हायरल झाला होता.
फेसबुकचं ‘ऑन धिस डे’
एखाद्या विशिष्ट तारखेला गेल्या काही वर्षांत टाइमलाइनवर लिहिलेल्या पोस्ट्स पुन्हा प्रकाशात आणण्याची संधी युजरला ‘ऑन धिस डे’ या सुविधेद्वारे ‘फेसबुक’नं उपलब्ध केल्येय. यामुळं युजरच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळून त्यावर फ्रेंड्सच्या प्रतिक्रियाही मिळविता येऊ शकतील. मात्र जुन्या आठवणींमुळं त्रास होणार नाही याचीही ‘फेसबुक’ काळजी घेतंय. त्यासाठी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची घटना किंवा नकोशा आठवणी या सुविधेत टाळल्या जाणारेत.  

Story img Loader