|| गायत्री हसबनीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पायात कोल्हापुरी चप्पल, ब्लेझरपेक्षा धोती आणि अंगरखा, त्यावर एखादा डिझायनर ब्रूच, गळ्यात माळ किंवा कानात भिकबाळी, अशी एक पारंपरिक वेशभूषेची लाट मेन्सवेअर फॅ शन विश्वात आली आहे. साध्यासुध्या पेहरावात राहण्यापेक्षा थोडय़ा बंडखोर पण ‘स्टाईलिश’ अशा वस्त्रांमध्ये आजचे युवक जास्त पाहायला मिळतात. पारंपरिक वस्त्रांना थोडा आधुनिक टच देणारा मर्दानी लुक सध्या ट्रेण्ड होतो आहे..

एकीकडे स्टिरिओटाइप फॅ शनसोडून फेमिनाइन फॅ शनलोकप्रिय होऊ पाहात असताना मेन्सवेअरमध्ये पारंपरिक पोशाखाचे नवे लुक समोर येत आहेत. कपडय़ांची रचना आत्तापर्यंत जशी होती तशीच आहे, फक्त यामध्ये एका फॅ ब्रिकवर दुसऱ्या फॅ ब्रिकची जोडणी करून एक वेगळा आऊ टफिट तयार होतोय. यातही सिमेट्रिकल आणि एसिमेट्रिक अशी रचना दिसेल. उदाहरणार्थ, एका ट्रॅडिशनल कोटवर कलमकारीची एक बाजू तर दुसरी बाजू ही प्लेन असेल, हा जसा सिमेट्रिक भाग झाला तसाच एसिमेट्रिकलमध्ये कॉटनच्या कुर्त्यांवर खणाच्या एका कोपऱ्याची एसिमेट्रिकल पद्धतीने केलेली रचना दिसेल. पॅचवर्कलाही पारंपरिक मेन्सवेअरमध्ये पसंती मिळते आहे. ‘वनफॉटिफाय ईस्ट’, ‘क्वर्कबॉक्स, ‘ईडिजीन’, ‘सब्यासाची’, ‘तेजाज्ञा’ असे अनेक ब्रॅण्ड सध्या पारंपरिक मेन्सवेअरना आधुनिक टच देत एक नवा लुक विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.

सध्या घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे ‘तेजाज्ञा’ हा ब्रॅण्ड. लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी या ब्रॅण्डला वेगळ्याच उंचीवर नेले आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर अभिनेता सुबोध भावे यांचा एक आगळावेगळा लुक पोस्ट केला. सुबोधच्या कुर्त्यांवर खणाचा खूप सुंदर वापर केला गेला आहे. त्यामुळे मेन्सवेअरमधील एक हटके लुक म्हणून तरुण मंडळी नक्कीच विचारात घेऊ शकतात. ‘मुली या सर्व प्रकारच्या कपडय़ांना अजमावू शकतात, पण कुठे तरी मुलांच्या कपडय़ांची फॅशन मोनोटोनस असल्याचे आढळते. मेन्सवेअरमध्ये आलेली ही स्थिरता अभिनेता रणवीर सिंगने ब्रेक केली. त्याने इंडो-वेस्टर्न लुकचे आऊ टफिट्स ट्राय केले जे खूप लोकांना आवडले, पण ते प्रत्यक्षात फॉलो केले गेले नाहीत. आपल्याकडे पुरुषांच्या कपडय़ांकडे पाहण्याचा एक ठरावीक दृष्टिकोन आहे आणि त्यात काही वेगळं केलं तर लगेचच सगळ्यांच्या भुवया उंचावतात. पण मला नक्कीच असं वाटतं की, मुलांच्या एथनिक वेअरमध्ये खूप काही डिझाईन करण्यासारखं आहे. आम्हाला ‘तेजाज्ञा’मध्ये हीच ‘इंडो-वेस्टर्न’ची सांगड घालायची होती. कुर्त्यांवर म्हणजे इंडो लुकवर आम्ही नेकलाइनमध्ये वेस्टर्न पद्धत आणली. अ‍ॅक्सेसरीज आणल्या. हा इंडो-वेस्टर्न लुक नक्कीच ट्रेण्डमध्ये येईल. कारण मुलांमध्ये बदल स्वीकारण्याची सजगता आली आहे,’ असं प्रांजळ मत तेजस्विनी पंडितने व्यक्त केलं.

‘जुने विचार लोकांनी मागे टाकावेत. पैठणी ही फक्त स्त्रियांसाठी आहे. खणाचे कापड चोळीसाठीच असते, हा विचार बाजूला ठेवून निव्वळ कोणाही एकासाठी एखादे फॅ ब्रिकबनलेले नसते हे समजून घेणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले. पूर्वीचे महाराजांचे अंगरखे, बाराबंदी, कुर्ते आणि पठाणी विविध फॅ ब्रिक्समध्ये डिझाईन केले जात होते. त्या काळातही त्यांची एक वेगळी स्टाइल स्टेटमेन्ट होतीच. त्यामुळे एखाद्या कुर्त्यांवर खणाचे किंवा नऊवारी साडीच्या पदराचे डिझाईन ‘पॅचवर्क’ पद्धतीने दिसते तेव्हा तो पूर्ण लुक खूप वेगळा दिसतो. मी उमेश कामतसाठीही असा एक आऊ टफिट तयार केला होता, ज्याला पैठणीची बॉर्डर आणि पैठणीचा खिसाही होता जो अतिशय उत्तम दिसतो. असे आऊटफिट्स तयार करताना आम्ही शरीरयष्टीचा खूप विचार करतो. पोटाला घेर असलेल्या मंडळींचे कुर्त्यांचे डिझाईन वेगळे असतात. बांध्याला, म्हणजेच ज्यांना मसल्स आहेत अशांचे वेगळे असतात. पेटीट या शरीरयष्टीच्या मंडळींसाठीही डिझाईन्स वेगळी असतात. यामध्ये मोडणाऱ्या आमच्या मित्रांनी म्हणजे उमेश कामत आणि अभिजीत खांडकेकरने या नव्या ड्रेसवर फोटोशूटही केले आहे. आम्ही डिझाईन केलेले कुर्ते खूप सिंपल पण एथनिक वाटतात. कारण आम्ही त्याखाली खणाची बॉर्डर ठेवली आहे, यात रंगही काळा, निळा, हिरवा, केशरी असे आहेत. काही कुर्त्यांचे (अंगरखा, सरकारी) नेकलाइन वेगळे आहेत, काहींना बटण आहेत तर काही बाराबंदीही आहेत, अशी सविस्तर माहिती तेजस्विनीने दिली.

एखादा ट्रेण्ड येण्यामागे नक्की कोणती कारणं असतात? त्यामागे माध्यमांचा प्रभाव कितपत वाढतो, फॅ शनमध्ये खरंच बदल घडवून आणण्यासाठीची ही एक निव्वळ मेहनत आहे, याबद्दल ठळकपणे बोलताना प्रसिद्ध टेक्स्टाइल डिझायनर विनय नारकर यांनी सांगितले की, ‘गेली तीस-चाळीस र्वष पारंपरिक टेक्स्टाइल्सच्या बाबतीत जागरूकता नव्हती. भारतीय टेक्स्टाइल्स नष्टच होण्याच्या मार्गावर होते, मात्र गेल्या दहा वर्षांत जुने पारंपरिक टेक्स्टाइल परत ‘रिव्हाइव्ह’ होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आपल्या लोकांना पारंपरिक वस्त्रांचे महत्त्व कळू लागले. ग्लोबल ब्रॅण्ड्स हल्ली भारतातही कानाकोपऱ्यात आहेत. वेस्टर्न कपडे सहज वापरले जाताना कुठे तरी लोकांना अशी जाणीव होऊ  लागली की या वेस्टर्न कपडय़ांची गर्दीत ‘आपलं’ पारंपरिक असं कुठंच नाहीये. प्रत्येक ओकेजनला आणि आपल्या भारतीय वातावरणानुसार वेस्टर्न सूट होतंच असं नाही हेसुद्धा लोकांना पटायला लागलंय. लोकांसमोर वेस्टर्न पर्याय खूप होते, पण भारतीय वस्त्रे परिधान केल्यावर रुबाब अजमावता येतो या जाणिवेतून आपली भारतीय वस्त्रेच पुन्हा फॅ शनमध्ये आणली आहेत.’

लोकांना सतत काही तरी नवीन हवंच असतं. त्यामुळे कुणी खादी-कॉटनच्या कुर्त्यांवर खणाचा पॅच आणला, तर कुणी मंगलगिरी कपडय़ावर एम्ब्रॉयडरी केली. त्यामुळे ट्रेण्ड हा ‘एक्सपिरिमेन्टल’ पद्धतीने आला. मेन्सवेअरमध्ये काही गोष्टी आणताना त्या फार जाणीवपूर्वक आणाव्या लागतात. सध्या यात एक्स्प्लोअर करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मुलांना फॅ शनमधून इन्डिव्हिज्युअ‍ॅलिटी मिळते आहे. आणि खासकरून खादीच्या कपडय़ांमधून एक वेगळा अनुभव मुलांना मिळतो आहे, असं त्यांनी सांगितलं.

सेलिब्रिटी सध्या हा ट्रेण्ड फॉलो करत आहेत त्यामुळेही लोकांमध्ये पारंपरिक तरीही आधुनिक टच असलेले हे लुक लोकप्रिय होत असल्याचे विनय यांनी सांगितले. अभिनेता सुव्रत जोशीने धोतीचा वापर केला. त्याच्या लग्नाचाही पूर्ण लुक मी बनवला होता. त्याला कलमकारी कुर्ता आणि इकतच्या कुर्त्यांसोबत बंगाली धोती दिली होती. सुव्रतचा हा धोती ट्रेण्ड चांगलाच प्रसिद्ध झाला. मेन्सवेअरमध्ये सिल्क धोतीचा एक लुक असतो आणि त्यामध्ये मुळात नॅचरल फॅ ब्रिकअसतात, उदाहरणार्थ, खादी, प्युअर सिल्क वगैरे. सुव्रत जोशीप्रमाणे वैभव तत्त्ववादीने एसिमेट्रिक पद्धतीचे मेन्सवेअर परिधान केले होते. त्यांचा लुक तरुणांमध्ये खूप वाखाणण्याजोगा होता. त्यामुळे सेलिब्रिटींच्या नव्या प्रयोगातून ट्रेण्डसेटर फॅ शननक्कीच मिळते, असंही विनय यांनी सांगितलं. मेन्सवेअरमध्ये सध्या पारंपरिक कपडय़ांमध्येच भरपूर प्रयोग होत आहेत.

नक्की हे मेन्सवेअर कसे तयार होतात? ते बनवण्यामागची प्रेरणा काय असते, हे समजून घेणं गरजेचं असल्याचं विनय यांनी सांगितलं. ‘प्रत्येक डिझायनरची प्रोसेस ही वेगळी असते. मी खादी आणि कॉटनच्या धोतीचं सध्या रिव्हाइव्हल करतोय. यात एक ‘पांडलपाकू’ जी आंध्र प्रदेशात वापरली जाते ती धोती, ज्याला कॉटनची कॉन्ट्रास्ट बॉर्डर असते. दुसरी ‘पोनडूरू खादी’ धोती, जी श्रीकाकूलुम येथील एक प्रकारे लोप पावत असलेल्या विव्हिंगपैकी एक आहे. तिसरी म्हणजे मंगलगिरी. हीसुद्धा कॉटनची धोती आहे. सर्वानाच धोती नेसणं अवघड जातं, म्हणून मग त्याची रचना करताना त्या स्टिच करून उपलब्ध केल्या. आम्ही ओकेजननुसार कपडे डिझाईन करतो. मग रंगसंगती ठरवली जाते. काहींना अगदी ब्राइट कुर्ते परिधान करायचे नसल्यास कुर्त्यांवर थोडं पॅचवर्क केलं जातं. मग असे पॅचवर्क हे कफ्सवर, पॉकेट्सवर आणि कॉलरवर उठून दिसतात. कपडय़ांवर व्हायब्रंसी आणण्यासाठी असे नानाविध प्रकार केले जातात. उदाहरणार्थ, कॉटनच्या कुर्त्यांवर खांद्याला बुट्टी आणि पॅचवर्कही केले जाते. इतिहासातल्या खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. पेशव्यांच्या काळात त्यांनी येवल्याच्या पैठण्या बनवून घेतल्या. सिल्कची पितांबरेही त्या काळातील आहेत. पुरुषांच्या अंगरख्याचे कापड ‘जरीपटका’ हे चंदेरी आणि महेश्वरीला बनायचे. हे कपडे आजच्या काळात पूर्णत: ऑथेन्टिक पद्धतीने नक्कीच येणार नाहीत, पण ते आजच्या काळात वापरण्याजोगे आहेत, अशी माहिती विनय यांनी दिली.

परंपरेला आधुनिकतेचा साज चढवत केलेले फॅ शनेबल लुक्स हे ट्रेण्डी आहेत. नेहमीपेक्षा वेगळे काही तरी परिधान करण्याचे समाधान देणारे आणि त्याच वेळी स्वत:चे एक वेगळे स्टाइल स्टेटमेन्ट मांडण्याची, फॅ शनच्या बाबतीत प्रयोग करून पाहण्याचीसंधी देणारे आहेत. त्यामुळेच केवळ ब्लेझर न वापरता एसिमेट्रिक अंगरखे, त्यावर भगवा फेटा, कानात भिकबाळी आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा आपलेपणा देणाऱ्या या इंडो-वेस्टर्न फॅ शनला मेन्सवेअरमध्ये जास्त पसंती मिळते आहे हे खरे!

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional clothing of india