पाऊस आणि ट्रेकर्स यांचं नातं जिवाभावाचं. शहरात पावसावर खूप राग धरणारे ट्रेकर्स सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पावसाशी अगदी मुक्तपणे खेळतात. मनसोक्त भिजून घेतात, शहरामध्ये ऑफिस-कामामुळे पावसाला दूर ठेवल्याची सगळी भरपाई करून घेतात. तसं पाहायला गेलं तर पावसाच्या जलधारांमुळे सीमेंटच्या अगदी कंपाऊंड वॉललाही जिथे हिरवे कोंब फुटतात, तिथे डोंगरातल्या अस्सल गावरान मातीची काय कथा? अवघ्या धरती-डोंगर-पठारे-राने-उतार-किल्ले-बुरूज-माच्या, इतकंच काय, मंदिरांच्या कळसांवरही नवचतन्याची हिरवी शाल पांघरली जाते. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी मान्सून ट्रेकचे वेध लागतात. लिस्ट चेक केली जाते, एकमेकांना एसेमेस धाडले जातात, सोयीचा वीकेंड ठरवला जातो आणि पावलं वळतात सह्यद्रीच्या पायवाटांकडे! या लेखात अशाच काही माहीत असलेल्या-नसलेल्या पुणे-मुंबईहून एका दिवसात बघता येण्याजोग्या ‘मस्ट व्हिजिट’ मॉन्सून डेस्टिनेशन्स.
मढे घाट : ही पुण्यापासून अगदी एका दिवसात सहज जाऊन येण्याजोगी जागा आहे. हा घाट पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. नरवीर तान्हाजी मालुसऱ्यांचे पाíथव ज्या वाटेने कोकणातील ‘उमरठे’ या त्यांच्या गावी नेण्यात आले, ती ही घाटवाट. पुण्यापासून अंदाजे साठ किमीवरचं वेल्हे हे तालुक्याचे गाव गाठायचे. तिथून केळद गावी ‘अकरा नंबरची’ बस जाते. रस्ता चिखलात न्हालेला नसेल तर केळदपर्यंत चारचाकीही जाते. वेल्ह्याहून किंवा बंगळूर महामार्गावरील नसरापूरहूनही थेट केळदपर्यंत जीप ठरवता येते. केळदहून पुढे मढे घाट सुरू होतो. कोकणातील कर्णवाडी या गावात उतरतो. तिथून आलो त्याच मार्गाने वर यायचे किंवा बाजूच्याच उपांडय़ा घाटाने परतीची वाट धरायची. प्राचीन काळात कोकणातील महाड, बिरवाडी बंदरांना घाटावरच्या प्रदेशाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या वाटांमध्ये हे दोन घाट मोजले जातात. समुद्रसपाटीपासून जवळजवळ दीड हजार फुटांवरून कोसळणारा धबधबा हे मढे घाटप्रदेशाचे मुख्य आकर्षण. कोणत्याही व्यसनासाठी न जाता मोकळ्या मनाने जा आणि मन निसर्गाच्या दानाने भरून या अशी ही नितांतसुंदर जागा!
पेठ किल्ला ऊर्फ कोथळीगड : मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात जाऊन येण्यासारखा हा किल्ला आहे. पुणे किंवा मुंबईहून शक्य तितक्या लवकर कर्जत स्थानक गाठायचे. तिथून पूर्व बाजूच्या एसटी स्टँडहून आंबिवलीसाठी एसटी पकडायची. नेरळहूनही कशेळे व कशेळेहून आंबिवलीसाठी एसटी मिळू शकते. आंबिवलीहून बऱ्यापकी मळलेली वाट गडाकडे निघते. झरे, धबधबे, पठार आणि सभोवताली नजरबंदी करणारा हिरवागार मुलुख बघत दीड-दोन तासांत गडावर पोहोचायचे. पुढे आजूबाजूचा समां आणि आपण! सोबतीला थोरले छत्रपती व छत्रपती संभाजींचा प्रेरणादायी इतिहास असेलच! परतीच्या प्रवासात वेळ हाताशी असेल तर आंबिवली गावातल्या लेण्यांना भेट द्यायची. या भागात एसटीच्या वेळा पाळणे अधिक महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवले की झाले! वूडलँड, हंटरशूज, अ‍ॅक्शन ट्रेकिंग, फ्लोटर्स (नवख्या, हौशी, तरबेज, अनुभवी) इत्यादी सर्व कॅटेगरीत मोडणाऱ्या ट्रेकर्सचे हे आवडते ठिकाण आहे.
३. कुंडलिका व्हॅली – ट्रेकचा कुठलाही प्लॅन नसतानाही फक्त निसर्गसौंदर्य अनुभवायचं असेल तर मुळशी तालुक्याकडे पावलं वळवायला हवीत. कुंडलिका नदीचा उगम ज्या डोंगररांगेत होतो त्या सभोवतालचा परिसर गाठायचा. पुण्याहून फक्त साठ-एक किमीवर ताम्हिणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्येच एक फाटा उजवीकडे लोणावळ्याकडे जातो. त्या फाटय़ापासून जवळच कुंडलिका व्हॅली, प्लस व्हॅली आणि पिंपरी वगरे गावे आहेत. कुंडलिका आणि प्लस व्हॅलीचा शांत, पण रम्य परिसर घडय़ाळाचा विसर पडावा असाच आहे. पिंपरी गावाजवळील तलावसुद्धा या लेखामध्ये आवर्जून उल्लेख करावा इतका मनोरम आहे. अतिशय नितळ पाणी, मन मोहवेल असं वातावरण, अजून काय हवं? वेळ उरलाच तर तिथूनच तीनेक किमी पुढे वांद्रे गावाशेजारी कैलासगड नावाचा सोपा पण अपरिचित गड आहे. तिथेही भटकून येता येईल. फॅमिलीसह जाऊन काही तास निवांतपणा अनुभवावा, असे हे ठिकाण!
४. कोरईगड किंवा कोरीगड – लोणावळ्याहून सहारा अँबी व्हॅलीकडे जाताना अंदाजे तीसेक किमीवर पेठ शहापूर नावाचे गाव आहे. त्या गावामागचा गड म्हणजेच कोरीगड किंवा कोरईगड. कमी उंच, पायऱ्यांची सोय आणि फिरायलाही कमी अशा सर्व ‘सुविधां’मुळे कोरईगड पर्यटकांचा आवडता आहे. कधी गेलात तर सर्व ती काळजी घेऊन तटबंदीच्या काठाकाठाने गड-प्रदक्षिणा करायला विसरू नका!
५. सरसगड – अष्टविनायकांपकी एक अशा प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पाली गावाचा पहारेकरी असलेला हा सरसगड! (स्थानिक लोक याला सुधागड असेही मानतात. पण पाली हे सुधागड तालुक्याचे गाव असल्यामुळे तसा उल्लेख होत असावा. सुधागड हा वेगळा किल्ला असून तो पालीपासून दहा किमीवर आहे)  सोपी वाट, एका दिवसात फिरून होण्यासारखा विस्तार यामुळे सरसगड पावसाळ्यातही आवर्जून भेट दिला जाणारा किल्ला आहे. गडाच्या अंतिम टप्प्यातल्या पायऱ्यांवरून पाणी वेगाने उतरत असताना तिथून उतरण्याची साहसी कल्पना प्रत्यक्षातही तितकीच थरारक आहे. तेव्हा खबरदारी घेणे आलेच! गडाला एक चोरदरवाजाही असून त्याची वाट सरसगडाच्या डाव्या टोकाखालच्या पठारावरून निघते. माहीतगार माणूस सोबत असेल आणि कातळावरून पाणी वाहत असताना पाऊल टाकायची सवय असेल तर ही वाट नक्की ट्राय करावी!

६. सवाष्णी घाट – सरसगड-सुधागडाचा विषय निघालाच आहे, तर सवाष्णी घाटाबद्दलही लिहायलाच हवे. पुण्याहून लोणावळामाग्रे तल-बला या सुप्रसिद्ध जुळ्या भिंतींखालचे तलबला गाव गाठायचे. त्या भिंतींमागच्या विस्तीर्ण पठारावरून सुधागडाची दिशा धरून चालायला सुरुवात करायची. ही वाट सवाष्णी घाटाकडे येते. सवाष्णी घाटाचे तिरके, बाकदार, उतार उतरून आपण बहिरामपाडा या कोकणातल्या गावात येतो. इथून धोंडसे हे सुधागडाच्या पायथ्याचे गाव जवळच आहे. शांत, आडवाटेवरचा पण अतिशय सुंदर असा घाट म्हणून सवाष्णी घाटाचा उल्लेख करता येईल. या भागात फिरताना वाटेवर कुठेही पाणी नसल्यामुळे सोबत पाणी असावेच. अर्थात सवाष्णी घाट हे फॅमिली डेस्टिनेशन नसून या वाटांनी उतरायचे असेल तर फक्त ट्रेकर्स लोकांच्याच तळहातावर असणारी ती वेडीवाकडी रेघ आपल्याही तळहातावर असली पाहिजे!
तर ही होती पुण्या-मुंबईजवळच्या फार थोडय़ा मॉन्सून स्पेशल ट्रेकर्स डेस्टिनेशन्सची ओळख. निसर्गात फिरताना पूर्ण भान ठेवून वागणे आणि स्वत:च्या वर्तणुकीमुळे निसर्गाच्या इतर घटकांना आणि रहिवाशांना इजा/त्रास होईल असे न वागणे ही एका खऱ्याखुऱ्या सच्च्या भटक्याची इतर महत्त्वाची लक्षणे आहेत, हे ध्यानात ठेवा आणि साऱ्या दुर्गरूपी भुजा पसरून स्वागतासाठी हिरव्या पायघडय़ा घालणाऱ्या सह्यद्रीकडे हक्काने जा!

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
Story img Loader