विनय नारकर viva@expressindia.com

बारीक कंबर वर पीतांबर।

जरी रेशमी बंद लाविला।

– शाहीर परशराम

गेल्या दोन्ही भागांमधून आपण पीतांबर संस्कृत आणि मराठी साहित्यामध्ये कसे दिसून येते हे पाहिले. पीतांबराच्या दिव्यत्वाबद्दल आणि पावित्र्याबद्दल आपण जाणून घेतले. लोकसाहित्यातील उल्लेखांवरून पीतांबराच्या लोकप्रियतेचाही अंदाज आपल्याला आला.

या भागात आपण पीतांबराच्या स्वरूपाबद्दल जाणून घेऊ या.

आपण साधारणपणे जाणतो की पीतांबर म्हणजे रेशमी धोतर. धार्मिक विधी किंवा समारंभात नेसली जाणारी धोतरे ही सहसा  रेशमी असत. रेशमी धोतराला ‘सोवळे’ही म्हटले जाते. पण ज्या रेशमी धोतराला जरीचे काठ असतात, त्याला ‘पीतांबर’ म्हटले जाते. पीतांबराची विशेषता म्हणजे हे स्त्री व पुरुष दोघांसाठीही असायचे. पुरुषाचे पीतांबर म्हणजे ‘मर्दानी पीतांबर’ व स्त्रियांसाठीचे पीतांबर म्हणजे ‘जनाना पीतांबर’. मर्दानी पीतांबर हे लांबीला साधारण साडेपाच वार असायचे आणि जनाना पीतांबर हे साडेसात ते आठ वार असायचे. जनाना पीतांबर म्हणजेच पीतांबर साडीवर कधी कधी फुलांची बुट्टी असायची.  दोन्ही प्रकारच्या पीतांबरांमध्ये काठ मात्र ठसठशीत असायचे. मर्दाना पीतांबराचे काठ कधी कधी छोटेही असायचे. याशिवाय छोटे काठ असलेले तीन वारी पीतांबर लहान मुलांसाठीही विणले जात असत.

थोडे कमी दर्जाचे, लांबीला लहान असणारेही पीतांबर असायचे, त्यास ‘पितांबरी’ म्हटले जायचे. पीतांबरामध्ये एकतारी, दोनतारी व चौतारी असे प्रकार असायचे. यावरून त्याची जाडी व किंमत ठरत असे. जनाना पीतांबर हे महाराष्ट्रातच प्रचलित होते, तसे बनारसमध्येही त्याचे थोडेफार चलन होते. नानासाहेब पेशव्यांचे चिरंजीव विश्वासराव यांच्या व्रतबंधावेळी आहेरासाठी घेतलेल्या वस्त्रांच्या यादीत त्या वेळच्या काही वस्त्रांची नावे व किमती समजतात. त्यात ‘पीतांबर जनानी रु. ३४’ व ‘पीतांबर मर्दानी रु. ३३’ असा उल्लेख सापडतो.

पीतांबर हे धार्मिक विधींसाठी वापरण्यात येते, कारण रेशम हे शुद्ध समजले जाते. हे न धुता, फक्त पाणी शिंपडून शुद्ध होते, अशी धारणा असते. हे सहसा मलबेरी व तसर रेशमामध्ये विणले जायचे. रेशम अर्थातच रेशीम किडय़ांपासून बनते. यात रेशीम किडय़ांची हिंसा होते. पीतांबर हे धार्मिक विधींसाठी वापरण्यात येत असल्यामुळे जैनधर्मीय आणि काही ब्राह्मण समाजाला हे वापरणे वावगे वाटत असे. त्यामुळे ज्या रेशीम कोशांना फोडून रेशीम किडा उडून जातो, त्या कोशांपासून जे रेशीम काढले जाते, त्यापासून काही पीतांबर विणले जात असत. त्यांना ‘मुकटा’ असे म्हणत. मुकटा हा शब्द ‘मुक्त’ या शब्दापासून बनला आहे. येथे मुक्त म्हणजे कोशातून मुक्त झालेला रेशीम किडा. या रेशमाचे धागे एकसारखे नसतात, हे थोडे जाडेभरडेही असते, पण असे रेशम जास्त सापडत नसल्याने हे जास्त महाग असते.

पीतांबराला ‘ठेपाऊ’ असेही नाव होते. ठेवणीतला, म्हणजे खास प्रसंगासाठी राखून ठेवलेल्या पीतांबराला ‘तगवणा’ असा शब्द होता. मुळात पीतांबर हे अग्नीचे प्रतीक म्हणून पिवळे असायचे, परंतु विसाव्या शतकाच्या सरुवातीला हे निरनिराळ्या रंगांमध्ये बनू लागले. हस्तिदंती, हिरवा, लाल, जांभळा या रंगांतही पीतांबर बनू लागले. कदाचित यामुळे नंतर ‘पिवळा पीतांबर’ असा द्विरुक्ती वाटणारा शब्दप्रयोग बराच प्रचलित झाला. पीतांबर कधी नेसले जावे याचे काही संकेत होते. स्नानानंतर पीतांबर नेसून पूजा करणे हे नित्याचे होते. अन्न ग्रहण करतानाही पीतांबर नेसले जायचे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात करताना राजांनी पीतांबर नेसण्याचाही रिवाज होता. विवाहप्रसंगी वधूपित्याने नवरदेवास पीतांबराचा आहेर करण्याची प्रथा रूढ होती. लग्नप्रसंगी व उपनयन संस्कारावेळी आणि काही विशेष सणांना जसे, दसरा, राम नवमी, लक्ष्मी पूजनावेळी पीतांबरच नेसले जायचे. कुलदेवतेसंबंधी कुळ धर्माचरणाच्या  वेळीही पीतांबर नेसणे अनिवार्य होते. श्रावण महिन्यातले विविध सण साजरे करताना पीतांबरच जास्त वापरले जाते. नागपंचमीच्या सणासाठी माहेरी आलेल्या बाळाईचे शंृगार वर्णन करणाऱ्या ओव्यांमध्ये,

नेसली पिवळा पितांबर

घेतला करगती शेला

अशाप्रकारचे वर्णन येते. पैठण्यांप्रमाणे पीतांबरे ही पैठण आणि येवला इथे प्रामुख्याने विणली जायची. याशिवाय बनारसचे पीतांबरही प्रचलित होते. शाहीर प्रभाकरच्या या लावणीमध्ये पीतांबर कुठे विणले जात असत, याचा उल्लेख येतो. ‘विसां आंत उम्मर, नरम कंबर, पीतांबर पैठणचे नेसल्यें! ’  बुलढाणा जिल्ह्य़ातील देऊळगाव राजा इथेही पीतांबर विणले जात असे, असा उल्लेख सापडतो. पीतांबरावरून मराठी भाषेत काही म्हणीही तयार झाल्या आहेत. ‘एक पीतांबर घेऊन ठेवला म्हणजे बारा वर्षांचा धडा होतो’, अशी म्हण प्रचलित होती. याचा शब्दश: अर्थ घ्यायचा तर पीतांबर हे चांगले टिकाऊ असते व मथितार्थ म्हणजे एखादी वस्तू मिळाल्याने विवक्षित काळापर्यंत ती मिळण्याविषयी निर्माण होणारी निश्चिंतता, असा होतो. आणखी एक म्हण आहे, ‘आईच्या लुगडय़ाला बारागाठी, बायकोला पीतांबर धटी’, बायकोचे कोडकौतुक करताना आईकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलाबद्दल ही म्हण आहे. ‘नागमोडीचा पीतांबर नेसणे’, असेही म्हटले जात असे, त्याचा अर्थ नागवे असणे असा होतो. कथाकल्पतरू या ग्रंथामध्ये, ‘कासे कसिला पितांबर। बोटधारी॥’, असा उल्लेख येतो. तर ‘बोटधारी’ म्हणजे ज्यात काही नक्षी नाही असे बोटाच्या रूंदीइतके काठ. काठ नसलेल्या पीतांबरास ‘कद’ असेही म्हटले जात असे. महाराष्ट्रातल्या काही भागांत लग्नात वधूला ‘अष्टपुत्री’ नेसायला देत असत. हे मामाकडून दिले जात असे. साधारणपणे कमी किमतीतली अष्टपुत्री म्हणजे शुभ्र वस्त्राच्या काठाला हळद लावून बनवत असत. अष्टपुत्री साडीमध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व होते. पीतांबर साडी ही अष्टपुत्री म्हणून वधूस दिली जात असे. एकनाथांच्या ‘रुक्मिणी स्वयंवरा’मध्ये असा उल्लेख येतो.

फेडिलें मायेचें वधूवस्त्र।

अष्टपुत्र्या पीतांबर।

नेसली कृष्णमय स्वतंत्र।

तेणें सुंदर शोभली।’

पीतांबराबद्दलच्या लेखांचा समारोप करताना शाहीर परशरामाच्या एका आध्यात्मिक लावणीचा उल्लेख करण्याचा मोह अनावर होतो आहे. एकदा तुकारामाच्या घरी वऱ्हाडी पाहुणे येणार असतात. तुकाराम नेहमीप्रमाणे बेपत्ता. जिजाबाईकडे नेसायला धड लुगडं नाही. ती विठ्ठलाचा धावा सुरू करते. विठ्ठल लगेच येतो आणि स्वत:चा दिव्य पीतांबर जिजाबाईस नेसवतो.

आपलाच पीतांबर आपले स्वकराने लपटाई॥

देदीप्यमान पिवळा पीतांबर हरीचा॥

तो जिजाबाई नेसली पदर भरजरीचा॥

अवघेच वऱ्हाडी दिपले पीतांबर नवपरीचा॥

सर्व वऱ्हाडी त्या पीतांबराचे तेज पाहून दिपून जातात. एवढेच नाही तर विठ्ठल वरमाईसाठीसुद्धा भरजरी पीतांबर देतो.

वरमाईला पीतांबर मोतीचूर जरीकाठाचा॥

बाकीच्या वऱ्हाडी मंडळींसाठीही चौदेशीची वस्त्रे देतो. नंतर तुकाराम येतात आणि विठ्ठलाचा पीतांबर पाहून म्हणतात,

ओळखिला पीतांबर नेत्री आले पाणी॥

श्रमलास तू देवा त्वा मजला केले ऋणी॥

अशा विलक्षण वस्त्रपरंपरा आपल्या काव्यांमधून जपल्याबद्दल या सर्व कवींचे आपण ऋणी आहोत.